पेन किलर की स्लो किलर

डॉ. विरजा स्व. वेर्लेकर
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पेन किलर टाळा व डोकेदुखी मुक्त व्हा!

ही पेन किलरची सवय टाकून डोकेदुखी, फार सोप्या उपयांनी कशी बंद करता येईल ते आजच्या लेखात पाहूया..

आरोग्यायण : अनेक छोट्यामोठ्या कारणांमुळे डोकेदुखी सारखा फारच मामुली वाटणारा त्रास; परंतु काही वेळा सहनशक्तीच्या पलीकडे जातो. दुखणे फार नसते; पण त्याबरोबरच्या अस्वस्थतेची भावना नकोशी वाटणारी असते. मग ही डोकेदुखी त्वरित थांबविण्यासाठी पटकन एक पेनकिलर खाल्ली जाते व त्वरित अर्ध्या पाऊण तासात आराम मिळवला जातो.

ही सवय अगदी सर्वांना असते. परंतु ही त्वरित आराम देणारी पेनकिलरची सवय लागते व अशा अनंत गोळ्या नियमितपणे पोटात जाऊ लागतात. या गोळ्यांमुळे कालांतराने आम्लपित्त, छातीत जळजळणे, भूक न लागणे, वारंवार पोट बिघडणे इत्यादी त्रास होऊ लागतात. परंतु डोकेदुखी मात्र पिच्छा सोडत नाही. ती परत परत व आता तर थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने उद्‌भवत राहते.

सामान्य डोकेदुखीची काही ठळक कारणे :
काही विशेष कारण नसताना होणारी डोकेदुखी उदा. उन्हात गेल्यानंतर, थंड हवा लागल्यानंतर, अति तीव्र सुगंधामुळे इत्यादी कारणांमुळे होणारी डोकेदुखी.
सर्दी, पडशाच्या त्रासामुळे होणारी डोकेदुखी.
डोळ्यांवर ताण येणे
रक्तदाबाची तक्रार
मासिक पाळी पूर्वी होर्मोनल बदल झाल्यामुळे होणारी डोकेदुखी.
काहीही विशेष कारणाशिवाय होणारी डोकेदुखी.

या प्रकारची डोकेदुखी ही मनाची मरगळ या कारणामुळे उद्‌भवते. ती घालवण्यासाठी ध्यानधारणा किंवा शवासनाचा प्रयत्न (तज्ज्ञांकडे शिकून मगच आचरणात आणावा) करावा.
हे करीत असताना झोप लागून डोके व मन शांत होते व डोकेदुखी थांबते. ही झोप केवळ १० - १५ मिनिटांची असली तरी खूप फरक पडतो.
त्यानंतर थोड्या प्रमाणात काहीतरी अन्न, आहार घ्यावा. तिखट, तेलकट, मसालेदार टाळावे. त्याबरोबर एखादा द्रव आहार जसे चहा, लिंबू सरबत किंवा नुकतेच ग्लासभर थंड पाणी घ्यावे.

सर्दी पडशाचा त्रास :
अनेक वेळा सर्दी पूर्णपणे नाकातून न वाहता चेहरा कानामागील बाजू व डोक्‍याच्या टाळूवरील (सायनस) पोकळ्यात (कॅवेटी) साठून राहते व डोकेदुखी उद्‌भवते.
अशावेळी दोन मूठभर ओवा न भाजता एका रुमालात पुरचुंडी, पोटली करुन बांधावा. ही पोटली गरम तवा किंवा गरम इस्त्रीवर फिरवून त्याचा शेक कपाळ, डोक्‍यामागची बाजू (जिथे डोके संपते ती जागा) इथे शेक घ्यावा.
१५ -२० मिनिटे असा शेक दर दोनतीन तासांनी घ्यावा, त्यामुळे म्युकस, सर्दी पातळ होऊन नाकातून वाहू लागेल व डोके हलके होऊन दुखणे थांबेल.

अर्धशिशी/ मायग्रेन :
ही एक व्याधी आहे. त्यावर होमिओपॅथीक औषधे अत्यंत फायदेशीर ठरतात. परंतु या विचित्र दुखण्यावर थोडा दिलासा मिळावा म्हणून : व्यक्तीने काळोख्या खोलीत बसावे. शक्‍यतो आवाज, प्रकाश यापासून दूर.
दुखणे कमालीचे असेल तेव्हा फक्त थोडे थोडे पाणी पीत रहावे.
डोक्‍याची टाळू व पोटाच्या वरचा (जठराचा) भाग यावर एकाच वेळी बर्फ व गरम पाण्याने आलटून पालटून शेकावे. म्हणजे डोक्‍यावर आईस बॅगेने शेकत असताना पोटावर हॉट वॉटर बॅगेने शेकावे. हा क्रम २ - ३ मिनिटांनी उतरा करावा. असे १५ -२० मिनिटे दर २ -३ तासांनी शेकावे.
डोके हलके वाटल्यावर हलका आहार घ्यावा (ज्यात मसाले, तेल व तूप असे जड व आम्लयुक्त पदार्थांचा कमी वापर असेल) त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार दिलेले औषधोपचारही करावेत.
जीवनशैलीचे सुचविलेले बदल, आहार, झोप, काम व कामाचा ताण याचे गणित न चुकता मांडण्याचा प्रयत्न नियमित करीत रहावा.

रक्तदाब, डोळ्यांवरील ताण :
वयपरत्वे येणारा रक्तदाब किंवा इतर कारणे जसे काही व्याधी, स्थूलपणा, मधुमेह, अनुवांशिकता, यामुळे असणाऱ्या रक्तदाबामुळे काहीजण रोजच्या रोज तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार गोळी घेतात.
तरीही रोजच्या रुटीनमधील फरक, हवामानातील बदल मानसिक ताण यामुळे डोकेदुखी उद्‌भवू शकते. अशावेळी थंड पाणी प्यावे, पंख्याखाली बसावे. कपाळ व डोक्‍यावरील टाळू याभागी बर्फाचा शेक घ्यावा : १५ - २० मिनिटे.
डोळ्यावर रुमाल ठेवून प्रकाश आडवावा. झोप लागली नाही तर ३० - ३५ मिनिटे आडवे रहावे.
डोकेदुखी बऱ्याच प्रमाणात खाली येईल. तसे न झाल्यास डॉक्‍टरांच्या मदतीने किंवा घरी असलेल्या मशीनवर रक्तदाब मोजून डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

हार्मोनल बदल :
अनेक स्त्रीयांना मासिक पाळीपूर्वी शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे अचानक डोकेदुखी उद्‌भवते. अशावेळी ही तात्पुरती डोकेदुखी उतरवण्यास, दिवसभरात जास्तीत जास्त द्रव आहार घ्यावा. जसे ताक, लस्सी, शहाळ्याचे पाणी, फळांचे रस इत्यादी. मोकळ्या हवेवर १५ -२० मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. नियमित व्यायाम करीत असल्यास ते चुकवू नयेत. निक्षून २ - ३ फळे दिवसभरात खावीत. शक्‍यतो चवीला फिका आहार दर ३- ४ तासांनी घ्यावा. हे सर्व उपाय हार्मोनल बदलामुळे होणारे तात्पुरते परिणाम, जसे शरीराचे तापमान, रक्तदाब इत्यादी आटोक्‍यात ठेवण्यास मदत करतात.

उन्हाळ्याचा त्रास :
अतिशय उन्हाळ्यामुळे (कोरडा किंवा दमट) शरीरातील पाणी, जीवनसत्त्वे व क्षारांचा अचानक मोठ्या प्रमाणात त्रास होऊन डोकेदुखी उद्‌भवते.
दिवसातील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढवावे. जरी वातानुकूलीत जागेत असाल तरी वेळोवेळी पाणी / द्रव आहार घ्यावा.
टरबूज वर्गातील फळे, कलिंगड, पपया, चिबुड, टरबूज ही खावीत.
त्याप्रमाणे शहाळ्याचे पाणी प्यावे.
आडवे न पडता पाठ टेकून डोळे मिटून शांत बसावे. जरा जास्त प्रमाणात मीठ, साखर घालून लिंबाचे सरबत घ्यावे.
डोकेदुखी कसल्याही कारणामुळे असो, होमिओपॅथीक औषधे डोकेदुखीवर सदैव प्रभावशाली ठरलेली आहेत.
पण होमिओपॅथीक औषधे, होमिओपॅथीक डॉक्‍टरच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.

 

 

संबंधित बातम्या