्त्‍या कोरोनाग्रस्‍तांना बरे होण्‍यासाठी द्यावा लागला मानसिक आधारही

Dainik Gomantak
मंगळवार, 14 एप्रिल 2020

रुग्‍ण जर मानसिकदृष्‍ट्या एखाद्या रोगाचा सामना करू शकत असेल तरच तो शारीरिकदृष्‍ट्या उपचारांना प्रतिसाद देतो, असा वैद्यकीय सिध्‍दांत आहे.

तेजश्री कुंभार

पणजी, 

कोरोना विषाणूचे नाव ऐकले की अंगावर काटा येतो. ज्‍यांना या विषाणूची लागण झाली आहे त्‍यांना मृत्‍यूची भीती सतावत असते. गोव्‍यातील ७ कोरोनाग्रस्‍त रुग्‍णांपैकी ५ रूग्‍ण ठणठणीत बरे झाले. याचे श्रेय वैद्यकीय उपचारांसह मानसिक आधारालाही जाते. आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी या रुग्‍णांमध्ये सकारात्‍मक दृष्टिकोन वाढावा यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली. ते स्‍वतःही रुग्‍णांसोबत व्‍हिडिओ कॉलच्‍या माध्‍यमातून संपर्कात होते. त्यामुळे हे शक्‍य झाल्‍याची माहिती इएसआय, मडगाव रुग्‍णालयातील सूत्रांनी दिली.
जेव्‍हा रुग्‍णाला कोरोनाची लागण होते, तेव्‍हा आजुबाजूचे वातावरण इतके नकारात्‍मक बनते की रुग्‍णालाही आपला आता मृत्‍यू होणार असेच वाटते. मात्र रुग्णांमधील भीती मानसोपचार तज्ज्ञांच्‍या मदतीने कमी करून, त्‍यांच्‍यात सकारात्‍मकता वाढीस लावली तर त्‍यांचे उपचार अधिक चांगले होण्‍यास अधिक होते. रुग्‍ण जर मानसिकदृष्‍ट्या एखाद्या रोगाचा सामना करू शकत असेल तरच तो शारीरिकदृष्‍ट्या उपचारांना प्रतिसाद देतो, असा वैद्यकीय सिध्‍दांत आहे. त्‍यामुळे इएसआय रुग्‍णालयातून जे रुग्‍ण बरे होऊन घरी गेले त्‍यांच्‍याबाबतीत आणि सध्‍या ज्‍या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत, त्‍यांच्‍यात सकारात्‍मकता वाढीस लागावी, यासाठी तज्ज्ञांची टीम झटत आहे. 

...म्‍हणूनच बरे झालो
इएसआय रुग्‍णालयातील डॉ. एडवीन गोम्‍स आणि त्‍यांची टीम येथील कोरोनाग्रस्‍तांमध्‍ये आणि डॉक्‍टरांमध्‍ये केवळ रुग्‍ण आणि डॉक्‍टराचे नाते न राहता कौटुंबिक नाते तयार व्‍हावे म्‍हणून प्रयत्‍नरत असतात. या रुग्‍णांशी आरोग्‍यमंत्री व्‍हिडिओ कॉलच्‍या माध्‍यमातून संपर्कात होते. मानसोपचार तज्ज्ञही विविध गोष्‍टी सांगून मन सकारात्‍मक करीत असल्‍याने आम्ही लवकर बरे होऊ शकलो, अशी प्रतिक्रिया कोरोनाच्या विळख्यातून बचावलेल्या रुग्णांनी दिली.

संबंधित बातम्या