ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यापुढे ' इंटरनेट ' ची समस्या

Dainik Gomantak
सोमवार, 13 एप्रिल 2020

विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने ही अभ्यासक्रम इंटरनेटच्या माध्यमातून झूम करून पाहिला. त्यावेळी त्यांनाही ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यात अडचणी येऊ शकतात, हे दिसून आले आहे.

विलास ओहाळ

पणजी,

लॉकडाऊनमुळे गोवा विद्यापीठ व संलग्न महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. परंतु विद्यापीठाने संबंधित संस्थांना परिपत्रक पाठविले असून अभ्यासक्रमातील जे काही भाग शिल्लक आहे ते ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यास सांगितले आहे. लॉकडाऊनची मर्यादा वाढविली तर मात्र, अशी ग्रामीण भागातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत इंटरनेट सेवा सुरळीत असेलच असे नाही. त्यामुळे आता संस्थांपुढे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. 

विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकामुळे महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हाती आलेल्या माहितीनुसार अनेक महावियालयांच्या विभागप्रमुखांनी आपल्या शिक्षकांना ही माहिती कळविलेली नाही.

विद्यापीठातील एका प्राध्यापकाने  सांगितले की, ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्याएवढी राज्यायातील इंटरनेटसेवा प्रगल्भ नाही. ग्रामीण भागात अजूनही  इंटेरनेट सेवा पोहोचलेली नाही. 

विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने ही अभ्यासक्रम इंटरनेटच्या माध्यमातून झूम करून पाहिला. त्यावेळी त्यांनाही ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यात अडचणी येऊ शकतात, हे दिसून आले आहे. अनेक प्राध्यापकांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा अनुभव नाही, ही समस्याही पुढे अडचणीचे ठरू शकते. देशात अजून कोणतेही राज्य इंटरनेटनी पूर्णपणे जोडले गेलेले नाही. आयआयटीसारख्या क्षेत्रातही ऑनलाईन शिकविण्यात अडचणी येतात. मग राज्यात हा उपक्रम शक्य होईल की नाही, याचे उत्तर लवकरच मिळेल.महाविद्यालयांच्या प्रत्येक विभागातील विद्यार्थ्याची संख्या लक्षात घेतल्यास एकावेळी सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे प्राध्यापकास अवघड होईल.

अमेरिकास्थित 'कौरसेरा ' ची मदत मिळणार !

ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविणे किंवा पुढे ऑनलाईन परीक्षा घ्यावया झाल्यास ते शक्य होणार नाही, याची कल्पना विद्यापीठातील प्राध्यापकांनाही आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने अमेरिकास्थित ' कौरसेरा ' या जगातील एकूण १९० पेक्षा जास्त विद्यापीठ व कंपन्यांना ऑनलाईन सेवा देण्यात सहकार्य करणाऱ्या कंपनीचे मदत घेण्याचे ठरविले आहे. ही कंपनी कोणतेही शुल्क आकारणार नसून, पुढील वर्षात ती मोफत सेवा देणार आहे. त्यासंबंधीची फाईल विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहे.

 

वियार्थी परिषदही चिंतेत... !विद्यापीठ विद्यार्थी परिषदच्या आज सर्व सदस्यांची ऑनलाईन बैठक झाली. राज्यातील  महावियालयांत ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात झाली आहे का ? याची माहिती गोळा करण्यास परिषदेच्या सदस्यांना सांगितले  आहे. अनेक विद्यार्थ्यांपर्यत इंटरनेटसेवा पोहोचलेली नाही. या विषयी निश्चित तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाला विद्यार्थी परिषदेने ईमेल पाठवणार आहे .- खेमल शिरोडकर, अध्यक्ष, विद्यापीठ वियार्थी परिषद.

संबंधित बातम्या