निर्देश देऊनही खासगी दवाखाने बंदच

dainik gomantak
शुक्रवार, 24 एप्रिल 2020
निर्देश देऊनही खासगी दवाखाने बंदच

पणजी,

‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लॉकडाऊन काळात खासगी दवाखान्यांवर बंदी उठविण्यात आली असल्याचा निर्देश जारी करून आठवडा उलटून गेला तरी हे दवाखाने अजूनही सुरू झालेले नाही. हे दवाखाने खुले न केल्यास योग्य ती कारवाईचा इशाराही आरोग्य खात्याने दिला होता, मात्र पुढे काहीच कारवाई झाली नाही. या खासगी दवाखान्यांअभावी राज्यातील अनेक वृद्ध तसेच बाल रुग्णांचे हाल होत आहेत. हे खासगी दवाखाने खुले करण्यास सरकारने सक्ती करावी अशी रुग्णांची मागणी आहे.
सरकारी आरोग्य केंद्रे व खासगी दवाखाने खुले करण्याचे निर्देश जारी केले आहेत. काही भागात खासगी इस्पितळे सुरू होऊन रुग्णांची तपासणी सुरू झाले असली तरी दवाखाने खुले झालेले नाहीत. आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी असल्याने लोकांची गैरसोय होत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील बाह्यरुग्ण विभाग अजून सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ह्रदयविकार किंवा गंभीर आजाराच्या तपासणीसाठी दवाखाने खुले नसल्याने पर्याय म्हणून खासगी इस्पितळात जाण्याची पाळी येते. इस्पितळात गेल्यावर रुग्णांची तपासणी करून दाखल केले जाते. या खासगी महागड्या इस्पितळातील उपचार हे गरीब व सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांना शक्य होत नाही. जे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत त्या डॉक्टरांनीही दवाखाने लॉकडाऊन झाल्यापासून खुले केलेले नाही त्यामुळे मोठी कुचंबणा होत आहे.
राज्यात असलेल्या आरोग्य केंद्रातील सुविधा मर्यादित असल्याने व खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्या डॉक्टरांकडेच सध्या उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला या केंद्रातील डॉक्टरांकडून दिला जातो. पणजीतील अनेक खासगी दवाखाने अजूनही खुले झालेले नाहीत. कोविड - १९ च्या भीतीमुळे अनेक खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. उपचारासाठी येणारे रुग्ण हे ताप, खोकला व सर्दीचे असू शकतात व त्यांच्यावर उपचार करताना संसर्ग आलेल्या इतर रुग्णांना होण्याची शक्यता असते. एखाद्या रुग्णांचा संशय आला व तो इतर रुग्णांसमवेत दवाखान्यात बसून उपचारासाठी आला तर त्याच्यासह इतरांनाही क्वरांटाईन करण्याची पाळी येऊ शकते म्हणून सावधागिरी म्हणून हे दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती एका डॉक्टरने दिली. काही डॉक्टर हे वृद्ध आहेत व काहींची मुले पाच वर्षापेक्षा लहान आहेत त्यांना दवाखाने खुले करण्यातून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, पणजीत एकच नगर आरोग्य केंद्र असल्याने या ठिकाणी लोकांची तपासणीसाठी मोठी रांग असते. ताळगाव तसेच सांताक्रुझ या दोन्ही मतदारसंघात आरोग्य केंद्रे नाहीत. त्यामुळे लोकांना अधिक तर खासगी दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागते. दवाखाने खुले नसल्याने खासगी इस्पितळात जायचे झाल्यास स्थानिक बस वाहतूक सुरू झालेली नाही तसेच टॅक्सी व रिक्शा वाहने नाहीत. दुचाकीने गेल्यास लॉकडाऊनच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वामुळे पोलिस अडवतात. त्यामुळे रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे खासगी दवाखाने खुले झाल्यास ही समस्या कमी होऊ शकते. यासंदर्भात आरोग्य खात्याच्या संचालकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

 

संबंधित बातम्या