सरकारविरोधात विरोधक एकवटले

Dainik Gomantak
सोमवार, 6 जानेवारी 2020

गोवा सरकारला म्हादईचे पाणी कर्नाटक पळवत असल्याच्या मुद्‍द्यावरून घेरण्यासाठी विरोधातील आमदार एकवटले आहेत. त्यांनी विधानसभेच्या उद्याच्या एक दिवसीय अधिवेशनावेळी एकत्रिकपणे स्थगन प्रस्ताव आणण्याचे ठरवले आहे.

पणजी

गोवा सरकारला म्हादईचे पाणी कर्नाटक पळवत असल्याच्या मुद्‍द्यावरून घेरण्यासाठी विरोधातील आमदार एकवटले आहेत. त्यांनी विधानसभेच्या उद्याच्या एक दिवसीय अधिवेशनावेळी एकत्रिकपणे स्थगन प्रस्ताव आणण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचे पाच, गोवा फॉरवर्डचे तीन व अपक्ष रोहन खंवटे यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याची माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पर्वरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वी असा स्थगन प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्याला काँग्रेस व मगोने साथ द्यावी, असे आवाहन केले होते. विधानससभेची सदस्यसंख्या ४० असल्याने स्थगन प्रस्ताव देण्यासाठी एक षष्टांश म्हणजे सहा आमदारांच्या स्वाक्षऱ्यांची गरज होती. गोवा फॉरवर्डला आणखी तीन, तर काँग्रेसला आणखी एका आमदारच्या स्वाक्षरीची गरज होती. त्यातील कोंडी फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते कामत यांची आज सकाळी सरदेसाई व मगोचे सुदिन ढवळीकर यांनी भेट घेतली. त्या बैठकीत स्थगन प्रस्ताव एकत्रितपणे सादर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सरकारच्या विरोधात असलेले खंवटे यांनाही सोबत घेण्यात आले.
या ठरावाच्या सादरीकरणासाठी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत आज विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात सायंकाळी आले होते. गेल्या तीन वर्षात प्रथमच विरोधी आमदारांत समन्वय निर्माण होत असल्याचे आज दिसले. येत्या तीन फेब्रुवारीपासून आठवडाभरासाठी बोलावण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत ही एकजूट टिकली, तर सत्ताधाऱ्यांसाठी ती डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यातही विधानसभेत दिलेल्या आश्वासनांकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षाकडे नेमक्या तारखेचा उल्लेख करत बोट ठेवणाऱ्या विरोधी पक्षनेते कामत यांच्या सवयीमुळे सरकारला अडचणीचे वाटू शकते.

आज काय होईल
विरोधी आमदारांनी सभापतींच्या कार्यालयाला स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. त्यानुसार स्थगन प्रस्तावाचे काय झाले, याची साहजिकपणे विरोधकांकडून सभापती राजेश पाटणेकर यांना विचारणा करण्यात येईल. हे या वर्षीचे पहिलेच अधिवेशन असल्याने त्याची सुरवात राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अभिभाषणाने होणार आहे. त्यामुळे राज्यपालांचे अभिभाषण सुरू होण्यापूर्वी ही विचारणा करण्यात येईल की, नंतर हे समजू शकले नाही. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभा तहकूब करून दुपारच्या सत्रात घाईने सरकारी कामकाज उरकले गेल्यास विरोधकांची भूमिका काय असेल, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यपालांच्या भाषणाआधी स्थगन प्रस्तावाची विचारणा करत विरोधकांनी सभात्याग केल्यास तीही महत्त्वाची घडामोड ठरू शकते.

असे आहे बलाबल?
विधानसभेत सत्ताधारी भाजपकडे अपक्ष आमदार गोविंद गावडे यांच्यासह २९ जणांचे भक्कम बहुमत आहे. विरोधी गटात काँग्रेसकडे ५, गोवा फॉरवर्डचे ३, अपक्ष खंवटे, मगोचे ढवळीकर व महाराष्ट्रात भाजपपासून राष्ट्रवादी काँग्रेस दूर झाल्याने त्यांचे चर्चिल आलेमाव हे एकमेव आमदार जमेस धरता ११ आमदार आहेत. त्यामुळे सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळला, तरी बहुमताच्या जोरावर सत्ताधारी पक्ष सरकारी कामकाज विनासायास पार पाडू शकतो. मात्र, या विषयावर आपण तटस्‍थ राहणार असल्‍याचे आलेमाव यांनी रात्री उशिरा सांगितले.

आलेक्स रेजिनाल्ड प्रतोद
काँग्रेस पक्षाने आज कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांची पक्षाचे विधिमंडळातील प्रमुख प्रतोद या पदावर नियुक्ती केली. विरोधी पक्षनेते कामत यांनी तशी माहिती दिली. रेजिनाल्ड हे सध्या पक्षापासून दूर राहत असल्याचे दिसून येत होते. त्यांना विरोधी पक्षनेते व्हायचे होते, त्यानंतर किमान प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळावे, असे त्यांना वाटत होते. सातत्याने पक्षाकडून आपल्याला डावलले जाते, अशी त्यांची भावना तयार झाली होती. त्यामुळे त्यांना मुख्य प्रतोदपद देण्यात आले आहे. आज ते विधिमंडळ गटाच्या बैठकीसाठी उपस्थित होते.

संबंधित बातम्या