८० हातगाड्यांचे परवाने निलंबित!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

पाटो परिसर, पे-पार्किंगवर गदारोळ : मार्केटमधील दुकानांच्या करारावर शुक्रवारी निर्णय

महापौर मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात सभा पार पडली. नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी मार्केट इमारती, पेट्रोल पंप यांच्याकडून भाडेपट्टी वसूल केली तर आत्तापर्यंत थकीत असलेली १५.५० कोटींची वसुली होऊ शकते. त्याशिवाय सरकारी वसाहतींतून कचरा कर, सांडपाणी व्यवस्था कर गोळा केला तर १३.५० कोटी रुपये महापालिकेला मिळू शकतात, पण कर गोळा करणारे अधिकारी कामच करीत नाहीत, हे लक्षात आणून दिले.

पणजी : शहरात विविध ठिकाणी खाद्यपदार्थ, फळे, शितपेय, आईसक्रिमची विक्री करणाऱ्या एकूण ९२ पैकी ८० हातगाड्यांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळात घेण्यात आला.

त्याचबरोबर पाटो परिसराचे आर्थिक विकास महामंडळाकडून हस्तांतरण करून घेताना येथील सांडपाणी व्यवस्थेचा अभ्यास करण्याचा आणि मार्केटमधील दुकानदारांशी प्रलंबित असलेल्या भाडेपटी करारावर येत्या शुक्रवारी होणाऱ्या अर्थसंकल्पीय बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे महापौर उदय मडकईकर यांनी जाहीर केले.

याचवेळी नगरसेवक पुंडलिक नाईक यांनी आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे २८ कोटी रुपये थकीत असल्याचे समजते असे सांगत या विषयाला आणखी फुंकर घातली. त्याशिवाय हळर्णकर यांनी शहरातील ज्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारले आहेत, त्यांच्याकडून व्यावसायिक कर वसूल करावा. कारण या इमारतींचे मालक त्या-त्या मोबाईल कंपन्यांकडून लाखो रुपये भाड्यापोटी घेतात, हे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. हळर्णकर हे स्पष्टीकरण देत असतानाच नगरसेविका दीक्षा माईणकर यांनी आपल्या मालकीच्या दुकान गाळ्याला ठोकलेल्या टाळ्याचा मुद्दा पुढे रेटला.

त्यावर महापौर मडकईकर यांनी माईणकर यांना तुमच्या दुकानाचा पहिला करार करूया, असे सांगत वातावरण थंड केले. त्याशिवाय घरे-फ्लॅटमधून चालणाऱ्या व्यावसायिकांना व्यावसायिक परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहातील अनेक घरमालकांनी खोल्या भाड्याने दिल्या आहेत, पण त्या घरमालकांकडून केवळ घरपट्टी न घेता, त्यांना खोल्यांच्या संख्येवरून कचरा करही आकारावा, अशी सूचना हळर्णकर आणि नगरसेवक राहुल लोटलीकर यांनी मांडली. आर्थिक विकास महामंडळाच्या (इडीसी) ताब्यात असलेल्या पाटो प्लाझाच्या देखभालीची व्यवस्था महापालिकेकडे घेण्याच्या मुद्द्यावर नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी आक्षेप घेतला, तर नगरसेवक शुभम चोडणकर यांनी पाटो परिसराचा आपण गेली अडीच तीन वर्षे अभ्यास केला आहे.

मळ्यातील लोकांना सांडपाण्याचा काय त्रास होतो, हे आम्ही पाहत आहोत. त्यामुळे पाटो परिसरातील सांडपाणी व्यवस्थेचा अगोदर महापालिकेने अभ्यास करावा, असा मुद्दा मांडला, तर राहुल लोटलीकर यांनी वीजदिवे, पे पार्किंग या मुद्यांवर प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर आयुक्त संजित रॉड्रिग्ज यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, पाटो येथील पे-पार्किंगचा करार ३१ मार्चला संपणार आहे. हस्तांतर प्रक्रिया करण्यात आणि अधिसूचना काढेपर्यंत काही दिवस जातील. त्याचबरोबर या परिसरात लागणारे २५ कर्मचारी खासगी संस्थांकडून घेण्यात येतील. याशिवाय चोडणकर यांनी उपस्थित केलेल्या सांडपाण्याच्या प्रश्‍नावर आयुक्तांनी या भागातील सांडपाण्याविषयीचा सर्व अहवाल आणि व्यवस्थेचा आपण अभ्यास करून त्यावर निर्णय घेऊ.

हे पहा : मगोचे १२ उमेदवार जाहीर

हातगाड्यांचा मुद्द्यावर गदारोळ
शहरातील हातगाड्यांच्या मुद्दा गाजणार, असे दै. ‘गोमन्तक’ने  वृत्तात म्हटले होते. त्याप्रमाणे हा मुद्दा गाजला. नगरसेवक मिनीन डिक्रुझ, रूपेश हळर्णकर, सुरेंद्र फुर्तादो, विठ्ठल चोपडेकर यांनी महापौर मडकईकर यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. ३७ गाड्यांवर कारवाई केल्याचे सांगताच इतर गाड्यांना चालविण्यास परवागनी दिली आहे, का असा सवाल फुर्तादो यांनी केला. गाड्यांचा प्रश्‍न वर्षभरात सोडविता आला नाही, वर्षभर काय केले असा सवाल हळर्णकर यांनी महापौरांना केला, तर चोपडेकर यांनी परवानेच रद्द करा अशी मागणी केली. त्यास डिक्रूझ आणि हळर्णकर यांनी आक्षेप घेतला. त्यावर महापौर मडकईकर यांनी ९२ पैकी ८० गाड्यांचे परवाने निलंबित करीत असल्याचे सांगितले, तर १२ परवाने हे तीनचाकी सायकलवरून आईस्क्रिम फिरून विकणाऱ्यांचे असल्याने त्यांवर कारवाई करता येत नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

कसिनोला जाणाऱ्या वाहनाला १०० रुपये!
पार्किंगच्या मुद्यावर चर्चा सुरू होताच नगरेसवक फुर्तादो यांनी कसिनोच्या कार्यालयाच्या बाजूला येणाऱ्या वाहनांनासाठी रात्रीच्या पार्किंगकरिता १०० रुपये आकारले जातात, असे सांगितले. त्यावर हे पैसे कोण घेतात, असा सवाल महापौरांनी केला असता ते महापालिकेने शोधावे असे उत्तर फुर्तादो यांनी दिले. नगरसेवक सौरया यांनी इमारतीतील वाहनांसाठी कार्ड पद्धत लागू करण्याची मागणी केली, तर नगरेसवक वसंत आगशीकर यांनी पे-पार्किंगचे दरफलक काढल्याचे लक्षात आणून दिले, त्यावर महापौरांनी ते फलक एका बँकेने प्रायोजित केले असून ती बँक नवे फलक लावणार असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले.

नगरेसवक सुरेंद्र फुर्तादो गप्प!
नगरसेवक मिनीन डिक्रूझ यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हे महत्त्वाचे कायदे देशात लागू केल्याबद्दल आणि गोव्यात याविषयी घरोघरी जाऊन मोहीम राबविल्याबद्दल आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तो ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला, परंतु काँग्रेसचे मानले जाणारे माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो हे यावर काहीही न बोलता गप्प बसले. या ठरावाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
 

संबंधित बातम्या