गोवा मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसात तक्रार!

dainik gomantak
शनिवार, 25 एप्रिल 2020

गोवा मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसात तक्रार!

पणजी,

राज्यात टाळेबंदीच्या काळात कोविड - १९ च्या मार्गदर्शक तत्‍वानुसार प्रत्येकाने तोंडाला मास्क लावा अशी सक्ती करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र, तेच स्वतः मास्क न लावता फिरत असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार खोर्ली - म्हापसा यथील संजय बर्डे यांनी केली आहे. कायदा हा सर्वांना समान असल्याने नियमभंग केलेल्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध कारवाई व्हायला हवी, असे ते म्हणाले.
राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आल्यापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे वाहनातून प्रवास करताना किंवा बैठका घेताना सामाजिक अंतर ठेवत नाहीत, तसेच तोंडाला मास्क लावत नाहीत. गेल्या २० एप्रिलपासून मास्क व सामाजिक अंतर सक्तीचे केले असताना त्यांनी या कोविड - १९ नियमांचे उल्लंघन केले आहे. या नव्या नियमांनुसार पोलिस नागरिकांना अडवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करत आहेत. मात्र, ज्यांनी त्याची सक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले आहे तेच स्वतः त्याचे पालन करत नाहीत. नागरिकांना मास्क न वापरल्याने किंवा सामाजिक अंतर न ठेवल्याने पोलिस अडवत आहेत व इतर काही कारणाखाली दंड वसूल करत आहेत. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बर्डे यांनी तक्रारीत केली आहे.

 

संबंधित बातम्या