कांदा दर उतरला, तरीही कांदा भजी गायब

तुकाराम गोवेकर
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

कांद्याचे भाव वाढल्याने मडगावातील हॉटेलमधून गेल्या दोन महिन्यापासून गरमागरम कांदाभजीच गायब झाली आहे. वाढीव दराने कांदाभजी दिल्यास ग्राहकांकडून नाराजी ओढवावी लागत असल्याने व नियमित दरात कांदाभजी परवडत नसल्याने हॉटेल मालकांनी कांदाभजी करणेच बंद केले आहे.

नावेली: कांद्याचे भाव वाढल्याने मडगावातील हॉटेलमधून गेल्या दोन महिन्यापासून गरमागरम कांदाभजीच गायब झाली आहे. वाढीव दराने कांदाभजी दिल्यास ग्राहकांकडून नाराजी ओढवावी लागत असल्याने व नियमित दरात कांदाभजी परवडत नसल्याने हॉटेल मालकांनी कांदाभजी करणेच बंद केले आहे. कांद्याचा दर थोडा कमी झाला आहे, तरीही हॉटेलवाल्यांना हा दर परवडत नसल्याबद्दल ग्राहकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काही हॉटेलवाल्यांनी शक्कल लढवत कांदा व कोबीपासून भजी तयार करून विक्री करतात, अशी माहिती मडगावातील काही हॉटेलमालकांनी दिली, तर अनेक हॉटेलमालकांनी कांदाभजी बनवणेच सोडून दिल्याने मडगावातील हॉटेलमधून कांदाभजी गायब झाली आहेत.

मडगावातील कामत हॉटेलचे व्यवस्थापक विष्णुदास कामत यांनी कांद्याचे दर गगनाला भिडल्याने गेल्या दोन महिन्यापासून कांदाभजी करणेच बंद केल्याचे सांगितले. सध्या कांद्याचे दर २८ ते ३४ रू. प्रति किलो असून कांद्याचे दर १५ ते १६ रू. प्रतिकिलो झाला तरच कांदाभजी करणे शक्‍य होईल असे त्यांनी सांगितले.

कांदाभजी करण्यासाठी तेल जास्त लागते कांद्याचे भाव वाढल्याने कांदाभजी हॉटेलमध्ये २० रु. प्लेट देणे परवडत नाही. बेळगाव मध्ये कांद्याचे दर 8 ते १० रू. प्रति किलो असला तरी गोव्यात येईपर्यंत वाहतूक खर्च मिळून दर वाढत असल्याने हॉटेलमालकांना कांदाभजी करणे परवडत नाही, असे कोहिनूर हॉटेलचे विनोद शेट्टी यांनी सांगितले. कांद्यांचे दर वाढल्याने आम्ही हॉटेलमध्ये भजी तळणेच बंद केले, असे शेट्टी यांनी सांगितले. कांद्याचे दर जरी बाजारपेठेत उरतले असले तरी हॉटेलमालकांना परवडत नसल्याने कांदाभजी करणे शक्‍य होत नाही.

प्रसाद हॉटेलचे मालक कृष्णराज भट यांनी आपण कांदा महाग झाल्याने कांदाभजी करणे बंद केले होते मात्र गेल्या आठ दिवसापासून कांद्याचे दर कमी झाल्याने व गिऱ्हाईकांची मागणी असल्याने भजी करण्यास कमी प्रमाणात सुरवात केली. कांद्याचे दर हॉटेलमालकांना परवडणारे असावे तरच हॉटेलमध्ये कादाभजी करणे शक्‍य आहे. गेल्या दोन दिवसात काही कांद्याचे दर २८ ते ३५ रू.प्रतिकिलो झाले आहेत त्यामुळे कांद्याचे दर खाली येतील, अशी अपेक्षा आहे. कांद्याचे दर १५ ते १६ झाल्यास कांदाभजी करणे हॉटेलमालकांना परवडते असे त्यांनी सांगितले. कांद्याची साठेबाजीकरणाऱ्यावर सरकारने कारवाई केल्यास कांद्याचे दर नियंत्रणात येऊ शकतात, असे भट यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या