पुढील दीड वर्षात ५० पंचायत घरे बांधणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पंचायतमंत्री गुदिन्हो यांची माहिती, निधी कमतरतेमुळे अडचण

गोवा सरकारच्या दिनदयाळ साधनसुविधा योजनेमार्फत ५० हून अधिक राज्यात पंचायत घरे, मार्केट संकुल तसेच पंचायत सभागृहाचे बांधकाम केले आहे. पंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमध्येही अडीच कोटीवरून साडेतीन कोटी वाढ करण्यात येणार आहे.

पणजी :  राज्यातील मतदारसंघामध्ये पंचायत घर, मार्केट, पंचायत सभागृह यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. सरकारकडे निधीची कमतरता असल्याने एकाच मतदारसंघामध्ये दोन पंचायत घरांचे बांधकाम शक्य नाही. केंद्राकडून जादा निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.

पुढील दिड वर्षात राज्यात ५० पंचायत घरे बांधण्यात येणार आहे त्यामध्ये सांताक्रुझचा समावेश आहे, असे उत्तर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी आज विचारलेल्या प्रश्‍नावर दिले.

सांताक्रुझ मतदारसंघातील पंचायत घर असलेल्या इमारती धोकादायक बनल्या असून त्याच्या छप्पराचे तुकडे पंचायतमध्ये येणाऱ्या लोकांवर पडण्याचे प्रकार घडले आहेत. पंचायत असलेल्या धोकादायक इमारतीच्या सुरक्षिततेसाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत का? सांताक्रुझ पंचायत असलेली इमारत मोडकळीस आली असल्याने त्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात येणार आहे असा प्रश्‍न आमदार टोनी फर्नांडिस यांनी केला. या इमारतीला सुमारे ३० वर्षे झाली असून अभियंत्यामार्फत त्याच्या स्थिरतेची तपासणी करण्यात आली आहे. सांताक्रुझ मतदारसंघात चिंबल, मेरशी व सांताक्रुझ या तीन पंचायती आहेत त्यासाठी पंचायत खात्यातर्फे पंचायत घरे बांधून दिली जावीत, अशी मागणी त्यांनी केली.

सांताक्रुझ पंचायतीकडून खात्याकडे पंचायत घरासाठी अर्ज आलेला नाही, जर आल्यास त्यावर विचार केला जाईल. हे सरकार सर्व मतदारसंघात विकास करत आहे, मात्र जरा निधीची अडचण आहे. त्यामुळे सांताक्रुझ मतदारसंघातील तीनपैकी एक पंचायत घर बांधून दिले जाईल मात्र कोणत्या पंचायतीसाठी बांधावे हे स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांनी सांगावे. निधीच्या कमतरतेमुळे केंद्रीय पंचायतमंत्र्यांना दिल्लीत भेटून जादा निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले.

वाहतूक खात्याकडून उत्तरे देण्यात तांत्रिक चूक

संबंधित बातम्या