विज्ञान हे एक सुसंघटित ज्ञान आहे.

डॉ. नंदकुमार कामत
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

स्त्रिया अत्युत्तम वैज्ञानिक बनू शकतात.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात किरण मुजुमदार शॉ सारख्या महिला उद्योगपतींनी देदीप्यमान कामगिरी केलेली आहे. पर्यावरण शिक्षण व संरक्षणाच्या क्षेत्रात दिल्लीच्या डॉ. सुनीता नारायण यांनी सातत्यपूर्ण व भरीव योगदान दिलेले आहे. जोपर्यंत आपण विद्यार्थिनींना विज्ञानाच्या क्षेत्रात मार्गदर्शन करीत नाही, तोवर त्यांची सुप्त सर्जनशक्ती दिसणे अशक्‍य. १९९३ पासून अनेक प्रकल्पांसाठी शंभरहून जास्त विद्यार्थिनींना विज्ञानाच्या विविध क्षेत्रात मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली.

थरार संशोधनाचा : 'विज्ञानातील स्त्रिया' ही यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे. त्यामागे खास कारण आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने व विशेषतः युनेस्कोने स्त्री सशक्तीकरण, समान संधी, सन्मान आणि स्त्री वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. साक्षरतेच्या वाढत्या प्रमाणामुळे गेल्या पंचवीस वर्षात मोठ्या प्रमाणावर स्त्रिया उच्च शिक्षण घेऊ लागल्या.

आज विज्ञान- तंत्रज्ञान अभियांत्रिकीचे असे एकही क्षेत्र उरलेले नाही की जिथे स्त्री दिसत नाही. गेल्या २७ वर्षात मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली की भारतीय स्त्री, गोव्यातील स्त्री अजून पूर्णपणे स्वतंत्र झालेली नाही. मला अशा अनेक हुशार व संशोधनात तरबेज विद्यार्थिनी भेटल्या ज्यांना पीएचडीसाठी पुढे संशोधन करण्याची खूप इच्छा होती. पण त्यांना तरुणपणीच संसाराचा गाडा हाकणे भाग पडले. हुशार विद्यार्थिनींवर अशी वेळ येऊ नये म्हणून भारत सरकारने "महिला वैज्ञानिक शिष्यवृत्ती' योजना तयार केली.

त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणानंतर खंड पडलेल्या स्त्रियांना संशोधनाची उत्कृष्ट संधी प्राप्त झाली आहे. तरीसुध्दा गोवा विद्यापीठापुरता तरी आमचा विद्यापीठ स्थापनेपासूनचा असा अनुभव आहे की, सुवर्णपदक व इन्स्पायरसारखी शिष्यवृत्ती मिळवूनही विज्ञानाच्या विविध विषयांत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या हुशार विद्यार्थिनी पैकी, पंचवीस टक्के सुध्दा पीएचडी संशोधन करण्यासाठी धडपडत नाहीत. बहुतेकांना पदव्युत्तर स्तरापर्यंत थकवा आलेला असतो. जवळजवळ पन्नास टक्के हुशार विद्यार्थिनी बी.एड. वगैरे पदवी मिळवून अध्यापनाच्या क्षेत्रात शिरतात. मात्र, तिथे वैज्ञानिक संशोधनाला वेळही देता येत नाही व एकदा शिक्षक झाल्यावर विज्ञानासाठी घसघशीत काही करण्याचा उत्साहही शिक्षण संस्थाच्या यंत्रवत वेळापत्रकामुळे कायमचा संपुष्टात येतो.

केवळ अध्यापन क्षेत्राकडे वळल्याने भारताने व गोवा राज्याने शेकडो उत्कृष्ट स्त्री वैज्ञानिक गमावले आहेत. त्यामुळे आम्ही संशोधन करतो म्हणून मार्गदर्शनासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना गुण मिळाल्यानंतर निकाल जाहीर झाल्यावर त्या संशोधन निष्कर्षांचे पुढे काय करायचे याची मुळीच फिकीर नसते. त्यामुळे विद्यापीठातील आमचे शेकडो शोध प्रबंधांच्या चार-पाच प्रतीत बंदिस्त आहेत. या तरुण स्त्रियांनी ही आपल्याच पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड आहे. माझा दाहक अनुभव असा की एकदा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन गेलेल्या तरुण स्त्री वैज्ञानिकाची कितीही मनधरणी करा, पुन्हा त्या प्रयोगशाळेत फिरकणार नाहीत व आपले अप्रकाशित संशोधन वेगवेगळ्या राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय परिषदांत सादर करण्यासाठी पुढे सरसावणार नाहीत. या प्रवृत्तीचा जबरदस्त फटका माझ्या संशोधन कार्याला बसला आहे.

इथे मुद्दामहून कुणाची नावे देत नाही, पण या सगळ्या विद्यार्थिनींमध्ये उत्कृष्ट स्त्री वैज्ञानिक बनून कीर्तिमान होण्याचे गुण होते. निकालानंतर आपल्याच हातून झालेले संशोधन टाकून देऊन नोकरी व संसाराच्या मागे धावत सुटल्याने या हुशार स्त्रियांनी आपलेच नुकसान करून घेतले. पण या नुकसानीची ऐतिहासिक जाणीव त्यांना नाही.

माझ्या विद्यापीठात प्रयोगशाळेतील ज्या टेबलावर बसून राष्ट्रीय विज्ञानदिन २८ फेब्रुवारी डोळ्यांसमोर ठेवून मी हा लेख लिहीत आहे. त्याच टेबलाच्या टोकाला एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र व जीवतंत्रज्ञानाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मोठमोठ्या प्रकल्प अहवालांचा (डिजर्टेशन्स) मोठाच्या मोठा पिरॅमिड आहे. या उतरंडीकडे पाहून डॉ. आनंदीबाई जोशी आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मला गळा काढावासा वाटतो. हा प्रत्येक प्रकल्प अहवाल म्हणजे एक दीर्घकथा अथवा कादंबरी आहे.

स्त्रीस्वभावाचे तऱ्हेकवार नमुने. तरुण हिंदू, ख्रिश्‍चन, मुस्लीम विद्यार्थिनी सर्व थरातील. बहुजन समाजातील नवशिक्षित, नवपदवीधर मुलीच जास्त. १९६३ ते १९७९ या काळात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सह्रदय सरकारने भाऊसाहेब बांदोडकर व शशिकलाताई काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजात स्त्री शिक्षणाच्या आटोकाट प्रसाराचा जो चमत्कार घडवला त्याचे फलित, एका पिढीनंतर मला प्रयोगशाळेत पाहायला मिळाले व फार आनंद झाला.

आमचे थोर लेखक मित्र व मार्गदर्शक, सव्यसाची नाटककार, कादंबरीकार पण मूलतः कवी मनाचे पुंडलिक नारायण नायक भाषणातून कधीकधी सहजपणे खंत व्यक्त करीत 'आमच्यो कितंत्योशोच पिळग्यो मोन्यानीच गेल्यो' (आमच्या कित्येक पिढ्या मुकपणे गेल्या.) पण बहुजन समाजातील तरुण, नवशिक्षित हुशार, स्त्रियांची बुद्धिमत्ता व कष्ट करण्याची तयारी मला प्रयोगशाळेत दिसली. तरुण मुस्लीम विद्यार्थिनींना प्रकल्पांसाठी मार्गदर्शन करताना मला त्यांची हुशारी जाणवायची. माझे तर आज स्पष्ट मत आहे की, तरुण मुस्लीम विद्यार्थिनींना विज्ञान तंत्रज्ञानातील उच्चशिक्षण व संशोधनाच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी खास योजनेद्वारे केंद्र व राज्यसरकारांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला पाहिजे. मुस्लीम स्त्रियांतील उपजत ज्ञानविज्ञान लालसा थक्क करणारी आहे आणि तिचा सुयोग्य उपयोग या राष्ट्राच्या उत्कर्षासाठी व्हायला हवा. अल्पसंख्याकांसाठी असलेल्या मौलाना आझाद शिष्यवृत्तीचा भरपूर फायदा गोवा विद्यापीठातील ख्रिस्ती व मुस्लीम विद्यार्थिनींना झाला आहे.

आज जगातील 'ॲक्‍टीनो बॅक्‍टेरिया' या सुक्ष्मजींवावर प्रावीण्य मिळवलेली, माझी विद्यार्थिनी डॉ. सोनाशिया वेल्हो परेरा विवाहानंतर लंडनला स्थायिक होऊन एका जगविख्यात औषध संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. जवळजवळ आठ वर्षे तिने माझ्या हाताखाली काम केले व काही नवीन संशोधन पद्धती शोधून काढल्या. त्यातील एक पद्धत सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांमध्ये हळूहळू लोकप्रिय होत आहे. एकदा आम्ही प्रयोगशाळेत जंतुनाशके/सूक्ष्मजीव रोधक द्रव्यांवर (अँटीबायॉटिक्‍स) चर्चा करीत होतो. गोव्याच्या माती व गाळाच्या विविध नमुन्यातून उपयुक्त ॲक्‍टीनोबॅक्‍टेरिया हे तंतुमय सूक्ष्मजीव शुद्ध स्वरूपात देऊ शकतात. ते तिला शोधायचे होते.

पण मग निष्कर्षाचे मोजमाप कसे करायचे? पूर्वी जी पद्धत वापरायचे त्यात मोजमापाची शक्‍यता नव्हती. मग आम्ही मॉडीफॉईड क्रॉस स्ट्रीक पद्धत तयार केली. त्याद्वारे एखादे जंतुनाशक एकाच वेळी किती प्रकारच्या रोगजंतूविरुद्ध प्रभावी ठरू शकते. ते मोजणारे सोपे समीकरण आम्ही तयार केले. यासंबंधीची सांख्यिकी समीकरणे मी तिला तोंडीच सांगितली होती. पेपर तयार झाला आणि आम्हाला आश्‍चर्य आणि आनंदाचा धक्का बसला एका दर्जेदार शास्त्रीय नियतकालिकात फक्त काही महिन्यात काहीही फेरफार न करता तो प्रसिध्द झाला. डॉ. सोनाशियाने कल्पना स्वीकारली होती. आव्हानही पेलले होते. आजही तरुण स्त्री माझ्याही फार पुढे गेल्याचे पाहून मी अभिमानाने सांगू शकतो, लोकहो स्त्रिया अत्युत्तम वैज्ञानिक बनू शकतात.

 

संबंधित बातम्या

फोटो फीचर