डिचोलीत घरे शाकारणीच्या कामाची लगबग..!

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

‘टाळेबंदी’मुळे सध्या प्लास्टिकची अनुपलब्धता आहे. त्यामुळे पावसाच्या झडीपासून बचाव करण्यासाठी घरांना प्लास्टिकची आच्छादने घालण्याची कामे खोळंबली आहेत.

डिचोली

डिचोलीत अखेर एकदाची घरे शाकारणीच्या कामांची लगबग सुरू झाली असून, यंदा मात्र ‘टाळेबंदी’मुळे सोशल डिस्टन्शिंगचे पालन करून ही कामे करावी लागत आहेत. तालुक्‍यातील काही भागात सध्या घरे शाकारणीची कामे सुरू झाली आहेत. घरे शाकारणीची कामे सुरू झाली असली, तरी ‘टाळेबंदी’मुळे सध्या प्लास्टिकची अनुपलब्धता आहे. त्यामुळे पावसाच्या झडीपासून बचाव करण्यासाठी घरांना प्लास्टिकची आच्छादने घालण्याची कामे खोळंबली आहेत. दरवर्षी मान्सूनला साधारण दीड-दोन महिने असताना सर्वत्र मान्सूनपूर्व कामांकडे नागरिक लक्ष केंद्रीत करीत असतात. काळ बदलत गेला तशी कौलारु घरांची संख्या कमी होत गेली. आता स्लॅबची घरे बांधण्याकडे नागरिकांचा अधिक कल असला, तरी आजही डिचोली शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागात कौलारू घरांची संख्या कमी नाही. काही भागात तर आजही गावठी कौलारू घरे आढळून येतात. पावसाच्या पाण्याची गळती लागू नये, यासाठी बहुतेकजण दरवर्षी पावसाच्या आगमनाची चाहुल लागताच कौलारु घरांची शाकारणी करण्याच्या कामाकडे वळतात. बहुतेक ग्रामीण भागात तर घरांबरोबरच ग्रामीण भागात गोठे शाकारणीचीही कामे करावी लागतात.

कामगारांची कमतरता..!
एक काळ असा होता, की ग्रामीण भागात बहुतेक सर्वच घरे कौलारू होती. त्याकाळी गावोगावी ‘एकमेका साह्य करू’ या उक्‍तीप्रमाणे एकमेकांच्या मदतीने घरे शाकारणीची कामे करण्यात येत होती. त्याकाळी कामगारही सहज उपलब्ध होत असे. मात्र, आता ही कामे करण्यासाठी कामगारांवरच अवलंबून रहावे लागते. त्यातच शाकारणीची कामे करण्यासाठी कामगार मिळणे दुरापास्त झाले असून, मजुरीही बरीच वाढली आहे. कामगार मिळालेच तर ते रोजंदारीवर काम करण्यास तयार नसतात. तर कामाचे कंत्राट दिले, तरच ते काम करण्यास तयार होतात. अशी सध्याची परिस्थिती आहे

 

 

संबंधित बातम्या

Tags