गोव्यातील विविध ठिकाणी अवकाळी पाऊस

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

राज्‍यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस

दक्षिण गोव्यात बाळ्ळी, काणकोण, केपे भागात अवकाळी पाऊस

राज्‍यात आज विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर वातावरणात उष्‍णता जाणवत होती. दक्षिण गोव्‍यासह उत्तर गोव्‍यातही अवकाळी पाऊस पडला.

पणजी : दक्षिण गोव्यात बाळ्ळी-वेळीपवाडा, अडणे, रिवणा, सुळकर्णा, मळकर्णे काणकोण, केपे सावर्डे, मळकर्णे येथे शनिवारी दुपारी पावसाच्या तुरळक सरी पडल्या तर बाळ्ळी - वेळीपवाडा अडणे भागात सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

केपे येथील प्रसाद फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काणकोण, केपे, रिवणा भागात सुमारे दहा मिनटे पाऊस पडला तर बाळ्ळी - वेळीपवाडा या भागात सुमारे पाऊणतास पाऊस पडल्याची माहिती स्थानिक नागरिक दिलीप नाईक यांनी दिली.

सकाळच्या वेळी आकाशात काही प्रमाणात ढग जमा झाले होते, अशी माहिती नाईक यांनी दिली. सकाळच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती. दुपारी सव्वा एकच्या दरम्यान पाऊस पडायला सुरवात झाल्याने काही प्रमाणात हवेत ओलावा निर्माण झाला होता.

सकाळपासूनच हवामानात बदल जाणवत होता पण दुपारी अचानक पावसाच्या सरी कोसळल्या असे दिलीप नाईक यांनी सांगितले. दुपारी पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा जाणवला परंतु सायंकाळी हळूहळू हवामानात बदल होत गेला. उन्हामुळे तापलेली जमीन पावसामुळे ओली झाली.

डिचोलीतील काही भागात आज अवकाळी पाऊस पडला. वडावल-साळ भागात पावसाचा शिडकावा झाला. तर कुडचिरे भागात पावसाच्या तुरळक सरी झडल्या. आजच्या पावसाचा मात्र जनजीवनावर विशेष परिणाम जाणवला नाही. हवामानातील बदलामुळे राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती.

साकोर्डा भागात पावसाचा शिडकाव
संध्याकाळी चारच्या सुमारास ढगांच्‍या गडगडाटासह साकोर्डाच्या बहुतेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळायला लागल्या. त्यामुळे वातावरणात गारवा पसरायला लागला. सुमारे १५ दिवसांपासून उकाड्याने अक्षरशः हैराण झालेल्या लोकांना आज अचानकपणे पडलेल्या अनेक भागात पावसाच्या जोरदार शिडकावामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसांपासून हवामानात उष्णतामानात तापमानात कमालीची वाढ झाली होती. दिवसा वातावरण कोंदट व ढगाळ होते. प्रचंड उष्म्‍याने जीवाची लाहीलाही होत असताना ठिकठिकाणी अनपेक्षितपणे पडलेल्या वळीवाच्‍या पावसाच्या हलक्या व मध्यम सरींनी लोक फारच सुखावले होते.

संबंधित बातम्या