ग्राहकांच्या 'या' मोफत सेवेची वानवा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

राज्‍यातील काही पेट्रोलपंपावर ‘हवा’ गायब

मोफत सुविधांची वानवा : जागेअभावी सुविधा देण्‍यास अडचणी

शहरांचे झपाट्याने विस्तारीकरण झाले तरी काही पेट्रोलपंप त्याच जागेत आहेत. जागेच्या अभावामुळे पेट्रोलपंप कंपनीला सुविधा देण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती पेट्रोलपंप कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नावेली : गोव्यातील काही पेट्रोलपंपावर हवा गायब असून ग्राहकांना मोफत मिळणाऱ्या सुविधांची वानवा असल्याचे दिसून येते. पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी जाणाऱ्या वाहन चालकांना (ग्राहकांना) पेट्रोलपंपावर सुमारे सहा सुविधा मोफत पुरवल्या जातात परंतु काही पेट्रोलपंवारपावर या सुविधा ग्राहकांना मिळत नाहीत.

काही पेट्रोलपंपावर हवा नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, शौचालय नाही, अशी स्थिती आहे. शौचालय आहे परंतु शौचालय साफ करण्यासाठी कामगार मिळत नसल्याने शौचालयाचा वापर ग्राहकांना करायला दिला जात नाही. शौचालयांना कुलूप लावले जाते, तर काही पेट्रोलपंपावर पाणी नसल्याचे शौचालय बंद असल्याचे चित्र आहे. इंधन भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करणे कायद्याने बंधनकारक असले तरी देखील काही पेट्रोलपंपावर चक्क नळाचे पाणी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. मडगावमध्ये सर्रास काही पेट्रोलपंपावर ग्राहकांना या सुविधा मिळतच नाहीत, अशी माहिती विजय लोधे यांनी दिली.

मडगावातील काही पेट्रोलपंपावर एअर काँप्रेसर तर पाईप लिकेज असल्याचे कारण सांगण्यात येते. ही स्थिती गोव्यातील काही पेट्रोलपंपवर आहे. अखिल गोवा पेट्रोलपंप मालक संघटनेचे अध्यक्ष परेश जोशी यांना यासंबंधी विचारले असता पेट्रोलपंपावर ज्या सुविधा ग्राहकांना मोफत दिल्या जातात त्या ग्राहकांना मिळाल्याच पाहिजेत असे आपले ठाम मत आहे. जर कुणी देत नसेल तर आपण प्रत्यक्ष लक्ष घालून त्या पेट्रोलपंप मालकांना सूचना करणार आहे. गोव्यात खास करून मडगाव शहरामध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पेट्रोलपंप आहेत काही पेट्रोलपंपावर जागेचा अभाव असल्याने सुविधा देणे शक्‍य होत नाही परंतु ग्राहकांना अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. हे पेट्रोलपंप भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी हाताळत असल्याने सदर कंपनीने पेट्रोलपंवार लागणाऱ्या सुविधा देणे आवश्‍यक आहे. पेट्रोलपंपावरील शौचालय साफ नसल्यास कंपनी त्या पेट्रोलपंप मालकाला २५ ते ५० हजारांपर्यंत दंड आकारते. पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा मिळायलाच हवी.

अनेक पेट्रोलपंपावर इंधन भरण्‍यासाठी येणाऱ्या ग्राहकांऐवजी आजूबाजूचे लोक येऊन शौचालयाचा वापर करीत असल्याने शौचालय घाण होते. त्याची स्वच्छता करण्यासाठी बाजारात कामगार मिळत नसल्याने काही पेट्रोलपंपाचे मालक पेट्रोलपंपावर ग्राहकांसाठी असलेल्या शौचालयाला कुलूप लावून ठेवतात, अशी माहिती ग्राहकांकडून प्राप्त झाली आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मडगावातील पेट्रोलपंप शहरातून बाहेर स्थलांतरीत करण्यासाठी बारा वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी आदेश काढले होते. संबंधधित कंपन्यांना शहराच्या बाहेर जागा शोधण्यास सांगण्यात आले होते. काही जागांचे सर्वेक्षण केले होते परंतु मागच्या बारा वर्षांपासून हा प्रश्‍न तसाच पडून आहे. अद्याप पेट्रोलियम कंपन्यांनी कोणतीही तत्परता दाखवलेली नाही.

विर्नोडा येथे भुयारीमार्ग न ठेवल्यास लोकांच्या पाठिंब्याने पुढचा निर्णय

ग्राहकांना सुविधा मिळाल्‍याच पाहिजेत : स्‍वरुप
ग्राहकांना ज्या मोफत सुविधा आहेत त्या मिळाल्याच पाहिजेत. कारण तो त्यांचा हक्क आहे. काही ठिकाणी शहरातील जुन्या पेट्रोपंपावर जागेअभावी शौचालयाची सुविधा देणे शक्‍य नाही. मात्र, ग्राहकांना जेवढ्या सुविधा देणे शक्‍य असेल तेवढ्या सुविधा देण्यात येतील. जर कोणत्याही पेट्रोलपंपावर ग्राहकांना सुविधा मिळत नसतील तर त्यांनी पेट्रोलपंपावर कंपनीच्या दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी आनंद स्वरूप यांनी सांगितले.

संबंधित बातम्या