परप्रांतियांची यादी पंचायती करणार तयार

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020
परप्रांतियांची यादी पंचायती करणार तयार

पणजी,

केंद्र सरकारने टाळेबंदी काळात अडकून पडलेल्या व ज्यांना आपल्या गावी परतण्यास इच्छुक आहे अशांना प्रवास परवाना देण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. त्यामुळे गोव्यात अशा परप्रांतीयांची यादी पंचायती तयार करतील व त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे परवान्यासाठी सादर देतील. या परप्रांतीयांना बससेवा उपलब्ध केली जाईल मात्र प्रवास खर्च त्यांनाच करावा लागणार आहे, अशी माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
राज्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, शॅक्स, कसिनो तसेच जलक्रीडा व्यवसायामध्ये परप्रांतीय गोव्यात कामाला होते. मात्र, टाळेबंदी झाल्याने ते गोव्यात अडकून पडले. त्यांना अन्नासाठी हिंडावे लागत आहे. अनेकांना गावी परतायची इच्छा आहेच. परंतु केंद्र सरकारच्या लॉकडाऊन काळात गोव्याने सीमा बंद करून प्रवेश करण्यास तसेच बाहेर जाण्यास बंदी घातली होती. केंद्र सरकारने नव्याने जारी केलेल्या निर्देशामुळे या परप्रांतियांना त्यांच्या गावात पाठविण्यासाठी एक आराखडा करण्यासंदर्भातचे निवेदन उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या नव्या निर्देशानुसार उद्यापासूनच प्रवास परवाने ऑनलाईनवरून दिले जातील असे यावेळी मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक पंचायत आपापल्या क्षेत्रात असलेल्या ज्या परप्रांतियांना गावी परतायचे आहे त्यांची सविस्तर माहिती घेऊन तयार करणार आहे. अनेक परप्रांतीय कामानिमित्त किनारपट्टी भागातील हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, शॅक्स व इतर व्यवसाय असल्याने त्यांना लॉकडाऊनमुळे घरी परतणे शक्य झाले नाही. या परप्रांतीयांची जिल्हावार यादी तयार करून कदंब महामंडळाच्या तसेच खासगी बसगाड्यांतून पाठविले जाणार आहे. मात्र त्यासाठी या परप्रांतियांना स्वखर्च करावा लागेल किंवा त्यांना शक्य नसल्यास त्यांच्या राज्यातील सरकारने खर्च द्यावा लागणार आहे. गोव्यातील परप्रांतीयांना गोव्यातून पाठविण्यासाठी सरकार तत्परतेने पावले उचलत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनलाईनवरून ना हरकत परवाना मिळाल्यावर लगेच त्यांना पाठविण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. परप्रांतियांना गोव्यातून त्यांच्या गावी पाठवण्याबाबत सरकार गंभीर आहे. राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतियांची संख्या बरीच मोठी असण्याची शक्यता आहे. ज्यांना आपल्या राज्यात परतायचे आहे त्यांना सर्वतोपरी मदत गोवा सरकारतर्फे केली जाणार आहे, असे मंत्री मायकल लोबो म्हणाले.

किनारी भागात परप्रांतीय अधिक
पर्यटन क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यवसायामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कळंगुट, कांदोळी, हडफडे व नागोआ या भागातच सुमारे २५ हजारांहून अधिक परप्रांतीय कामगार आहेत. इतर भागातील समुद्रकिनारी भागात परप्रांतीय आहेत मात्र त्यापैकी कितीजण इच्छुक आहेत याचाही सर्वे करण्यात येत आहे. या परप्रांतियांच्या हातांना काम नाही त्यामुळे ते घरी पतरण्यास इच्छुक आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्था सरकारने करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या