गोव्‍यातील सातपैकी एक कोरोनाग्रस्‍त झाला बरा...

Dainik Gomantak
शनिवार, 11 एप्रिल 2020

राज्यात असणाऱ्या सात कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी एक रुग्ण ठणठणीत बरा झालेला आहे. आता राज्यात केवळ सहा कोरोनाग्रस्त रुग्ण असून तेही लवकर बरे होतील अशी आशा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व्यक्त केली आहे.

पणजी, 
राज्यात असणाऱ्या सात कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी एक रुग्ण ठणठणीत बरा झालेला आहे. आता राज्यात केवळ सहा कोरोनाग्रस्त रुग्ण असून तेही लवकर बरे होतील अशी आशा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व्यक्त केली आहे. हि गोड बातमी समस्त राज्यवासीयांना ट्विटच्या माध्यमातून देत मंत्री राणे यांनी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांच्या कष्टाचे चीज झाल्याची प्रतिक्रियाही ट्विटमधुन व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून मिळालेल्या मार्गदर्शक नियमानुसार या व्यक्तीच्या गेल्या ४८ तासात केल्या गेलेल्या दोन्ही कोरोना पडताळणी चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे हा रुग्ण आता कोरोनाग्रस्त नाही हे सिद्धच होते. पण याशिवाय या रुग्णाच्या शरीरातील अशक्तपणा पूर्णपणे कमी झाला असून तो ठणठणीत आहे. सध्या तो घरी जाण्याइतपत बरा झाला असला तरी नियमानुसार त्याला आणखी १४ दिवस विलगीकृत ठेवण्यात येणार आहे. हे विलगीकरण इतर कोरोनाग्रस्त रूग्णांपासून वेगळ्या कक्षात असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाचे विलगीकरण गोवा वैद्यकीय महाविद्यालयात केले जाण्याची दाट शक्यता आहे. या १४ दिवसात त्याच्या शारीरिक आरोग्यावर पूर्ण लक्ष देण्यात येणार असून त्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

या रुग्णांचे आरोग्य ठिक होण्यासाठी अहोरात्र झटलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे हे कौतुक आणि यश आहे. त्यानी दिलेल्या उत्तम उपचारामुळे हा रुग्ण बरा होऊ शकल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राणे यांनी व्यक्त केली आहे.

गोव्यात असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा झाला असल्याचे सांगताना मला फार आनंद होत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

संबंधित बातम्या