पंकज सायनेकर याला मानद डॉक्टरेट

Dainik Gomantak
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

पंकज सायनेकरने विश्व विक्रम करीत याआधी सूर्यनमस्कार घातले होते. पणजी येथे आयनोक्स येथे २७ मार्च २०१७ रोजी २०१५ सूर्यनमस्कार सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्ता पर्यंत बारा तास पंधरा मिनिटे घातले होते.

पद्माकर केळकर
वाळपई

गोव्याचा २४ वर्षीय युवा तरुण पंकज अरविंद सायनेकर याने योग विभागातील जागतिक रिकोर्डस् युनिवर्सिटी लंडन यांची मानद डॉक्टरेट पदवी (world records University honorary degree of doctorate) प्राप्त केली आहे. दिल्ली येथे २७ डिसेंबर रोजी ही डॉक्टरेट पदवी थॉमस रिचर्ड विलियम बिन्स यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली आहे.
यावेळी बिश्वरुप रॉय चौधरी, निरजा रॉय चौधरी आदींची उपस्थिती होती. पंकजने विश्व विक्रम करीत याआधी सूर्यनमस्कार घातले होते. पणजी येथे आयनोक्स येथे २७ मार्च २०१७ रोजी २०१५ सूर्यनमस्कार सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्ता पर्यंत बारा तास पंधरा मिनिटे घातले होते. त्याच वर्षी अहमदाबाद येथे २१ जूनला योगदिना दिवशी २२९५ सूर्यनमस्कार १४ तास पंचवीस मिनिटे घातले होते. त्यावेळी योगगुरु रामदेव बाबा उपस्थित होते. तसेच पर्वरी येथे ४०१४ सूर्यनमस्कार घातले होते. तीनही ठिकाणी मिळून ८,३२४ सूर्यनमस्कार घातले आहेत.
पणजी येथील कामगिरीची नोंद एशिया बुक मध्ये तर अहमदाबाद येथील कामगिरीची नोंद गोल्डन बुक मध्ये नोंद झाली होती. या सर्व विश्व विक्रमाची दखल जागतिक रिकोर्डस् युनिवर्सिटी लंडनने घेऊन ही डॉक्टरेट पदवी पंकज याला बहाल केली आहे. त्यामुळे पंकज सायनेकरची रजिस्टर नोंद जागतिक पातळीवर डॉक्टर म्हणून करण्यात आली आहे. पंकज सायनेकर वरगाव येथे राहणारा असून तो पिळगाव येथील आयडीयल माध्यमिक शाळेत इयत्ता नववीत शिकत असताना क्रीडा महोत्सवात एकदा तीन तास सूर्यनमस्कार महोत्सव संपेपर्यंत घातले होते. त्यातूनच पंकजचे योग विषयी मैत्रीपूर्ण नाते प्रस्थापित झाले होते. त्यावेळी त्याचे शाळेतही कौतुक झाले होते. या व्यक्तिरिक्त विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आयुष मंत्रालय दिल्ली यांच्या योग विषयातील 'क्यू.सी.आय लेवल ३ होल्डर' या परीक्षेत गोव्यातून सहभागी होणारा पंकज हा एकमेव युवक बनला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही परीक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्णही झाला आहे. सध्या पंकज पणजीतील दिशा स्कूल या विशेष मुलांच्या शाळेत योग शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसेच त्याने मये येथून डिप्लोमा इन पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम केला असून सध्या योग पदवीचे शिक्षणही घेत आहे.
याविषयी वाळपई येथील योग शिक्षक प्रदीप गवंडळकर म्हणाले, पंकजने चांगली कामगिरी करीत योग विभागाला योग्य न्याय दिला आहे. यात त्याने डॉक्टरेट पदवी प्राप्त करून राज्याचे नाव उंचावले आहे. असेच युवा तरुण योग क्षेत्रात निर्माण होण्याची गरज आहे. पंकज सायनेकरने सर्व तरुणांना एक प्रकारे प्रेरणा दिली आहे. यापुढे पंकजच्या नावा आधी डॉक्टर हे नाव नमूद केले जाणार आहे. ही गोवेकरांसाठी अभिमानास्पद बाब बनलेली आहे.

संबंधित बातम्या