कामगारांकडे आधी लक्ष द्या ः राणे

Dainik Gomantak
बुधवार, 15 एप्रिल 2020

जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन सुरुच राहील पण अर्थव्यवस्था पून्हा उभी करताना मदत लागेल ती कामगार वर्गाची. याचमुळे कामगार वर्गाला आज जपले गेले पाहिजे.

पणजी, 
राज्याच्या अर्थव्यवस्थेचे चाक सुरुच राहिले पाहिजे असे मत उद्योग व कामगार जगतातून व्यक्त केले जात आहे. सरकारने निर्बध घालावेत पण हाताला काम द्यावे असाही सूर ऐकू येत आहे.
कामगार नेते अॅड अजितसिंह राणे म्हणाले,राज्याच्या अर्थव्यवस्थेला पूनर्जिवित करण्यासाठी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कामगार वर्गाला आधी जपले पाहिजे.सरकारने टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
ते म्हणाले, पूर्वीच्या काळी वस्तुच्या बदल्यात वस्तू असे चालत असे. आताही तोच मार्ग पत्कारावा लागेल. शेतीत राबणाऱ्या हातांना त्यांच्या मजुरीच्या बदल्यात त्याच किमतीचे साहित्य दिले पाहिजे. आज टाळेबंदीच्या काळात लोकांना किराणा व सामानाची गरज आहे. अर्थव्यवस्था पूर्णतः बंद होणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन सुरुच राहील पण अर्थव्यवस्था पून्हा उभी करताना मदत लागेल ती कामगार वर्गाची. याचमुळे कामगार वर्गाला आज जपले गेले पाहिजे. त्यांना हातांना काम हवे, जीवनावश्यक वस्तू, किराणा, धान्य हे मजुरीच्या रुपात देत सरकारने अर्थव्यवस्थेचे चक्र चालू ठेवले पाहिजे. एका जागी मजुरांना ठेवण्यापेक्षा समाज अंतर पाळत त्यांना काम दिले तर तेही गावी जाण्यास शोधणार नाहीत. टाळेबंदी ही आजच्या घडीला आवश्यक असली तरी समाज अंतर पाळण्याची सक्ती करून काही उद्योग सुरु करता येऊ शकतात. विशेषतः उत्पादनवाढीकडे, कृषीउत्पन्नांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.
वेदान्ताचे माजी उपाध्यक्ष अनिरुद्ध जोशी म्हणाले, समाज अंतर पाळून व्यवहार सुरु करावेत. टॅक्सीतही तीनच प्रवासी घेता येईल असा नियम करावा. एकदा वापरून झालेली टॅक्सी निर्जुंतुक करावी. त्याचा खर्च प्रवासी भाड्यातून घ्या. पैसे घ्या पण सेवा द्या अशी आज समाजाची मानसिकता झाली आहे. केशकर्तनालयेही वापरलेली अवजारे व खूर्ची निर्जुंतूक करून दुसऱ्या ग्राहकासाठी तयार केली जात असल्याची लेखी हमी कोणी देत असेल तर त्यांनाही व्यवसाय करू दिला पाहिजे. समाज अंतर पाळण्याच्या अटीवर बांधकाम क्षेत्रही खुले केले जाऊ शकते. त्याचाही विचार सरकारने केला पाहिजे.घरोघरी जाऊन सामान विकणाऱ्यांना सरकारने प्रोत्साहीत केले पाहिजे. येत्या २० एप्रिलनंतर काही ठिकाणी सलवती देण्याचे सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे हे सुचिन्ह आहे.

संबंधित बातम्या