होंडा पंचायतीची वाटचाल पालिकेच्या दिशेने

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

जुन्या पंचायत इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्याचे सुरू असलेले बांधकाम.

सरकारकडून मिळाला शहरीकरणाचा दर्जा : विकासकामांसाठी अतिरिक्त निधी मिळणार

सत्तरी तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून गणली जाणारी होंडा पंचायत ही पर्ये मतदारसंघाच्या राजकीय पटलावर महत्त्वाची समजली जाते.

पिसुर्ले : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा परिसराला सरकारने आदेश काढून शहरीकरणाचा दर्जा दिल्याने येणाऱ्या काळात होंडा पंचायतीच्या विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एकूण अकरा प्रभागात विभागलेल्‍या या पंचायतीचे पालिकेत रुपांतरण होणार नाही ना, असा प्रश्‍‍न स्‍थानिकांना पडला आहे.

या पंचायत क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे या भागात झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सात प्रभागात विभागलेली पंचायत अवघ्याच कळात नऊ वरून अकरा प्रभागाची बनली आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या माध्यमातून या परिसरात औद्योगिक वसाहत प्रशिक्षण केंद्र, शहरी भागाप्रमाणे बस स्थानक, पोलिस चौकी, मार्केट, दोन राष्ट्रीय बँका, एक राज्य सहकारी बँक, दोन माध्यमिक विद्यालये तसेच एक खासगी उच्च माध्यमिक विद्यालय अशा प्रकारे नागरिकांना हव्या असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पंचायत क्षेत्र शहरीकरण झालेले दिसत असले तरी येथे आणखी बऱ्याच साधनसुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

या भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे येथील जनगणना दरवर्षी वाढत आहे. त्याचप्रमाणे वाहतूक रहदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र, ज्याप्रमाणे या भागात रस्त्याची व्यवस्था निर्माण करायला हवी होती, तशी न केल्याने येथील रस्त्यावर वाहनाचा मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच येथे छोटे मोठे अपघात घडत आहेत. यासाठी नियोजन करताना सरकारने होंडा परिसरातून वाळपई व साखळी शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची अत्यंत गरज आहे.
त्याचप्रमाणे या भागातील युवा वर्गाला क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी येथे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या होंडा नारायण नगर येथील मैदानाचे काम मार्गी लावण्याची गरज आहे.

खाणींसाठी सर्व वैकल्पिक पर्याय, मुख्यमंत्र्यांची माहिती

पंचायत इमारतीचे बांधकाम सुरू
पर्ये मतदार संघात येणारी होंडा पंचायत राजकीय स्तरावर महत्त्वाची समजली जाते. तरीही या पंचायतीचा कारभार बरीच वर्षे जुन्या इमारतीमधून चालत होता, पण सध्‍या या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्याचे काम हल्लीच सुरू झाल्याने येणाऱ्या काही दिवसांत या पंचायतीला सर्व सोयीयुक्त अशी इमारत मिळणार आहे. त्यामुळे सध्‍या या पंचायतीचा कारभार होंडा बसस्थानकावर भाड्यानी घेतलेल्या खोल्यांमधून चालत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने हल्लीच राज्यातील इतर भाग शहरीकरण म्हणून जाहीर करताना होंडा भागाला सुद्धा शहरीकरणाचा दर्जा दिल्याने येणाऱ्या काळात होंडा पंचायतीचे रूपांतर नगर पालिकेत होऊन काही नियम कडक तर होणार नाही ना? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

 

संबंधित बातम्या