त्रिस्‍तरीय यंत्रणा; स्‍थानिक मुद्द्यांना प्राधान्‍य

Priority for local issues says Tanavade
Priority for local issues says Tanavade

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने त्रिस्तरीय प्रचार यंत्रणा राबवली आहे. स्थानिक मुद्द्यांवर प्रचारात भर दिला आहे. कार्यकर्त्यांत उत्साह आहे. यामुळे या निवडणुकीत भाजपच विजयी होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गोमन्तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

राज्य पातळीवरील भाजपचे नेते राज्यभरात दौरे करीत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही प्रचारात उतरले आहेत. सर्व मतदारसंघात प्रचार कार्यालयाच्या उद्‍घाटनांच्या निमित्ताने वातावरण निर्मिती झाली आहे. प्रचाराची एक फेरीही कार्यकर्त्यांनी घरोघरी भेट देत पूर्ण करत आणली आहे. त्याशिवाय आमदार आणि राज्य पातळीवरील नेत्यांचे दौरेही सुरू झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रचाराची घोडदौड आता कोणी रोखू शकत नाही, असेही तानावडे म्‍हणाले.

विरोधकांसाठी प्रचारासाठी मुद्देच नसल्याने राज्य पातळीवरील तेच तेच मुद्दे ते मांडत आहेत. जनता त्यांच्या या मुद्द्यांना वैतागली आहे. जिल्हा पंचायतीची निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांवरच लढवावी लागते. प्रत्येक मतदारसंघाचे समीकरण वेगळे असते. त्यानुसार मुद्दे कमी जास्त करावे लागतात. त्यानुसार भाजपने प्रचार सुरू ठेवला आहे. साकवाळ मतदारसंघात बिनविरोध उमेदवार निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांत हुरुप आला आहे तोच उत्साह आम्हाला विजय मिळवून देणार आहे, असे त्यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्‍यक्ष आज पेडणे तालुक्याच्या प्रचारदौऱ्यावर होते, त्या दरम्यान त्यांनी ही मुलाखत दिली.

प्रश्न : जिल्हा पंचायत निवडणुकीचे वातावरण कसे आहे?
तानावडे : कार्यकर्त्यांत उत्साह आहे. आजपासून मी राज्यभराचा प्रचार दौरा सुरू केला आहे. पेडण्यातील सर्व मतदारसंघात मी आज फिरणार आहे. प्रमुख कार्यकर्ते, समाजातील प्रभावशाली व्यक्ती, काम न करणारे कार्यकर्ते आदींच्या मी भेटी घेणार आहे. माझ्या दौऱ्यामुळे स्थानिक आमदार व उमेदवार यांच्या प्रचाराचे वेळापत्रक कोलमडणार नाही. मी स्वतंत्रपणे फिरणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सांकवाळची जागा बिनविरोध जिंकून आताच आघाडी घेतली आहे. सध्याचा उत्साह शेवटपर्यंत टिकेल आणि तोच आम्हाला विजयी करेल.

प्रश्न : सुरवातीला उमेदवारी निश्चित करताना अनेक ठिकाणी नाराजी दिसून आली. त्याचा फटका या निवडणुकीत बसेल का?
तानावडे : भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटत असल्याने सरकारविषयी लोकप्रियता सर्वस्तरावर आहे. त्यामुळे आपल्याला जिल्हा पंचायतीची उमेदवारी भाजपकडून मिळावी असे अनेकांना वाटणे साहजिक आहे. कोणत्या पक्षातून लढल्यास आपल्याला विजय मिळेल याचे गणित स्थानिक पातळीवर वावरणाऱ्यांना बऱ्यापैकी ठाऊक असते. त्यामुळे भाजपकडून लढण्यास अनेकजण इच्छूक असणे हे सुचिन्ह आहे. अलीकडे पक्षात बाहेरून १२ आमदार आले. त्यांच्यासोबत त्यांचे पाठीराखे, समर्थक, कार्यकर्तेही आले. आमचेही त्या मतदारसंघात संघटन आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी नव्या, जुन्यांनी दावा करणे क्रमप्राप्त होते. एक दोन ठिकाणचा अपवाद वगळता इतर नाराजांनी आपली उमेदवार पक्षासाठी मागे घेतली आहे. त्यामुळे त्याचा फटका जाणवणार नाही.
प्रश्न : माजी आमदार किरण कांदोळकर यांची नाराजी तर जगजाहीर आहे?
तानावडे : थिवी मतदारसंघात नीळकंठ हळर्णकर हे आमदार भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्या समर्थकांनाही उमेदवारी हवी होती. मात्र, आम्ही तसे केले असते तर त्याचा चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळे आम्ही थिवीतील दोन्ही मतदारसंघात पूर्वीचेच उमेदवार दिले. मागील खेपेस कांदोळकर यांनीच त्यांचे समर्थन केले होते. उमेदवार न बदलल्याने कोणी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. पक्ष संघटना त्या मतदारसंघात पक्षासोबत आहे. मंडळ समिती, मतदारसंघ प्रभारी हे सारे पक्षांच्या उमेदवारांसाठी काम करत आहेत. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर थिवीतील नाराजीचा प्रभाव निवडणुकीवर पडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.

प्रश्न : प्रचाराची भाजपची यंत्रणा नेमकी कशी आहे?
तानावडे : जिल्हा पंचायत निवडणूक राज्यस्तरीय मुद्द्यांवर न लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. स्थानिक मुद्द्यांवरच आमचा भर आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी राज्य पातळीवरून एका प्रभारीचा नियुक्ती केली आहे. त्या प्रभारीकडून दर चार दिवसांनी प्रचारातील बलस्थाने व उणीवा यांचा आढावा घेण्यात येतो. उणीवा दूर करण्याचा दुसऱ्या टप्प्यात प्रयत्न केला जातो. त्याशिवाय स्थानिक आमदार प्रचार करत आहेत. उमेदवार प्रचार करत आहेत. छोट्या बैठका, घरोघरी भेटी यावर आमचा भर आहे. वर्षभर या ना त्या कारणाने आमचे कार्यकर्ते सर्वच घरांना भेटी देत असतात. त्यामुळे ते परिचित आहेत. आता प्रचारासाठी ते फिरत आहेत.

प्रश्न : कार्यकर्ते उत्साही आहेत असे आपण म्हणता ते कशावरून?
तानावडे : मुळात आम्ही उमेदवारांची निवड लोकशाही पद्धतीने केली. मंडळ समितीनेच उमेदवार ठरवावा आणि तो गाभा समितीला कळवावा, असे सांगण्यात आले होते. सत्तर टक्के उमेदवार हे स्थानिक कार्यकर्त्यांनीच ठरवलेले होते. काही ठिकाणी दोन नावे आली होती. त्याबाबत गाभा समितीने सर्वांशी चर्चा करून एका उमेदवाराची निवड सर्वानुमते केली. एक दोन जागांबाबतच राज्य निवडणूक समितीत उमेदवारीसाठी चर्चा करावी लागली, निर्णय घ्यावा लागला. कार्यकर्त्यांच्या पसंतीचा उमेदवार दिल्याने त्यानी प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे. यावरून कार्यकर्ते जोमात व उत्साही आहेत हे दिसते.
प्रश्न : प्रचारासाठी राज्याबाहेरून कुणी येणार आहे का?
तानावडे : विधानसभेसाठी इतर राज्यातील कार्यकर्ते मदतीला येतात. त्यांच्या निवडणुकीवेळी आम्ही जातो. जिल्हा पंचायतीची निवडणूक ही आम्हीच लढत आहोत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार विनय तेंडुलकर. मंत्री माविन गुदिन्हो, केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर आणि प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक हे राज्यव्यापी प्रचार दौरे करत आहेत. मतदारसंघातील आमदार प्रचार करतात, उमेदवार प्रचार करतात, माझा दौरा आणि या नेत्याचा दौरा अशी त्रिस्तरीय प्रचार यंत्रणा आम्ही राबवत आहोत.

प्रश्न : स्थानिक पातळीवरील मुद्दे घेऊन लढणे शक्य आहे?
तानावडे : जिल्हा पंचायत किंवा ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यातील लोकप्रतिनिधींकडून लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे विधानसभेसारखा या निवडणुकीला प्रचार करून चालत नाही. आम्ही प्रत्येक मतदारसंघात प्रचार कार्यालयांची उद्‍घाटने केली. त्या कार्यालयांच्या माध्यमातून आता आणि यापूर्वी पक्ष संघटनेच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भाजपचे कार्यकर्ते मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे मतदारांचे म्हणणे त्यांना ठाऊक आहे. त्या मुद्द्यांचा वापर प्रचारात आम्ही करतो. जोडीला आमदारांनी व राज्य सरकारने केलेले काम आहे.

प्रश्न : सरकारविषयी एवढी लोकप्रियता राज्यभरात आहे?
तानावडे : निश्चितच. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांच्यासमोर कोणी वैयक्तिक समस्या जरी मांडली तरी ते स्वतः ते समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा करतात. चट्‍कन निर्णय घेत ते कार्यवाही करतात. आपण केलेल्या कामाचा ते फारसा बाऊ आणि गवगवा करत नाही. पण, ते लोकांत मिसळणारे आणि जनभावनांची कदर करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्यात फिरताना सरकारविषयी लोकांना असलेली आस्था त्यांच्या बोलण्यातून जाणवते. ही लोकप्रियताही जिल्हा पंचायत निवडणुकीत साह्यकारी ठरणार आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com