पोलिसांनी घडविला राज्यामध्ये कोरोनाविरोधात गजर

Dainik Gomantak
सोमवार, 20 एप्रिल 2020

या उपक्रमातून पोलिसांनी लोकांना कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गाण्यांमधून विनंती करत आहेत त्याला लोक देशात तसेच गोव्यातही पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांनी लोकांना गाण्यांमधून त्यांच्याशी संपर्क साधून कोरोना कधी गंभीर आजार आहे व त्याचा कशाप्रकारे फैलाव होऊ शकतो, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती गाण्यांमधून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न चालविला आहे

पणजी, 

पोलिस  हे नागरिकांचे कधी शत्रू नसतात तर ते मित्रच असतात. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना ते कायद्याचे पालन करत असतात. संकटकाळी ते जीव धोक्यात घालून नागरिकांचे संरक्षण करतात. कोरोना विषाणूने सगळीकडे थैमान घातले आहे. त्यामुळे ‘कोविड-१९’ ला रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी गाण्यांच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात माहिती देत लोकांना घरीच बरण्याचे आवाहन करत आहेत.
या उपक्रमातून पोलिसांनी लोकांना कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गाण्यांमधून विनंती करत आहेत त्याला लोक देशात तसेच गोव्यातही पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांनी लोकांना गाण्यांमधून त्यांच्याशी संपर्क साधून कोरोना कधी गंभीर आजार आहे व त्याचा कशाप्रकारे फैलाव होऊ शकतो, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती गाण्यांमधून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याला बऱ्यापैकी यशही मिळाले आहे. त्यांच्या उपक्रमाला लोकही दाद देत आहेत. पोलिसांचे या गाण्यांचे व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यात जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत पोलिस हा उपक्रम विविध भागामध्ये जाऊन सुरूच ठेवण्याचे ठरविले आहे.
पोलिस खात्यामध्ये उपअधीक्षक पदावर असलेले सेमी तावारिस यांचा तपासकामात हातखंडा त्याचबरोबर ते तियत्रामध्ये गाणी गातात त्यामुळे ते गोमंतकियांना चांगल्या परिचयाचे आहेत. त्यांनी ‘कोविड-१९’ विरोधात तसेच लोकांना मार्गदर्शन करणारे गीत लिहून सादर केले आहे. त्यांनी कोकणीमधून सादर केलेले ‘ओ माझ्या गोंयकारा, मोगाच्या गोंयकारा, भोवनाका तू बाजारा, आर्रे तू बसून राव घरा, कोरानोचा वायरस पसरला संसारा’ असे म्हणत ते गोमंतकियांना घरीच बसण्याची विनंती आपल्या या गाण्यातून करत आहेत. त्यांच्या या गाण्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ते लोकांना या गाण्यांमधून लोकांना कोरोना हा किती गंभीर आजार आहे हे या गाण्यामधून समजवून देत आहेत.
पणजीचे पोलिस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनीही पणजी परिसरात एका हिंदी चित्रपटातील गाण्यांवरील चालीवर कोरोनासंदर्भात गीत सादर करून लोकांना मार्गदर्शन केले होते. त्यांनी ‘ ये कोरोना, हम को है रोकना, रोकेंगे हम इसे, घर में ही तुम रहना’ असे म्हणत लोकांना आवाहन केले होते. पोलिस अधिकारी हे आपली ड्युटी करण्याबरोबरच कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सरसावले आहेत. दिवसभर दैनंदिन काम केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस हे अधिकारी लोकांमध्ये कोरोनाची जनजागृती करण्यासाठी निवासी वसाहत तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन ही गाणी सादर करतात. या उपक्रमांतून लोकांमध्ये कोरोना जागृती करण्याचे ठरल्यानंतर खात्यात असलेले पोलिस गायक पुढे आले व आपले योगदान या गाण्यातून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये महिला पोलिसही मागे राहिलेल्या नाहीत.
वास्को पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक डायगो ग्रासिएस यांनीही ‘मझ्या मोगाळ भावबहिनींनो, उलो आंव मारता तुका, कोरोना वायरस संसारात पातळायला, घरातल्यान बाहेर सरो नका’ असे गाणे सादर करत वास्को परिसरात अनेक भागांमध्ये लोकांमध्ये जागृती करत योगदान दिले आहे. या पोलिसांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून शाबासकीची थाप मिळत असल्याने त्यांचा आत्मविश्‍वासही वाढला आहे. रात्रंदिवस जिवाची तमा न बाळगता व कुटुंबाची पर्वा न करता हे पोलिस लोकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. ते करत असलेल्या त्यांच्या कामाला लोकांकडूनही भरभरून प्रशंसा केली जात आहे.
पोलिस खात्यामध्ये असलेल्या महिला पोलिसही या कामात मागे राहिल्या नाहीत. महिला पोलिस उपनिरीक्षक सपना गावस व पोलिस कॉन्स्टेबल भक्ती देविदास यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या महिला पोलिसांनीही गाण्यांमधून लोकांना कोरोनाची जागृती करत लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या या गाण्यांच्या सादरीकरणाला लोकांकडून दाद मिळत आहेत. उपनिरीक्षक सपना गावस आपल्या सुरेल आवाजात ‘आमका भवचें दिसता सगळीकडे, पण आम्ही कायदो मोडचे ना, आम्ही लॉकडाऊन तोडची ना, घराबाहेर सरची ना’ असे गाण म्हणत लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. वास्को रेल्वे ठाण्याची पोलिस कॉन्स्टेबल भक्ती देविदास हिनेही ‘मझ्या बहिनी नी मझ्या भावा, सांगणे ऐक सरकाराचे, हे दिस पासिएस काढापाचे, एकमेकाक आधार आमी दिवपाचे, असो येंव नाका तुमी मधी मधी बाजारा, बाजार करताना करतोलो दुवेंत शेजारा’ असे संकेत देत व मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे हे व्हिडिओ फेसबुकवरही अपलोड झाल्याने लोकही त्यांच्या या कोरोनासंदर्भातच्या गाण्यांचा आस्वाद घेत आहेत.
पर्वरीचे पोलिस उपअधीक्षक एडविन कुलासो यांनी कोरोनासंदर्भातचे गीत लिहिन ते गायले आहे व ते यू ट्यूबवर अपलोड केले आहे. या गाण्यालाही लोकांनी उचलून धरले आहेत. पोलिस या गाण्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन त्यांना कोरोनाचे होणार परिणाम व त्यासाठी घ्यावयाची काळजी ही गाण्यांमधून पोहचविण्यास चांगलेच यशस्वी ठरले आहेत.

प्रोत्साहनासाठी प्रशंसा प्रमाणपत्र
राज्यात लॉकडाऊनच्या काळात लोकांमध्ये जनजागृती तसेच वृद्धांना तसेच गरजूंना मदत करणाऱ्या पोलिसांच्या कामाची दखल घेऊन प्रतिदिन ‘कॉप ऑफ द डे’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. काहीजण गाण्यांमधून तर काही घरोघरी जाऊन लोकांना कोरोनाची जागृती करत आहेत. वृद्धांना जीवनावश्‍यक वस्तू तसेच औषधे घरी नेऊन देण्याची मदत काही पोलिस करत आहे. सामाजिक अंतर म्हणजे काय हे ग्रामीण भागात तसेच झोपडपट्टी भागातील लोकांना समजवण्याचे काम करत आहेत. ‘कोविड-१९’ विरोधात आपापले योगदान देण्यास पोलिसांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.

 

संबंधित बातम्या