गोव्यात अन्य दुकाने उघडण्यास मुभा

Dainik Gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एकटी असलेली दुकाने, गृहनिर्माण संकुलातील दुकाने उघडी करता येतील. मार्केट संकुलातील दुकाने उघडता येणार नाहीत. ई वाणिज्य सेवा केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच असेल. मद्य व तत्सम पदार्थ विक्रीवरील बंदी ३ मे पर्यंत कायम आहे.

पणजी

बांधकाम, वीज, प्लंबिंग अशा विविध वस्तू दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचा केंद्राचा निर्णय राज्य सरकारने लागू करण्याचे ठरवले आहे. मात्र सलून,स्पा, थिएटर, मद्य विक्री मात्र ३ मे पर्यंत बंद राहील. राज्याबाहेर अडकलेले गोमंतकीय विद्यार्थी तेथील जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन राज्यात येऊ शकतील. त्यांची कोविड १९ साठी चाचणी घेऊन त्यांना राज्यात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक आहे त्यानंतरच टाळेबंदी वाढणार की नाही यावर भाष्य करता येईल असे त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.
ते म्हणाले, विदेशी नागरीक असलेल्यांना गोव्यात यायचे असल्यास त्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दीड हजार जणांची तपासणी आजवर केली आहे. सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार शंभर जणांची चाचणी केली गेली आहे. कोणालाही कोविड १९ चा संसर्ग झालेला नाही. मान्सूनपूर्व आरोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही राज्यात सुरु झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर त्याची अंमलबजावणी केली जात आहे. शंभर थर्मल गन वापरणे सुरु केले आहे. अद्यापही काही उद्योगांना थर्मल गन मिळालेली नाही त्यांनी सरकारशी संपर्क साधावा, त्यांना ती उपलब्ध केली जाणार आहे.
सर्जिकल मास्क हा केवळ इस्पितळात वापरला जातो. तो कोणीही वापरू नये, त्याच्या विल्हेवाटीसाठी नियम आहेत. प्रत्येकाने कपड्याचेच मुखावरण (मास्क) वापरावे. औषधालयांनीही सर्जिकल मास्कची विक्री जनतेला करू नये असे सांगून ते म्हणाले, मारेला डिस्कवरील ६६ खलाशी उद्या गोव्यात येण्यास मुंबईतून निघतील. १० हजार ५०० मुखावरणे स्वयं सहाय्य गटांनी तयार करून दिली आहेत. जनतेला ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध केली जातील. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामावर ४ हजार ६६१ कामगार रुजू झाले आहेत. ५६ माहिती तंत्रज्ञान कंपन्यांत ४५० जणांनी काम सुरु केले आहे. सर्व औषध निर्मिती कंपन्या सुरु आहेत.रास्त धान्य दुकानांतील वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक दुकानावर सरकारी कर्मचारी यापुढे उपस्थित राहील, तसा निर्णय आज घेण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले, अजूनही काही विदेशी नागरीक राज्यात आहेत. आजवर ५ हजार ९३३ विदेशी नागरीक मायदेशी रवाना झाले आहेत. ३० खास विमाने त्यासाठी सोडण्यात आली होती. ३.३७ लाख लीटर सॅनिटायझर्स राज्यात तयार करण्यात आले आहेत. गाड्यांतून किराणा माल वितरण सुरुच राहणार आहे.
फेरीबोट सेवा आवश्यकतेनुसार सुरु केली जाणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एकटी असलेली दुकाने, गृहनिर्माण संकुलातील दुकाने उघडी करता येतील. मार्केट संकुलातील दुकाने उघडता येणार नाहीत. ई वाणिज्य सेवा केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच असेल. मद्य व तत्सम पदार्थ विक्रीवरील बंदी ३ मे पर्यंत कायम आहे. घाऊक आणि किरकोळ मद्यविक्री बंद राहील. हार्डवेअर, बांधकाम साहित्य, विजेचे साहित्य, प्लंबिंग साहित्य विकणारी दुकाने उघडता येतील. त्यांनी केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांसह ती उघडावीत.त्यांना अन्य कोणत्याही परवानगीची गरज नाही. मात्र त्यांनी सॅनिटायझर्स व मुखावरण वापरणे आदींचे पालन करतानाच समाज अंतर राखले पाहिजे. समाज अंतर राखले नाही अशी तक्रार आली आणि पोलिसांना त्यात तथ्य आढळले तर ते दुकान तत्काळ बंद केले जाईल आणि ३ मे पर्यंत उघडता येणार नाही. 

जगभरात असलेल्या गोमंतकीयांना परत आणण्यासाठी प्रक्रीया निश्चित करावी अशी विनंती पंतप्रधान तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाला केली आहे. भारतीयांना देशात परतू द्यावे असे आम्हाला वाटते. इतर राज्यात असलेले गोमंतकीय विद्यार्थी परत यावेत असे प्रयत्न आहेत.त्या विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. त्यांची सीमेवर तपासणी करण्याची व्यवस्था केली आहे. घऱ दुरुस्तीची कामे सुरु करण्यास हरकत नाही. बांधकाम साहित्याच्या वाहतुकीसाठी पंचायत परवाना चालेल. काहींनी नवे घर बांधणीसाठी पंचायतीची परवानगीच घेतलेली नाही त्यांना काम करण्यात अडचण येत आहे. जून्या घराला दुरूस्तीसाठी पंचायत परवानगी देणार आहे. चिरे व खडी उपलब्ध आहे. रेतीचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. मुंबईतील खलाशी आणण्याबाबत जहाजाच्या मालकाने निर्णय घ्यावयाचा आहे.त्यांना खासगी विलगीकरण कक्षात रहायचे असेल तर दिवसा तीन ते चार हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

संबंधित बातम्या