आणखी एक कोरोनाचा रुग्‍ण बरा

Dainik Gomantak
गुरुवार, 16 एप्रिल 2020

या रुग्णाच्या दोन्ही कोरोना पडताळणी चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे त्याच्या शरीरात हा विषाणू नसल्याचे स्पष्ट होते.

पणजी,

राज्यात असणाऱ्या दोन कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी आणखी एक रुग्ण बरा झाला आहे. आता राज्यात केवळ एकच कोरोनाग्रस्त रुग्‍ण आहे. त्‍यालाही ठणठणीत बरे करण्यासाठी डॉक्टर प्रयत्नरत आहेत. दरम्यान, पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होऊ नये म्हणून आम्ही पूर्णपणे कार्यरत असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
या रुग्णाच्या दोन्ही कोरोना पडताळणी चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे त्याच्या शरीरात हा विषाणू नसल्याचे स्पष्ट होते. याशिवाय बाकीचे बरे झालेले रुग्ण कांदोळी येथील विलगीकरण कक्षात आहेत. कोरोनातून बरा झालेल्या एका रुग्णाचे इस्पितळातील विलगीकरणाचे सात दिवस संपले आहेत. त्याची तब्येत आता बरी असून त्याला आता पुढील ७ दिवस त्याच्या घरी विलगीकृत ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
या बातमीमुळे लोकांच्या मनावरील बराच ताण हलका झाला आहे, असेही आरोग्‍यमंत्री म्‍हणाले.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार एकूण २० कोरोना पडताळणी चाचण्यांचे निकाल हाती आले असून हे निकाल निगेटिव्ह आहेत. अजून ६१ चाचण्यांचे निकाल प्रलंबित आहेत. गोमेकॉतील कोरोना विभागात आज एका संशयिताला दाखल केले असून या विभागात एकूण ६ संशयित आहेत. जुने गोवे रेसिडेंन्‍सीमध्‍ये ३, तर फोंडा उपजिल्हा इस्पितळात १ संशयित आहे. यासंदर्भात आरोग्‍यमंत्र्यांनी व मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करून डॉक्‍टरांचे व त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

डॉ. एडविन गोम्स आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा मी खूप आभारी आहे. येत्या सात दिवसांत राज्यात असलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाचीही चाचणी निगेटिव्ह होईल आणि आपण कोरोनामुक्त होऊ, अशी मला आशा आहे.
- विश्‍वजित राणे, आरोग्‍यमंत्री

आता राज्यात केवळ एक कोरोनाग्रस्त राहिला असून या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मी खूप आभारी आहे. आपण कोरोनाच्या विरोधात लढत असून ही लढाई आपण जिंकणारच.
-डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री.

संबंधित बातम्या