गर्भवती मातांनो चिंता नको, नियम पाळा!

Dainik Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

गर्भवती मातांनो चिंता नको, नियम पाळा!

तेजश्री कुंभार, 
पणजी,

‘आई जसा विचार करते, तेच परिणाम गर्भातील बाळावर होतात’, असे जाणकारांकडून म्‍हटले जाते. जगभरात कोरोनाने थैमान माजविले आहे. त्‍यामुळे आजुबाजूच्‍या नकारात्‍मक वातावरणाचा परिणाम गरोदर महिलांवरही होत आहे. परिणामी त्‍या कोरोनाच्‍या तणावाखाली असल्‍याचे चित्र समोर येत आहे. मात्र, राज्‍यातील परिस्‍थिती चिंता करण्‍यासारखी नाही. गरोदर महिलांनी घराबाहेर न पडता, गरज असल्‍यासच दवाखान्‍यासाठी बाहेर पडण्‍याचा सल्‍ला स्‍त्रीरोगतज्‍ज्ञांनी दिला.
राज्‍यातील अनेक सराकारी तसेच खासगी इस्‍पितळांतील या समस्‍येवर उपाय शोधण्‍यासाठी डॉक्‍टरांचे फोन क्रमांक गर्भवती मातांना दिले आहेत. जेणेकरून त्‍यांना भेटण्‍यास येण्‍याची गरज भासलीच, तर सामाजिक अंतर पाळण्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घ्‍यावी. तसेच अनेक डॉक्‍टर फोनच्‍या माध्‍यमातूनही औषधे आणि गोळ्या घेण्‍याचा सल्ला देऊन मदत करीत आहेत.

चिंता नको, नियम पाळा! 
राज्‍यातील स्‍थिती पाहता कोरोनाबाबत ताण घेण्‍याची गरज नाही. केवळ सामाजिक अंतर पाळण्‍याचा प्रयत्‍न करा. गरज असेल तरच सोनोग्राफी आणि रक्‍ताच्‍या चाचण्‍या करा, अन्‍यथा नको, अशी सूचना स्‍त्रीरोगतज्ञ केदार पडते यांनी दिली. आमच्‍या इस्‍पितळाशी संलग्‍नित महिलांशी आम्‍ही फोनच्‍या माध्‍यमातून संपर्कात असून एका तासात इस्‍पितळात केवळ एका रुग्‍णाला भेटता येण्याबाबतची काळजी घेत असल्‍याचे डॉ. पडते म्‍हणाले. 
 

राज्‍यात सुमारे सहा हजार गरोदर माता
राज्‍यात सुमारे ६ हजार गरोदर माता आहेत. त्‍यांच्‍यापर्यंत आरोग्‍यवर्धक खाद्य आणि योग्‍य माहिती पोहोचविण्‍यासाठी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांना मास्‍क, सॅनिटायझर पुरविले आहेत. गर्भवती मातांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी असून आम्‍ही ती पार पाडत असल्‍याची माहिती महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याच्‍या संचालक दीपाली नाईक यांनी दिली. 

संबंधित बातम्या