उद्योगपतींना सुविधा, गरिबांकडे दुर्लक्ष अमरनाथ पणजीकर यांची टीका

Dainik Gomantak
सोमवार, 13 एप्रिल 2020

भांडवलदार व बडे उद्योगपती यांनाच सर्व सुविधा देणे व गोरगरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे हे भाजपचे भांडवलदारपूरक धोरण आहे.

पणजी, 

भांडवलदार व बडे उद्योगपती यांनाच सर्व सुविधा देणे व गोरगरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे हे भाजपचे भांडवलदारपूरक धोरण आहे. तेच धोरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोव्याची अर्थव्यवस्था पुनर्रजीवीत करण्यासाठी नेमलेल्या समितीवरील सदस्यांची नावे समजल्यावर उघड झाले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
त्यांनी पत्रकात म्हटले आहे, की सरकारने काल जाहीर केलेल्या समितीत बडे उद्योगपती व उद्योजक यांचीच नावे असून यातील बहुतेक जणांचा आपल्या उद्योग - व्यवसायासाठी सरकारकडून आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न असेल. स्वतःचे हितसंबंध गुंतलेले असताना ते इतरांचा विचार कसा काय करतील हे कळणे कठीण आहे. या समितीवर लहान व्यावसायिक, गाडे व्यापारी, बेकरीवाले, मोटारसायकल पायलट व रिक्षा असोसिएशन, कामगार संघटना, बार व तावेर्न, केश कर्तनालय अशा लहान व्यावसायिकांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आलेले नाही. आज खरी म्हणजे या लोकांनाच सर्वाधिक आर्थिक झळ बसलेली असून असंवेदनशिल सरकारला मात्र त्याचे पडलेले नाही. 
भाजपचे केंद्र व राज्यातील सरकारे नेहमीच मोठे उद्योगपती व व्यावसायिक यांचीच भलावण करीत आली असून त्यांची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ करताना मोदी सरकारने शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न देता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. गोव्यातील भाजप सरकार मोदींचाच कित्ता गिरवत असून टाळेबंदीच्या पहिल्या आठवड्यात लहान बाळ, वयोवृद्ध यांना दूध व पावापासून वंचित ठेवून भाजपचे मंत्री आमदार व पदाधिकारी हे जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करण्यात गुंतले होते हे जनता विसरलेली नाही. कोणतेही सुरक्षा कवच न देता अंगणवाडी सेविका, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सरकारने आज सामाजिक सर्वेक्षणाच्या नावाखाली कोरोना विषाणूच्या विळख्यात ढकलले आहे. यात काही बरे-वाईट झाल्यास गोमंतकीय जनता या सरकारला कदापी माफ करणार नाही, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

 

संबंधित बातम्या