पणजीत लवकरच ‘पे-पार्किंग’

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पणजी:विविध ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

पणजी:विविध ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू
पणजी शहरात ‘पे-पार्किंग’चे कंत्राट घेतलेल्या जुवारकर असोसिएट्स कंपनीच्यावतीने शहरातील १८ जून रस्ता व आत्माराम बोरकर मार्गावर सूचित केलेल्या ‘पे-पार्किंग’च्या जागेवर पांढरे पट्टे मारण्यास सुरवात केली आहे.आज दिवसभर कंपनीचे कामगार पट्टे आखण्यात व्यस्त होते.महापालिकेच्या पे-पार्किंगचा घोळ आता मिटण्याची शक्यता दिसू लागली आहे.कारण १.६२ कोटींचे तीन वर्षांसाठी पे-पार्किंगचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीने ७० टक्के रक्कम भरण्यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला होता.कंत्राटदाराने घेतलेल्या निविदेप्रमाणेच पैसे भरावे लागतील.महापालिका मंडळाला निविदा प्रक्रियेतील नियमांत कोणताही बदल करता येत नसल्याचे सांगण्यात आले होते.त्यामुळे कंत्राटदारास ठरल्याप्रमाणे ७० टक्के रकमेपैकी १० टक्के रकमेची बँकेची हमी आणि ६० टक्के सुरक्षित ठेव म्हणून ठेवावी लागणार होते.
जर कंत्राटदाराने निविदेप्रमाणे नियमांचे पालन केले नाही, तर त्याचे नाव काळ्या यादीत जाण्याची भीती होती. त्यामुळे सभेनंतर दोन दिवसांतच कंत्राटदार कंपनीने पे-पार्किंगसाठी आवश्‍यक सुरवातीच्या कामांना सुरवात केली.त्यात आज सकाळपासून कंपनीच्यावतीने १८ जून रस्ता आणि आत्माराम बोरकर मार्गावर निश्‍चित केलेल्या पार्किंगच्या जागांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगविण्याचे काम सुरू केले होते.पे-पार्किंगचे फलक व आणखी काही काम राहिले असून, त्यामुळे शहरात काही दिवसांत पे-पार्किंग सुरू होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

क्षेत्रपाळाचे रुप परमात्यांचे ः राणा

संबंधित बातम्या