खंवटेंच्या अटकेवरून विरोधक आक्रमक

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

विधानसभेचे कामकाज विरोधकांनी चारवेळा रोखले, काळ्या फिती बांधून केला निषेध

गोव्याच्या इतिहासातील ही वाईट घटना आहे. सभापती हे सभागृहाचे वडील व आमदार हे त्यांची मुले आहेत.

पणजी : राज्यात सुरू असलेल्या अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी माजी महसूलमंत्री व पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेला सभापतींनी परवानी दिल्याने संयुक्त विरोधकांनी विधानसभा कामकाज वारंवार हल्लाबोल करून रोखले.

‘शेम शेम’ अशा घोषणा देत सभापतींच्या आसनासमोरील हौदात धाव घेऊन दिल्या. त्यामुळे सभापतींनी प्रश्‍नोत्तर तासावेळी दोनदा, शून्य तास तसेच दुपारी एकदा मिळून चारवेळा कामकाज तहकूब केले. या विरोधकांनी काळ्या फिती हाताला बांधून सभापतींच्या निर्णयाचा निषेध केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाचा प्रश्‍नोत्तराचा तास आज सकाळी ११.३० वा. विधानसभा कामकाज सुरू झाले अन् संयुक्त विरोधकांनी उभे राहून सभापतींना आमदार रोहन खंवटे यांना अटकेसाठी दिलेल्या परवानगीसंदर्भात न्याय देण्याची मागणी केली.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी अधिवेशन सुरू असताना आमदाराला अटकेसाठी परवानगी देण्याची घटना ही अलोकशाही व बेजबाबदारपणाची आहे. त्यामुळे आमदारांचे ते हित जपणार नाही का? असा प्रश्‍न करत अटकेला दिलेल्या परवानगीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावेळी इतर सर्व विरोधक आमदारांनीही त्याला दुजोरा देत कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभापती राजेश पाटणेकर यांनी सांगितले की आमदार रोहन खंवटे यांच्याविरुद्ध भाजपचे पदाधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांनी केलेल्या तक्रारीत पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार विधीमंडळ कायद्यातील नियमानुसार निर्णय दिला, असे स्पष्ट केले.

आमदार रोहन खंवटे यांच्याविरुद्ध जे आरोप करण्यात आले त्या घटनेवेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे होते तर मी त्यांच्या पुढे होतो. त्यामुळे या प्रकरणाची प्राथमिक चौकशी न करता अटकेची परवानगी कशी दिली? असा प्रश्‍न आमदार दिगंबर कामत यांनी केला. सभापतींनी दिलेली परवानगी हा हक्कभंग होऊ शकतो असे आमदार प्रतापसिंह राणे म्हणाले. त्यानंतर सर्व विरोधक सभापतींसमोरील हौदात गेले व ‘शेम शेम’ अशा घोषणा दिल्या. सभापतींनी त्या सर्वांना जागेवर बसण्यास सांगितले मात्र त्यांनी हे आंदोलन सुरू ठेवल्याने विधानसभा कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले.

दुपारी १२ वाजता विधानसभा कामकाज पुन्हा सुरू झाले. यावेळी आमदार सुदिन ढवळीकर यांनी सभापतींना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. सभापतींनी दिलेला निर्णय हा लोकशाहीचा काळा दिवस ठरला आहे. सभासद सभागृहात लोकांच्या समस्या मांडण्यास येतात असे सांगण्याचा प्रयत्न करत होते तर इतर विरोधकही त्यांना साथ देत होते. कामकाजात अडथळे आणू नका असे सभापतींनी त्यांना सुनावले व प्रश्‍न विचारा अशी सूचना केली. त्यावेळी सर्व विरोधक पुन्हा हौदात धावले. ‘शेम शेम’ अशा घोषणा देणे सुरूच राहिल्याने दुसऱ्यांदा कामकाज दुपारी १२.३० पर्यंत तहकूब करण्यात आले.

शून्यतासाचे कामकाज दुपारी १२.३० वाजता सभापतींनी सुरू केले. यावेळी आमदार दयानंद सोपटे यांना समस्या मांडण्यास सांगितले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी पुन्हा कामकाजात अडथळे आणले व सर्व विरोधकांनी त्याला पाठिंबा देत हौदात धाव घेऊन अगोदर न्याय द्या अशी मागणी केली. यावेळी त्यांनी भाजप प्रदेश युवा मोर्चातर्फे आमदार खंवटे यांच्या निलंबनाची मागणी करणारे निवेदन सभापतींना देण्यात आल्याचा पुरावा सभागृहात दाखवला. त्यावेळी सभापतींनी त्याची दखल घेऊन काही निर्णय घेतलेला नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक ऐकण्यास तयार नसल्याने सभापतींनी तिसऱ्यांदा विधानसभा कामकाज दुपारी २.३० पर्यंत तहकूब केले.
दुपारी २.३० वाजता सभापतींनी विधानसभेसमोरील कामकाजाला सुरुवात केली.

महत्त्वाकांक्षी संकल्पांचा अर्थसंकल्प

सभागृहासमोर असलेला अभिनंदनाचा ठराव, शोक ठराव तसेच लक्ष्यवेधी सूचना घाईघाईने पुकारत मांडण्यास सांगितले. आमदार आंतानासिओ मोन्सेरात यांनी माजी केंद्रीयमंत्री व माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यास सुरुवात केली. आमदार विजय सरदेसाई यांनी ‘शेम शेम’ अशा घोषणा देत न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर पुन्हा चौथ्यांदा सर्व विरोधक हौदात धावले व कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने सभागृहाच्या पटलावर त्यांच्या खात्याचे दस्ताऐवज ठेवले. मुख्यमंत्र्यांनी घाई गडबडीत खासगी विद्यापीठ विधेयक सभागृहात सादर केले व अर्थसंकल्प ३ वा. मांडण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सभापतींना सांगितले. विरोधकांच्या घोषणा सुरूच राहिल्याने सभापतींनी चौथ्यांदा कामकाज तहकूब केले.

दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडून त्याचे वाचन सुरू केले असता विरोधकांनी पुन्हा त्याला अडथळे आणले. वारंवार ताकीद व समज सभापतींनी त्यांना दिली मात्र अखेर त्यांना सभागृहाच्या मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढण्यात आले.

विधानसभेतील कामकाज घटनाक्रम
स. ११.३० वा. - प्रश्‍नोत्तर तासावेळी विरोधकांचा हल्लाबोल.

स.११.४५ वा. - विधानसभा कामकाज १२ वा.पर्यंत तहकूब.

दु. १२ वा. - प्रश्‍नोत्तर काम सुरू होताच पुन्हा विरोधक आक्रमक.

दु. १२. ०७ वा. - विधानसभा कामकाज १२.३० वा. पर्यंत तहकूब

दु. १२.३० वा. - शून्यतास सुरू होताच विरोधकांच्या घोषणा सुरूच.

दु. १२.३७ वा. - विधानसभा कामकाज दु. २.३० पर्यंत तहकूब.

दु. २.३० वा. - विरोधकांचा विरोध तरी सभापतींनी कामकाज पुकारले.

दु. २.४५ वा. विधानसभा कामकाज ३ वा. पर्यंत तहकूब

दु. ३ वा. - अर्थसंकल्पाचे वाचन सुरू, विरोधकांचा पुन्हा गोंधळ.

दु. ३.०७ वा. - सभापतींनी विरोधकांना सभागृबाहेर काढले.

दु. ३.५५ वा. - मुख्यमंत्र्यांचे अर्थसंकल्प वाचन पूर्ण

 

संबंधित बातम्या