पाडव्यानंतर अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताला ‘टाळा‘

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीतील कोट्यवधींचे उलाढाल ठप्प

पणजी,

 

सोने, वाहन किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी मुहूर्त शोधले जातात. त्यात गुढीपाडवा आणि अक्षय तृतीय हे साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने यादिवशी अशा प्रकारची खरेदी व्यवहार मोठे होतात. परंतु सध्या ‘कोविड १९‘च्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या टाळेबंदीमुळे ता. २३ मार्चपासून राज्यातील वरील तिन्ही व्यवहार ठप्प झाले आणि सुमारे तिन्ही क्षेत्राचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
पाडवा आणि अक्षय तृतीया या दोन्ही मुहुर्तावर घराघरात नवीन वस्तू घेण्याचा अनेकांचा बेत असतो. अनेकजण दरवर्षी या मुहुर्तावर सोने खरेदी करतातच. त्यातच लग्नसराईमुळे दिलेल्या सुवर्ण अलंकार घडविण्यासाठी दिलेल्या ऑर्डरमधून मोठी उलाढाल होते. राज्यात स्थानिक सुवर्णकारांची दुकाने असली तरी परराज्यातील मोठमोठ्या नामवंत व्यापाऱ्यांची दुकानेही महत्त्वाच्या शहरात आहेत. २५ मार्चचा गुढीपाडव्याचा मुहुर्त टळल्यानंतर १४ दिवसांच्या टाळेबंदीनंतर टाळेबंदीत शिथिलता येईल, असे वाटत होते. परंतु देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत गेले आणि टाळेबंदीची मर्यादा वाढली ती ३ मेपर्यंत पोहोचली. त्यामुळे गुढीपाडव्याला नाहीतर अक्षय तृतीयाला सोने किंवा नवी वस्तू घरी आणण्याचे अनेकांचे बेत फसले.
उत्तर गोवा ज्युलेर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष बाळकृष्ण वेर्णेकर यांनी सांगितले की, दोन्ही मुहुर्तामुळे साधारण सोने खरेदी व्यवहारात राज्यात सुमारे एक अब्ज रुपयांची उलाढाल ठप्प झाली. अनेकांनी विवाहाचे मुहुर्त साधून अलंकार बनविण्यास दिलेत, पण ते अजूनही नेले नाहीत. गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणारा वर्ग निर्माण झाला होता, आता यावर्षीच्या टाळेबंदीमुळे तो कायम राहील की नाही, हे सांगता येत नाही.
राज्यातील इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायातील प्रसिद्ध व्यवसायिक आपा तळावलीकर यांनी सांगितले की, गत वर्षी दोन्ही मुहुर्तावर साधारण सव्वा कोटींचे व्यवहार झाले होते. आमच्या दुकानातच सुमारे २०० च्या आसपास वस्तूंची विक्री झाली होती. दरम्यान, वाहन व्यवसायातील दुर्गा मोटर्सचे अशोक सप्रा यांनी सांगितले की, या दोन्ही मुहुर्तावर वाहने लोक घेऊन जातात. ती वाहने एक महिने अगोदरच बुक करून ठेवलेली असतात. राज्यात गतवर्षी सरासरी साडेतीन हजार दुचाक्या आणि दोन ते अडीच हजार कार विक्री झाली आहे, पण तेवढी खरेदी होणार नाही. राज्याचा विचार केला तर वर्षभरात सरासरी वाहन खरेदीत २०० ते २२५ कोटींचा व्यवहार होतो, तेवढा व्यवहार यावर्षी होणार नाही.

..................चौकट.................
अंदाजीत रक्कमेचे व्यवहार ठप्प
सोने खरेदीत ८० ते १०० कोटी
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी सव्वा कोटी
वाहन खरेदीत २०० ते २२५ कोटी

संबंधित बातम्या