खाकी वर्दीतील पोलिस ठरताहेत तारणहार!

dainik gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020
खाकी वर्दीतील पोलिस ठरताहेत तारणहार!

पणजी,

राज्यात टाळेबंदीच्या काळात कोरोना विषाणू साथीपासून दूर राहण्यासाठी जनजागृतीचा गाण्यांमधून गजर करण्याबरोबरच सोशल मीडिया कक्षाद्वारे अडचणीत असलेल्या सुमारे दीडशेहून अधिक नागरिकांना आधार दिला. प्रतिदिन सरासरी चार व्यक्तींपर्यंत हे कक्ष संकटात असलेल्यांपर्यंत पोहोचले. खाकी वर्दीतील माणुसकी दाखवून पोलिसांचे नागरिकांशी मित्रत्त्वाचे नाते अधिक दृढ होत आहे. या कक्षाद्वारे ‘कोविड - १९’ संदर्भात बोगस व चुकीची माहिती सोशल मीडियावरून देणाऱ्यांची दखल व त्यावर नजर ठेवली जात आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना या कक्षाची जबाबदारी सांभाळत असलेले पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना म्हणाले की, राज्यातून प्रतिदिन पोलिस सोशल मीडिया कक्षाला अनेक कॉल्स तसेच ट्विटर व व्हॉट्‍स ॲपवरून मदतीची मागणी केली जाते. सोशल मीडियाची किंवा मोबाईल कॉल्सची माहिती घेऊन त्यांच्या समस्येनुसार त्याला प्राधान्य दिले जात आहे.
टाळेबंदीच्‍या काळात पोलिसही लोकांसाठी आधार बनले आहेत. त्यांनी स्वतः गरजवंतांपर्यंत पोहोचून मदतीचा हात दिला आहे. पोलिस कर्तव्य बजावताना माणुसकी हे ध्येय ठरवून अनेक प्रकारे मदत करत आहेत. या कक्षाकडे आलेले कॉल्स किंवा ट्विटर किंवा व्हॉट्‍स ॲपच्या मार्गाने मागितलेल्या या मदतीमध्ये अन्नपुरवठा, औषधे, अडकून पडणे तसेच इस्पितळात जाण्यासाठी सुविधा पुरविण्यासंदर्भातचा त्यामध्ये समावेश आहे. काहींना आर्थिक मदतही पोलिसांनी स्वतः पदरमोड करून केली आहे. टाळेबंदीच्‍या काळात प्रत्येकजण संकटात आहे. त्याला मदतीचा हात देणे हे कर्तव्य ठरवून हे कक्ष काम करत आहे.

पोलिस सोशल मीडिया कक्ष हे २४ तास सुरू असून त्यासाठी वेगळा कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. जर बोगस किंवा चुकीची
माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध करून कोरोनासंदर्भात लोकांमध्ये भिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोरोना या साथीसंदर्भात संभ्रमात टाकणारे संदेश कोणत्याच सोशल मीडियावरून पाठवले जाऊ नयेत. लोकांनी कोरोनासंदर्भात सोशल मीडियावरून माहिती वाचताना किंवा ती दुसऱ्याला पाठविताना त्याची पडताळणी केल्याशिवाय त्यावर विश्‍वास ठेवू नये. त्याची ‘गुगल’वरून तपासणी करा.
- शोबित सक्सेना, अधीक्षक, सोशल मीडिया कक्ष प्रमुख.

अफवाबहाद्दरांवर विशेष लक्ष
कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांचे सोशल मीडिया कक्ष कोविड - १९ संदर्भात बोगस व चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवरही लक्ष ठेवून आहे. कोरोना विषाणू साथीबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. कोणत्याहीक्षणी मदतीस पोलिसांनी तयारी ठेवलेली आहे.
जिल्हा पोलिस तसेच क्राईम बँच विभागांच्या पोलिसांच्या मदतीने या कक्षाकडे आलेली माहिती त्यांना पाठवून मदतीचा हात मागणाऱ्यांना आधार दिला जात आहे. डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रयत्न करत असताना गोवा पोलिस त्यांच्या जोडीनेच राज्यातील लोकांमध्ये जनजागृती करून सामाजिक अंतर तसेच तोंडाला मास्क लावण्याची विनंती करत टाळेबंदीच्‍या काळात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे. पोलिसांकडून सोशल मीडियावरूनही जनजागृती सुरू आहे.

संदेशाची होते पडताळणी
नागरिकांना काही समस्या किंवा मदत पाहिजे असल्यास ते पोलिस नियंत्रण कक्षाच्या क्रमांक ११२ वर फोन केल्यास त्या व्यक्तीला सोशल मीडिया कक्षाच्या संबंधित अधिकाऱ्याकडे पाठविला जातो. ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवरून केलेल्या मदतीची दखल घेतली जाते व त्या भागातील पोलिस ठाण्याशी संपर्क साधून त्याची कार्यवाही केली जाते. लोकांना पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधण्यासाठी सर्व मार्ग खुले ठेवले आहेत. सोशल मीडियावर पोलिस अधिक सक्रीय झाले आहेत. पोलिस ठाण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या व मदत देण्याला ते अधिक प्राधान्य देत आहेत. संकटात सापडलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवून मदत करणे हे सोशल मीडिया कक्षाचे लक्ष्य असल्‍याचे अधीक्षक शोबित सक्सेना यांनी सांगितले.

संबंधित बातम्या