मोजक्याच नगरसेवकांना बैठकीला निमंत्रण!

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजी: रंगपंचमीच्या दिवशी पणजी भाजपमधील गटातटाचे दर्शन घडले. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी पक्षाला मानणारे नगरसेवक मनाने अद्याप त्यांच्याशी जुळवून घेत नाहीत (वरवरून घेतात) असे दिसते. महापौर आणि उपमहापौर निवड ही आमदार बाबूश मोन्सेरातच ठरवणार असल्याने, हा फक्त पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांची मते जाणून घेण्यामागचे कारण काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पणजी: रंगपंचमीच्या दिवशी पणजी भाजपमधील गटातटाचे दर्शन घडले. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी पक्षाला मानणारे नगरसेवक मनाने अद्याप त्यांच्याशी जुळवून घेत नाहीत (वरवरून घेतात) असे दिसते. महापौर आणि उपमहापौर निवड ही आमदार बाबूश मोन्सेरातच ठरवणार असल्याने, हा फक्त पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांची मते जाणून घेण्यामागचे कारण काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

रंगपंचमीच्या दिवशी पणजी शिमगोत्सव समितीची मिरवणूक निघते, ती मिरवणूक आमदाराच्या उपस्थितीत समिती काढत आली आहे. यापूर्वी मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत ती निघत होती, त्यांच्या पश्‍चात आता यावेळी आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत निघाली. तत्पूर्वी काल पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष शुभम चोडणकर आणि उत्पल पर्रीकर यांच्या समर्थकांचा महालक्ष्मी मंदिर येथे सर्वांनी रंगपंचमीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करणारे निरोप मोबाईलवरून फिरत होते. आज सकाळी ९ वाजण्यापूर्वीच उत्पल पर्रीकर यांनी महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले आणि तेथून काही वेळातच त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत पणजी शिमगोत्सव समितीची मिरवणूक महालक्ष्मी मंदिराकडून आझाद मैदानावर आली. मिरवणूक मैदनावर पोहोचल्यानंतर काही वेळाने माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विशेष बाब म्हणजे पणजी भाजप मंडळाने शिमगोत्सव समितीच्या मिरवणुकीत सहभागी होण्याचे केलेले आवाहन अध्यक्ष व मोजक्याच नगरसेवकांनी पाळले.

सायंकाळी भाजप मंडळाचे अध्यक्ष शुभम चोडणकर यांनी नगरसेवकांना भाजपच्या कार्यालयात सायंकाळी बैठकीस बोलाविले. त्या बैठकीस मिनीन डिक्रुज, पुंडलिक राऊत देसाई, प्रमेय माईनकर, किशोर शास्त्री, दीक्षा माईणकर, शितल नाईक, वैदही नाईक, वसंत आगशीकर यांची उपस्थिती होती. तर शेखर डेगवेकर आणि रेखा कांदे हे नगरसेवक अनुपस्थित होते. या बैठकीस संघटक सतीश धोंड, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची उपस्थिती होती. महापौर आणि उपमहापौर निवडीच्या विषयावर उपस्थित नगरसेवकांची मते जाणून घेण्यात आली आणि पक्ष सांगेल तो निर्णय आम्ही माणू, असे सर्वांनी सांगितले. परंतु मोजक्याच नगरसेवकांना बोलावून त्यांची मते जाणून घेण्यामागे कारण बैठकीतील उपस्थितांना चांगलेच माहीत आहे.

भाजपचाच महापौर, उपमहापौर

काही मोजक्याच नगरसेवकांना बैठकीला बोलाविण्याचे कारण काय, असा सवाल मंडळ अध्यक्ष शुभम चोडणकर यांना केला असता ते म्हणाले की, आम्ही काही नगरसेवकांची मते जाणून घेतली. भाजपचाच महापौर आणि उपमहापौर होणार आहे. कोणत्याही गटा-तटाचे राजकारण नाही, सर्वजण एकत्र आहोत. पणजीच्या विकासासाठी सर्व नगरसेवक काम करीत आहेत आणि पुढेही करणारच आहेत.
- शुभम चोडणकर, अध्यक्ष, पणजी भाजप मंडळ.
 

संबंधित बातम्या