फोंड्यात ८० टक्के दुकाने सुरू!

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020
शहरात लोकांची वर्दळ वाढली, सोशल डिस्टन्सिंग राखण्याची गरज

फोंडा

 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्यातरी गोवा राज्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. फोंड्यात कालपासून सुमारे 80 टक्के दुकाने व आस्थापने खुली करण्यात आली आहेत, मात्र फोंड्यातील भाजी व मासळी मार्केट खुले करण्यात आलेले नाही. फक्त भाजी व फळांचे मार्केट तेवढे मार्केट संकूलाच्या मागे असलेल्या जागेत हलवण्यात आले आहे. बहुतांश दुकाने खुली झाल्याने लोकांची वर्दळ वाढली आहे.
कोरोनाचा गोव्यात सध्या तरी प्रादूर्भाव नसल्याने राज्यातील विविध उद्योग व व्यवसाय मार्गी लागले आहेत. फोंड्यातील कुंडई, बेतोडा व मडकई या औद्योगिक वसाहतीतील सुमारे पन्नास टक्के उद्योग व कारखाने सुरू झाले आहेत, मात्र प्रवासी बससुविधा नसल्याने खुल्या झालेल्या या औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पांना कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. फक्त बड्या औद्योगिक प्रकल्पात कामगारांची ने आण करण्यासाठी या कंपन्यांनी खाजगी बससुविधा ठेवल्याने या कंपन्यांचे काम बऱ्याच अंशी सुरळीत चालू झाले आहे.
फोंड्यातील मासळी व भाजी मार्केट बंदच ठेवण्यात आले आहे. मासळी व भाजी मार्केट बंद ठेवले असले तरी मिळेल तो सध्या व्यापारी बनला आहे. वाहनातून फळे व भाजीची विक्री जोरात सुरू असून रस्त्याच्या कडेला बसूनही विक्रेते माल विकताना दिसतात. माशांची विक्री तर बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला होत असून स्वच्छतेचे तीन तेरा झालेले दिसत आहेत. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचा तर बऱ्याचदा फज्जा उडालेला आढळतो. ग्राहकांना दिलासादायक बाब म्हणजे सध्या फोंडा पालिकेने वरचा बाजार भागातील मार्केट संकुलाच्या मागे असलेल्या विस्तिर्ण जागेत सध्या भाजी व फळविक्रीचे मार्केट सुरू केले आहे. पण ही जागाही तशी तोकडीच पडते आहे.
काल (सोमवारपासून) फोंडा शहरातील विविध दुकाने खुली झाली. सुमारे ऐशी टक्के दुकाने उघडलेली आढळली. काही दुकाने उघडून दुकानदार साफसफाई करताना दिसले. विशेषतः मिठाईच्या काही दुकानात मिठाईची विक्री न झाल्याने ती फेकून द्यावी लागल्याचे या दुकानदारांनी सांगितले. वाहन दुरुस्ती गॅरेज तसेच कपडे, रेडिमेड साहित्य व अन्य दुकाने खुली झालेली दिसली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ग्राहकांची वर्दळही वाढली आहे.

कोणती दुकाने आहेत बंद...!
केश कर्तनालय, भांड्यांची दुकाने, सोनारांची दुकाने, फोटो स्टुडिओ, बार व रेस्टॉरंट, टायर विक्री दुकाने, टेलर, ब्युटी सलून तसेच काही गाडेवाले, मिठाईवाले व इतर काही दुकानांचा त्यात समावेश आहे. हॉटेल्स बंद, फक्त "टेकअवे' सुविधा.

बससुविधा नसल्याने गर्दी कमी
कोरोनाच्या धास्तीमुळे राज्यात प्रवासी बससुविधा बंदच आहे. फक्त कदंब महामंडळाच्या काही बसगाड्या तेवढ्या रस्त्यावरून धावताना दिसतात. या बसगाड्यांतून विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांची नेआण केली जात असून अधूनमधून काही खाजगी प्रवासीही या बसगाड्यात दिसतात, मात्र हे प्रमाण नगण्य आहे. प्रवासी बसगाड्या सुरू नसल्याने विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना बाजारात येण्यास मिळत नाही, त्यामुळेच बाजारात गर्दी दिसत नाही.

संबंधित बातम्या