लॉर्डसवर खेळल्याची भावना अविस्मरणीय : स्वप्नील

Dainik Gomantak
मंगळवार, 14 एप्रिल 2020

``त्या दिवशी गर्दीने फुलून गेलेल्या लॉर्डस मैदानावर खेळलो, ती कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भावना आहे. माझ्यासाठी तो दिवस स्वप्नवत ठरला.``

- स्वप्नील अस्नोडकर

किशोर पेटकर

पणजी, 

ज्या मैदानाला क्रिकेटची `पंढरी` मानले जाते, त्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्डसवर खेळण्याची भावना अविस्मरणीय असून आठवण अजूनही ताजी आहे, असे तब्बल ११ वर्षांनंतर त्या अविट स्मृतींना उजाळा देताना स्वप्नील अस्नोडकर याने सांगितले. लॉकडाऊनमुळे गोव्याचा ३६ वर्षीय यशस्वी फलंदाज सध्या कुटुंबीयांसमवेत घरी असून क्रिकेट आठवणींना उजाळा देत आहे.

६ जुलै २००९ रोजी लॉर्डस मैदानावर सुमारे वीस हजार दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने राजस्थान रॉयल्स आणि मिडलसेक्स पँथर्स यांच्यात दिन-रात्र टी-२० सामना झाला होता. ब्रिटिश एशियन ट्रस्टसाठी हा प्रदर्शनीय मदतनिधी सामना होता. राजस्थान रॉयल्सने २००८ साली शुभारंभी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), तर मिडलसेक्सने इंग्लिश टी-२० स्पर्धा जिंकली होती. या दोन्ही संघांत ब्रिटिश एशियन कपसाठी सामना झाला, त्यात राजस्थान रॉयल्सने ४६ धावांनी विजय मिळविला होता.

 

`नशीबवान ठरलो`

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघात स्वप्नीलचा समावेश होता. स्वप्नीलने २००८ मधील आयपीएल स्पर्धा गाजविताना, १३३.४७च्या स्ट्राईक रेटने ३११ धावा केल्या होत्या. लॉर्डसवरील सामन्याविषयी स्वप्नील म्हणाला, की ``क्रिकेटची मक्का असलेल्या लॉर्डस मैदानावर खेळतोय ही भावना खूपच छान होती, शब्दांत व्यक्त करताच येणार नाही.  सामना सुरू झाला. आम्ही प्रथम फलंदाजी केली. पहिल्याच षटकानंतर पाऊस सुरू झाला, तेव्हा मी एका धावेवर नाबाद होतो. वाटलं की पावसामुळे सामना वाहून जाणार, पण वरुणदेवाने कृपा केली आणि सामना पुन्हा सुरू झाला. लॉर्डसवर खेळायला मिळतेय हे आमच्यासाठी स्वप्नच असल्याचे संभाषण मी आणि सलामीचा सहकारी फैझ (फझल) यांच्यात त्यावेळी झाले होते. तेव्हा संधी मिळण्याबाबत मोजक्याच नशीबवानांपैकी मी एक ठरलो.`` त्या लढतीत स्वप्नीलने ४० चेंडूंत ३ चौकार व १ षटकार यासह ४१ धावा केल्या. डेव्हिड मालनच्या गोलंदाजीवर त्याने ओवेस शाह याच्या हाती झेल दिला होता.

 

अर्धशतकी भागीदारी

लॉर्डसवरील त्या संस्मरणीय लढतीत स्वप्नील व महंमद कैफ यांनी सर्वाधिक प्रत्येकी ४१ धावा केल्या. स्वप्नीलने फैझ फझलसह ५५ धावांची सलामी दिली, नंतर कैफसह दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ५ बाद १६२ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानचा सोहेल तन्वीर व सामनावीर ठरलेला इंग्लंडचा दिमित्री मस्कारेन्हास यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने मिडलसेक्स पँथर्सचा डाव २० षटकांत ७ बाद ११६ धावांवर रोखला. नमन ओझा, ऑस्ट्रेलियाचा जस्टिन लँगर, अभिषेक राऊत, कर्णधार वॉर्न, मुनाफ पटेल, अमित सिंग हे राजस्थान रॉयल्स संघातील अन्य खेळाडू होते. शॉन उदालच्या नेतृत्वाखालील मिडलसेक्स संघातून इऑन मॉर्गन, ओवेस शाह, डेव्हिड मालन, स्टीव्हन फिन या इंग्लंडच्या आजी-माजी कसोटीपटूंसह भारताचा मुरली कार्तिक, दक्षिण आफ्रिकेचा टायरन हँडरसन हे प्रमुख खेळाडू खेळले होते.

 

``त्या दिवशी गर्दीने फुलून गेलेल्या लॉर्डस मैदानावर खेळलो, ती कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भावना आहे. माझ्यासाठी तो दिवस स्वप्नवत ठरला.``

- स्वप्नील अस्नोडकर

संबंधित बातम्या