पेडण्‍यात रस्‍त्‍याच्‍या कडेलाच पार्किंग

Dainik Gomantak
शनिवार, 11 जानेवारी 2020

पोर्तुगीजकालीन शहर रचना आराखडला बदलण्‍याची आवश्‍‍यकता आहे.

प्रकाश तळवणेकर

पेडणे

पेडणे शहरात पार्किंगचा विषय दिवसेंदिवस जटिल होत आहे. या समस्येवर अजूनपर्यंत अनेक वर्षे कुठलीही उपाययोजना झालेली नाही. पेडणे शहराची रचना पोर्तुगीजकालीन आहे. बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूंनी इमारती व मध्ये रस्ता. काही ठिकाणी सात ते आठ मीटर रुंदीचा तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी रुंदीचा रस्‍ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने पार्किंग केल्याने वाहतुकीला अडचण होऊन वाहतूक कोंडी होते.
गेल्या पंधरा ते वीस वर्षांत पेडणे तालुक्‍यातील वाहनांच्या संख्येत फार मोठी वाढ झालेली आहे. एका घरात किमान एक दोन दुचाक्‍या, मोटारकार आहेत. पेडणे हे तालुक्‍याचे मुख्य ठिकाण असल्याने तालुक्‍याच्या विविध भागातून सरकारी किंवा आपल्या अन्य कामासाठी आपली वाहने घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी असते. गुरुवार हा येथील आठवड्याच्या बाजाराला तर पार्किंगची मोठी समस्या निर्माण होते. जुन्या बसस्थानकावर बरीच वाहने पार्क करण्यात येतात. पण वाहनांची संख्या लक्षात घेता ही जागा पुरेशी नाही.
अनेक ठिकाणी नगरपालिकेने नो पार्किंगचे फलक लावले आहेत. पण पार्किंगचा एकही फलक कुठे दिसत नाही. कदंब बस स्थानकात भूमिगत पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही जागाही बरीच प्रशस्त आहे. फक्त गणेश चतुर्थी व ‘पेडणे पुनाव’ उत्सवावेळी तेवढा काही दिवसासाठी सुरू ठेवण्यात येतो. तो कायमस्वरुपी खुला केल्यास एका बाजूची वाहने पार्किंगची समस्या दूर होईल. आतापर्यंत अनेक पालिका मंडळे सत्तेवर आली आणि गेली. पण एकही पालिका मंडळाने या पार्किंग समस्येबद्दल गांभीर्याने पाहिले नाही.
या समस्येवर आता गंभीरतेने विचार करून जवळ असलेल्या मोकळ्या जागेत किंवा तडंग शेतीच्या मळ्यात पार्किंगची व्यवस्था करता येईल का? यावर विचार झाला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कठोर निर्णयही घेण्याची तयारी नगरपालिका व सरकारने घेवून ही समस्या सोडविली पाहिजे. अन्यथा काही वर्षात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.

संबंधित बातम्या