खराब कामगिरीचे खापर प्रशिक्षकांवर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

पणजी: चर्चिल ब्रदर्सच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील खराब कामगिरीचे खापर त्यांच्या प्रशिक्षकांवर फुटले आहे. ११ संघांत सध्या आठव्या क्रमांकावर असलेल्या माजी विजेत्या संघाच्या व्यवस्थापनाने बाकी पाच सामन्यांसाठी प्रशिक्षक बदलला आहे.

पणजी: चर्चिल ब्रदर्सच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील खराब कामगिरीचे खापर त्यांच्या प्रशिक्षकांवर फुटले आहे. ११ संघांत सध्या आठव्या क्रमांकावर असलेल्या माजी विजेत्या संघाच्या व्यवस्थापनाने बाकी पाच सामन्यांसाठी प्रशिक्षक बदलला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चर्चिल ब्रदर्सने पोर्तुगीज प्रशिक्षक बर्नार्डो तावारीस यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून दूर करत मातेस कॉस्ता यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली आहे. चर्चिल ब्रदर्सने यंदाच्या मोसमात १५ सामन्यांत ६ विजय, २ बरोबरी व ७ पराभव यासह २० गुण अशी कामगिरी केली आहे. सध्या ते आठव्या स्थानी असले, तरी त्यांनाही उपविजेतेपदाची अंधूक आशा आहे.

चर्चिल ब्रदर्सचे स्पर्धेतील बाकी पाचही सामने अवे मैदानावर खेळले जातील. मागील लढतीत फातोर्डा येथे गोकुळम केरळा एफसीविरुद्ध शेवटच्या मिनिटास गोल स्वीकारल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी इंफाळमध्ये त्यांना ट्राऊ एफसी संघाने हरविले होते. लागोपाठच्या दोन पराभवामुळे तिसऱ्या क्रमांकावरून चर्चिल ब्रदर्सची चक्क आठव्या स्थानी घसरगुंडी उडाली आहे.

यंदा मोसमाच्या सुरवातीस चर्चिल ब्रदर्सने घानाचे माजी विश्वकरंडक प्रशिक्षक एडवर्ड अन्सा यांची संघ प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती, पण तांत्रिक कारणास्तव ते पदभार स्वीकारू शकले नाहीत. त्यानंतर तावारीस यांच्याकडे चर्चिल ब्रदर्स संघाची सूत्रे सोपविण्यात आली. चर्चिल ब्रदर्सची मोसमातील सुरवात सकारात्मक होती, मात्र नंतर मोहिमेत चढउतार राहिले. नवोदित खेळाडूंच्या इंडियन एरोज संघानेही त्यांना हरविले. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे चर्चिल ब्रदर्स संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. नंतर त्यांना पहिल्या तीन संघांतही स्थान राखण्यात अपयश आल्यामुळे पोर्तुगीज प्रशिक्षक तावारीस यांना पदावरून काढण्याचे निश्चित झाले.

बाकी पाचही अवे आय-लीग सामन्यांसाठी चर्चिल ब्रदर्स संघ सध्या मातेस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. ते स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना १८ मार्च रोजी रियल काश्मीरविरुद्ध श्रीनगर येथे खेळला जाईल.

संबंधित बातम्या