खुल्या वातावरणात दुकाने थाटण्याची महापालिकेची तयारी

खुल्या वातावरणात दुकाने थाटण्याची महापालिकेची तयारी

पणजी, 

पणजीतील दुकाने खुली करण्यासाठी महापालिकेने तयारी दर्शविली आहे. त्यासाठी महापालिकेकडे अर्ज करावे लागणार आहेत. परंतु भाजीपाला व फळविक्रेत्यांसाठी मार्केट खुले न करता त्यांच्यासाठी खुल्या वातावरणात दुकाने थाटण्याची महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आयनॉक्सच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर दुकानांची आखणी करून दुकानांना परवानगी दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे महापालिका आणि नगरपालिकांना आपल्या कार्यक्षेत्रातील काही दुकांनाना खुले करण्यास परवानगी देता येईल, असे नमूद केले आहे. हॉटेलवाल्यांना ते उघडे ठेवता येणार असलेतरी ग्राहकांना आतमध्ये घेता येणार नाही, त्यांना केवळ पार्सल सेवाच देता येणार आहे. केस कर्तनालय, स्पा अशा दुकानांना केंद्र सरकारने परवानगी दिली नाही. मात्र, हार्डवेअर, इतर व्यवसायाशी संबंधित दुकनांना परवानगी महापालिकेत अर्ज केल्यानंतरच दिली जाईल, असे महापौर उदय मडकईकर यांनी ‘गोमन्तक'ला सांगितले.
दुकानांतील सर्व कर्मचाऱ्यांना कामावर न घेता, अर्ध्या-अर्ध्या कामगारांना आलटून पालटून कामावर बोलवावे. त्याचबरोबर त्या कामगारांना मास्क देणे, सॅनिटायझरचा वापर करणे याशिवाय दुकानाबाहेर ग्राहकांना उभे राहण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून उभे राहण्यासाठी मार्किंग करणे, अशा बाबी तपासल्या जाणार आहे. शहरातील १८ जून मार्गावर दुकानांना एक दिवसाआड खुले करण्यासाठी परवानगी देण्याचा महापालिकेचा विचार आहे. कारण या रस्त्यावर एकदा वाहतूक सुरू झाली की शिस्तीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे, असे महापौर म्हणाले. अजूनही शहरात विना परवाना भाजीपाला, फळांची विक्री सुरू असल्याचे महापालिकेला दिसून आले आहे. आज रविवारी सुटीच्या दिवशीही आझाद मैदानाकडे चार वाहनांतून विविध वस्तू विक्री होत असल्याचे महापालिकेला समजल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी पोहोचेपर्यंत ते विक्रेते वाहन घेऊन निघून गेले होते.
रस्त्यावर भाजीपाला व फळविक्रीला मंगळवारपासून सुरुवात होईल. त्यासाठी सोमवारी दुकानांची आखणी होईल, त्याचबरोबर येथे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांचे पार्किंग आयनॉक्सच्या पार्किंग क्षेत्रात करता येणे शक्य होणार आहे. लोकांची गर्दी होऊ नये यासाठी काय करता येईल, याचाही महापालिका विचार करीत असल्याचे मडकईकर म्हणाले.
---------


आप’चा महापौरांना सल्ला..!
आम आदमी पक्षाचे वाल्मिकी नाईक यांनी महापौरांना एमएमएच्या आदेशानुसार शहरी भागात सर्व स्टँडअलोन दुकाने, निवासी संकुलातील दुकाने उघडण्यास परवानगी असल्याचे म्हटल्याची आठवण करून दिली आहे. मास्क परिधान केल्याशिवाय आणि सामाजिक अंतराचे निकष काटेकोरपणे पाळण्याशिवाय परवानगी देऊ नये. त्याचबरोबर सामाजिक अंतर राहण्यासाठी महापालिकेने खुणा आखल्या पाहिजेत. काही दुकानात मदतनीस नसल्यास त्यावर पर्याय शोधण्याकरिता महापालिकेने मदत केली पाहिजे. त्याशिवाय मान्सूनपूर्व कामावरही त्यांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com