गोमेकॉ बाह्यरुग्ण विभाग बंदमुळे रुग्णांचे हाल

Dainik Gomantak
सोमवार, 13 एप्रिल 2020

गोमेकॉ इस्पितळातील विविध बाह्यरुग्ण विभागात प्रतिदिन सुमारे दोन हजार रुग्णांची उपचारासाठी उपस्थिती असते मात्र ‘कोविड१९’ च्या पार्श्वभूमीवर हे सर्व बाह्यरुग्ण बंद ठेवण्यात आले आहेत.

पणजी,  

आरोग्य सेवा देणारे राज्यातील प्रमुख इस्पितळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) ‘कोविड१९’ च्या पार्श्वभूमीवर गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे उपचारासाठी व महिन्याच्या औषधांसाठी येणाऱ्या रुग्णांचे बरेच हाल होत आहेत. या इस्पितळात कनिष्ठ डॉक्टरांची नेमणूक करून एक हंगामी रुग्ण तपासणी केंद्र सुरू केले मात्र रुग्णांवर उपचार करताना आजाराचे निदान या डॉक्टरांना अडचणी येत नसल्याने पूर्वीचीच औषधे देऊन रुगणांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे गोमेकॉ इस्पितळातील बाह्यरुग्ण विभाग सेवा सुरू होण्याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.
गोमेकॉ इस्पितळातील विविध बाह्यरुग्ण विभागात प्रतिदिन सुमारे दोन हजार रुग्णांची उपचारासाठी उपस्थिती असते मात्र ‘कोविड१९’ च्या पार्श्वभूमीवर हे सर्व बाह्यरुग्ण बंद ठेवण्यात आले आहेत. आपत्कालिन सेवेच्या बाजूला एक तात्पुरता रुग्ण तपासणी केंद्र सुरू करण्यात आला असून तेथे तज्ज्ञ किंवा वरिष्ठ डॉक्टर नाहीत. कनिष्ठ डॉक्टरांवर या केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जर एखाद्या रुग्णाचा आजार या डॉक्टराच्या समजण्याच्या आवाक्याबाहेर असल्यास त्या रुग्णाला इस्पितळातील संबंधित वॉर्डमध्ये असलेल्या डॉक्टराकडे तपासणीसाठी पाठविले जाते. मात्र या वॉर्डमध्ये परिचारिका असतात. त्यांना डॉक्टर कधी येईल असे विचारल्यास माहीत नाही अशी उत्तरे दिली जातात. लॉकडाऊन झाल्यानंतर बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांनीही स्वतःला दूर ठेवले आहे. या इस्पितळात येण्यासाठी वाहतूक सेवा नाही त्यामुळे भाड्याने खासगी वाहन घेऊन आलेल्या रुग्णाच्या कुटुंबाना मात्र उपचाराविना भूर्दंड पडतो आहे. या तपासणी केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर किंवा ज्येष्ठ डॉक्टरही नसतात. जी औषधे सुरू आहेत तीच पुन्हा लिहून दिली जातात व इस्पितळाचा बाह्यरुग्ण विभाग पूर्ववत झाल्यावर तपासणीसाठी संबंधित डॉक्टराला दाखवा अशा सूचना केल्या जातात. त्यामुळे ‘कोविड१९’ कडे अधिक लक्ष देऊन इस्पितळात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच केले जाते आहे.
सरकारने ‘कोविड१९’ कडे सर्व लक्ष एकवटले आहे मात्र दैनंदिन गोमेकॉ इस्पितळात उपाचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी कोणतीच सोय केलेली नाही. दरदिवशी आपत्कालीन विभागाच्या बाजूला असलेल्या हंगामी तपासणी केंद्रात रुग्णांची गर्दी असते. या केंद्रातील डॉक्टर कनिष्ठ असल्याने रुग्णांच्या आजारावर निदान करण्यास त्यांचा अनुभव कमी पडतो. रुग्णाला पूर्वी डॉक्टराने दिलेली औषधेच पुन्हा लिहून दिली जातात. रुग्ण मोठ्या आशेने उपचारासाठी या इस्पितळात येतो मात्र दिवस घालवूनही त्याला योग्य उपचार मिळत नाही. राज्यात लॉकडाऊन असल्याने ‘कोविड१९’ ची संबंधित नसलेले तज्ज्ञ व ज्येष्ठ डॉक्टरांनी घरी राहून कनिष्ठ डॉक्टरांवर वॉर्डची जबाबदारी सोपविली आहे. गरज पडल्यासच किंवा वॉर्डमधील एखाद्या रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यासच हे डॉक्टर भेट देतात. काही महत्त्वाच्या आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया वगळता सर्व बाह्यरुग्ण विभागाच्या शस्त्रक्रिया बंद आहेत.
गोमेकॉ इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने तेथे शुकशुकाट असला तरी आपत्कालिन विभागाच्या बाजूला तात्पुरता स्थापन केलेला हंगामी रुग्ण तपासणी केंद्रात रुग्णांच्या रांगा लागतात. या ठिकाणी रुग्णांना सामाजिक दूरी ठेवून बसविले जात असले तरी तेथे असलेली जागा रुग्णांसाठी कमी आहेत. तेथील आपत्कालिन विभागात अनेक अपघाती रुग्ण दाखल होत असल्याने तेथील भाग रुग्ण व त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी गजबजलेला असतो. त्यामुळे सामाजिक दूरी ठेवण्याचे पालन होणे अशक्य होत आहे. या ठिकाणी उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांच्या सोबत असलेल्या लोकांमुळे मोठी गर्दी असते.

संबंधित बातम्या