वास्कोतील ‘पे पार्किंग’चा विषय बारगळला

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

चार महिने पे पार्किंगचा प्रश्‍‍न लालफितीत बंद

मुरगाव पालिका इमारतीच्या सभोवताली, रेल्वे स्‍थानकासमोर आणि मासळी मार्केट समोर पे पार्किंग करण्याचा निर्णय नगराध्यक्ष राऊत यांनी घेऊन वास्कोचे माजी वाहतूक पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांना सोबत घेऊन पाहणीही केली होती. हा विषय पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चेलाही घेतला होता. मात्र, हा पे पार्किंगचा विषय खड्यासारखा बाजूला काढून ठेवण्यात आला. गेले चार महिने पे पार्किंगचा प्रश्‍‍न लालफितीत बंद करून ठेवला आहे.

मुरगाव : वाहनांची संख्या वाढत असल्‍याने मिळेल त्या जागी बेशिस्तपणे वाहने पार्क करण्याचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी शहरात काही रस्त्यावर ‘पे पार्किंग’ योजना लागू करण्याची घोषणा केली होती. पण, त्याची अद्याप कार्यवाही झाली नसल्याने नंदादीप राऊत यांची घोषणा हवेतच विरली असून वास्कोतील ‘पे पार्किंग’चा विषय बारगळला आहे.

वास्को शहर दाटीवाटीने वेढले आहे. शहरातील रस्ते वाहनांसाठी अपुरे पडत आहेत. वाहने पार्क करण्यासाठी आवश्यक जागा नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क केली जात आहेत. चारचाकी आणि दुचाकी वाहने कुठे पार्क करायची हे सांगणारे दिशादर्शक फलक सर्वत्र लावलेले असतानाही नियमबाह्य वाहने पार्क केली जात आहेत.

काही ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून बेवारस वाहने पार्क करून ठेवलेली आहेत. ती हटविल्यास मोठी सोय होऊ शकते, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी माजी मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी रस्त्यांवरील बेवारस वाहने हटविण्याचा जोरदार प्रयत्न केला होता, पण कोणीच साथ न दिल्याने फर्नांडिस यांची योजना बारगळली होती. त्यानंतर कोणीच या बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचा विचार केला नाही.

अबब  : ८० हातगाड्यांचे परवाने निलंबित!

नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी शहरात काही रस्त्यांवर पे पार्किंग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काही नगरसेवकांनी अडथळा आणला. परिणामी पे पार्किंगचा प्रश्‍‍न शितपेटीत बंद करून ठेवण्यात आला आहे. नजीकच्या काळात पे पार्किंग होईल की नाही हे सांगणे जोखीमीचे बनले आहे.
वास्को शहरातील मोक्याच्या ठिकाणावरील रस्त्यावर आपली वाहने दिवसभर पार्क करून बरेचजण बसने इतर ठिकाणी प्रवास करतात. विशेषत: दुचाकी चालक मासळी मार्केट समोरील रस्ता पार्किंगसाठी काबीज करून ठेवतात.

त्यामुळे बाजारहाटीसाठी येणाऱ्यांना आपली वाहने पार्क करण्यास जागा मिळत नाही, अशी तक्रार वाहन चालकांची आहे, हे ध्यानात घेऊन नगराध्यक्ष राऊत यांनी पे पार्किंगसाठी पुढाकार घेतला होता पण त्यात त्यांना यश आले नाही.

संबंधित बातम्या