आमिष दाखवून एक कोटींचा घोटाळा

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

गुंतवणुकीवर दररोज तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून एक कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी चौघांना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पाटो - पणजी येथे ट्रॅव्हल एजन्सीच्या नावाखाली हा प्रकार चालत होता.

पणजी: गुंतवणुकीवर दररोज तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून एक कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी चौघांना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पाटो - पणजी येथे ट्रॅव्हल एजन्सीच्या नावाखाली हा प्रकार चालत होता. संशयितांचा गोमंतकीय गुंतवणुकदारांना तीन कोटी रुपयांना गंडवण्याची योजना होती असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात श्वेता नावाच्या एका गोमंतकीय महिलेचा हात असल्याचा संशय असून त्याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रीम्सटूरियालीटी या नावाच्या कंपनीच्या नावाने ड्रीमटूकसिनो डॉट कॉम संकेतस्थळाच्या माध्यमातून हे संशयित १० हजार रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक स्वीकारत होते. गेल्या सप्टेंबरमध्ये ते गोव्यात आल्यानंतर त्यांना गंडवण्याची ही कल्पना सूचली. मल्टीलेवल मार्केटींग पद्धतीने त्यांनी आधीच्या गुंतवणूकदारांना नव्याने गुंतवणूक केलेल्यांकडून मिळालेल्या पैशातून व्याज देणे सुरू केले होते. दररोज तीन टक्क्यांपर्यंत व्याज मिळत असल्याने महिनाभरात एक कोटी रुपये या संकेतस्थळामार्फत गोळा करण्यात आले होते.

याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित दसरथ बुरा याच्यासह कंपनीचा प्रमुख कर्मचारी आदी गणेश, कंपनीचा एजंट ताजुद्दीन, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ संदीप याला अटक कऱण्यात आली आहे. या प्रकरणात गोमंतकीय महिला श्वेता हिचाही सहभाग असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याबाबत माहिती संकलन पोलिसांनी सुरू केले आहे. पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एझिल्डा डिसोझा, निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, प्रवीण वस्त यांनी तपासकाम सुरू ठेवले आहे.

पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा होत गेला आहे. जरी एक कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असली तरी ते कोणत्याही प्रकारची पावती देत नव्हते. ते ऑनलाईन पद्धतीनेच दररोज उत्पन्न देत होते. याबाबत पोलिसांकडे तक्रार आल्यावर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला, या दरम्यान त्यांना पाटो येथील एका इमारतीत ट्रॅव्हल एजन्सीच्या नावाखाली हा उद्योग सुरू असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे रिझर्व बॅंक ऑफ इंडिया, भारतीय गुंतवणूक नियामक मंडळ वा अन्य नियामक यंत्रणांकडून गुंतवणुकीसाठी पैसे स्वीकारण्याचा कोणताही परवाना नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांच्या बॅंक खात्यांची माहिती पोलिसांनी घेतली असताना अनेक खात्यांतून पैसे वळवण्यात आल्याचे व गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनाही पैसे अदा करण्यात आल्याचे दिसून आले.

प्राथमिक चौकशीत घोटाळा होत असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून यात गुंतलेल्यांच्या निवासस्थानी व कार्यालयांत छापे टाकले. याच दरम्यान चौघांना पोलिसांनी अटकही केली. पोलिसांनी त्यांची ज्ञात बॅंक खाती गोठवली आहेत.

सात राज्यातील लोकांकडून एक कोटींची गुंतवणूक

पोलिसांनी केलेल्या चौकशीत गोव्यासह सात राज्यांतील गुंतवणुकदारांनी एक कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. हा घोटाळा महिनाभरात उघडकीस आल्याने दीर्घकाळ हा घोटाळा चालून होणारे नुकसान टाळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांनी गुंतवणुकदारांना कसिनोमध्ये मोफत प्रवेश, हॉटेलमध्ये राहणे, विमान तिकीट आरक्षण, आयफोन, स्कूटी, बुलेट मोटारसायकल अशा भेटींची आमिषे दाखवली होती.

या प्रकरणात पकडण्यात आलेले संशयित हे तेलंगण येथील सुरायपेट व नालगोंडा येथील व तमीळनाडूच्या होसूर येथील आहेत. पूर्वी ते आंध्रप्रदेश व महाराष्ट्रात साखळी विपणन योजनेचे एजंट होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच हा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यांनी पाटो येथील एका हॉटेलमध्ये गुंतवणुकदारांशी बैठकाही घेतल्या होत्या.
goa

संबंधित बातम्या