पंचायत क्षेत्रातील गाडेसंदर्भात धोरण लवकरच

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

सचिवांना देणार जबाबदारी, पंचायतमंत्री गुदिन्हो यांचे विधानसभेत उत्तर

राज्यातील पंचायत क्षेत्रातील गाडेसंदर्भात येत्या तीन महिन्यात धोरण तयार केले जाईल. पंचायतीमध्ये समान डिझाईनचे हे गाळे असतील. १५ वर्षांचे गोव्यातील वास्तव्य असलेल्यांनाच हे गाडे घालण्यास परवानगी दिली जाईल.

पणजी :  पंचायत खात्याने दिलेल्या आदेशांची पूर्तता करून कारवाई करण्याची जबाबदारी पंचायत सविचांना देण्यासंदर्भातचे परिपत्रक लवकरच जारी केले जाईल, अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रश्‍नोत्तर तासावेळी विधानसभेत दिली.

पंचायत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे येत आहेत त्याविरुद्ध काय पावले पंचायतीने उचललेली आहेत असा प्रश्‍न आमदार रोहन खंवटे यांनी केला व कारवाई करण्याची मागणी केली. पंचायतराज कायद्यात नसलेल्या अधिकाराचा गैरवापर करून पंचायतमंत्र्यांनी परिपत्रके काढू नयेत. कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे असा टोमणा आमदार खवंटे यांनी हाणला.

याला उत्तर देताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की, बेकायदा बांधकामांसंदर्भात पंचायत गटविकास अधिकारी, अतिरिक्त संचालक तसेच संचालक या ॲपेलेट अधिकारिणीकडून कारवाईचे आदेश दिले जातात मात्र सरपंच त्याची कार्यवाही न करता तो आदेश पंचायत मंडळासमोर चर्चेला ठेवतात व त्यावर वेळकाढूपणा करतात. पंचायतीकडून आदेश पाळले जात नाहीत. त्यामुळे या आदेशाचे पालन करण्यासाठी पंचायत सचिवांना जबाबदारी देण्यात येऊन त्यासंदर्भातचे परिपत्रक काढण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदपथ व रस्त्याच्या बाजूने असलेले हातगाडे हटविण्यात आले होते. काही भागात असलेले हे गाडे घाणरेड्या अवस्थेत आहेत. पंचायतींनी या गाडेधारकांना हातगाडेचा परवाना दिला आहे मात्र अनेकांनी पक्के बांधकाम केले आहे. गोमंतकिय स्वतःच्या नावावर परवाना घेऊन ते भाडेपट्टीवर परप्रांतियांना दिले आहेत.

पालिकेमध्ये संबंधित मतदारसंघातील आमदार हा ‘एक्स-ऑफिसिओ’ सदस्य असतो त्याप्रमाणे पंचायतीवरही नियुक्ती केली जावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली असता मंत्री गुदिन्हो यांनी ही चांगली सूचना असून, कायद्यात दुरुस्ती करून महिन्यात ती पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले.

माध्यमिक शालेय स्तरावरून शिक्षण सोडण्याचे प्रमाण घटले​

रोजीरोटी न थांबवता, त्यांना दंड द्या ः खंवटे
पंचायतराज कायद्यात प्रत्येक पंचायतीमध्ये फेरीवाले क्षेत्राची सक्ती आहे व फेरीवाल्यांसाठी पथ असायला हवे. त्याची अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाही. राज्यात अनेक शिक्षित गोमंतकिय तरुण बेरोजगारीमुळे गाडे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीवर सरकार का येते? जर कोणी परवान्याचा गैरवापर करत असतील तर त्यांना दंड द्या, असे मत खंवटे यांनी मांडले. गाडे परवान्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करतोच तसेच येत्या तीन महिन्यात हातगाडेधारकांसाठी धोरण तयार केली जाईल. काही या गाडेवजा दुकानांवर ड्रग्जची विक्री केली जाते. त्याची पोलिसांमार्फत चौकशी करायला हवी. काही गुंडप्रवृत्तीचे तरुणही हे गाडे चालवतात असे मंत्री गुदिन्हो यांनी सभागृहात सांगितले.

संबंधित बातम्या