प्रतिध्वनी महोत्सवात गायन, वादन मैफली रंगल्या

वृत्तसंस्था
सोमवार, 2 मार्च 2020

हिंदूस्थानी संगीत क्षेत्रातील तरुण गायक फ्रान्सिस रॉड्रीक्स यांच्या स्मृतिला वाहिलेला प्रतिध्वनी हा संगीत महोत्सव गायन वादनादी मैफलींनी रविवारी आयएमबी सभागृहात रंगला.

पणजी (गोवा) : हिंदूस्थानी संगीत क्षेत्रातील तरुण गायक फ्रान्सिस रॉड्रीक्स यांच्या स्मृतिला वाहिलेला प्रतिध्वनी हा संगीत महोत्सव गायन वादनादी मैफलींनी रविवारी आयएमबी सभागृहात रंगला. यात सतरा गोमंतकीय कलाकारांचा समावेश होता. 'स्वस्तिक' ने इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रांगाझा (आयएमबी) च्या सहयोगाने हा नववा महोत्सव आजोजित केला होता.

युवा गायिका नम्रता पराडकर यांच्या गायनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यांनी विभास रागातील विलंबीत व द्रुत एकतालातील दोन बंदिशी आळवल्या. निकोप आवाज, संयत आलाषी, प्रभावी ताना याद्वारे त्यांनी रसिकांना स्वरानंद दिला. त्यांना नितीन कोरगावकर (तबला), सुनाद कोरगावकर (संवादिनी) व शिवानी सिलीमखान (तानपुरा) यांनी साथ संगत केली. त्यानंतर दिलीप गडेकर यांचे हार्मोनियम एकलवादन झाले. त्यांनी गायती अंगाने वादन केले. विलंबीत बंदिश रुपकमध्ये निबद्ध होती व द्रुत तिनतालमध्ये त्याला जोडून अतीद्रु लयीत त्यांनी एक बंदिश वाजवून वादनाची रंगत वाढविली. त्यांना बाबाजी पेडणेकर यांनी तबल्यावर तर गडेकर यांच्या शिष्या श्रेयस गावडे यांनी हार्मोनियमवर साथ दिली. भारत बाणावलीकर तंबोऱ्यावर साथीला होते. सकाळच्या सत्राचा समारोप पं. प्रभाकर कारेकर यांचे शिष्य संदेश खेडेकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी सारंग राग विस्ताराने आळविला. आलाप, बोलआलाप, सरगम, ताना यांचा सुयोग्य मेळ साधून त्यांनी सारंग राग नीटसपणे पेश करुन तराणा रचनेने रंगत आणली. नभास या आले पर.. या अभिषेकीबुवांनी संगीतबद्ध केलेल्या भावपूर्ण रचनेने त्यांनी मैफलीची गोडी वाढविली. त्यांना ज्येष्ठ वादक पंडित तुळशीदास नावेलकर (तबला), विठ्ठल खांडोळकर (संवादिनी), निलीमा खेडेकर (तंबोरा), विलास पालकर (पखवाज) यांनी साथसंगत केली.

संध्याकाळच्या सत्रात प्रथम पल्लवी पाटील यांचे गायन झाले. त्यांनी कलावती राग आपल्या मधुर आवाजात भावपूर्णतेने पेश केला. आलाप, बोलआलाप, सरगम, ताना यांची सुरेख गुंफण करुन त्यांनी स्वरानंद दिला. त्यांना दयानंद कांदोळकर (तबला), श्रेयस गावडे (संवादिनी), वासिम खान (सारंगी) यांनी साथसंगत केली. पं. रामदास पळसुले यांचे शिष्य विभळ खांडोळकर यांच्या तडफदार तबला एकल वादनाने कार्यक्रमात बहार आली. त्यांनी झपताल पेशकार, कायदे, रेला, गत, तुकडे अशा रचना तयारीने पेश करुन दाद घेतली. त्यांना दत्तराज म्हळशी यांनी नगमा साथ दिली.

डॉ. प्रवीण गावकर यांच्या रसिल्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनी मालकंस राग सादर केला. मधुर आलापी, लयकारीच्या अंगाने केलेली बोलआलापी, सरगमची नजाकत आणि तानांची सुरेख गुंफण करून त्यांनी रंगत आणली. त्यांना दत्तराज सुर्लकर (संवादिनी), दयानिधेश कोसंबे (तबला), वासिम खान (सारंगी) यांची साथसंगत लाभली.

डॉ. रमेश धुमे यांच्या हस्ते संगीत महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्वस्तिकचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गावकर, ज्येष्ठ कलाकार विठ्ठल खांडोळकर, रंगकर्मी निलेश महाले उपस्थित होते. हेतल गंगानी व नेहा उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.

फ्रान्सिस रॉड्रीक्स हा तरुण ख्रिस्तीधर्मातील परंतु त्याने हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, अभंग, नाट्यसंगीत गायनात आपले कौशल्य सिद्ध केले होते आणि तरुण वयातच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याचे अचानक निघून जाणे धक्कादायक होते. अशा या तरुण कलाकारांची स्मृती गेली ९ वर्षे स्वस्तिकतर्फे जागविली जात आहे. व त्यानिमित्ताने फ्रान्सिसची माता ख्रिस्तालीन रॉड्रीक्स हिचा सत्कार करून तिला आर्थिक मदतही दिली जाते. तिचा पुत्र असा अकाली गेल्याने तिच्यावर संकट कोसळले होते. यंदा श्रीमती ख्रितालीन यांचा सत्कार संस्थेचे आश्रयदाते डॉ. रमेश धुमे व विनयकुमार मंत्रवादी यांच्या हस्ते करून त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी संस्थेचे सदस्य राधाकृष्ण मालवणकर उपस्थित होते. डॉ. प्रवीण गावकर यांनी मनोगत व्यक्त केले.

 

संबंधित बातम्या