खाजगी बसेसमुळे वाहतूक बनते ‘गोगलगाय’!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सासष्टी: मडगावात वाहतूक कोंडी : लोकांना त्रास, बसस्‍थांब्‍यांच्‍या फलकांची मागणी

सासष्टी: मडगावात वाहतूक कोंडी : लोकांना त्रास, बसस्‍थांब्‍यांच्‍या फलकांची मागणी
आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मडगाव शहरात मुख्य बाजारपेठ असल्यामुळे दिवासाला हजारो लोकांची ये-जा होत असते. पण, मडगाव शहर परिसरात पार्किंगची समस्या त्यात खासगी बसेस जागोजागी थांबत असल्यामुळे मडगावात येणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.मडगावात कायदेशीर दोनच बस थांबे व बसस्थानके आहेत. परंतु, बसेस कुठेही प्रवशांना घेण्यास तसेच उतरविण्यासाठी थांबत असल्यामुळे ‘प्रवासी तिथे बस थांबा’ अशी स्थिती निर्माण झालेली आहे.बसेस थांबतात त्या ठिकाणी बसथांबा फलक लावण्यात न आल्यामुळे प्रवाशांनी कुठे थांबावे हे कळत नाही. प्रशासनाने यावर लक्ष्य केंद्रीत करून बसथांबा फलक लावावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 
पर्यटन व्यवसायास सुरवात झाल्याने मडगाव शहरात सध्या देशी - विदेशी पर्यटक फिरताना दिसून येत आहेत. पण, मडगाव शहरात बस चालक प्रवाशांना घेण्यासाठी तसेच प्रवासी बसेसना हात दाखवून रस्त्यावरच थांबवित असल्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे मडगाववासीय, पर्यटक तसेच बसमधील लोकांना पाच मिनिटाच अंतर पार करायला पंधरा मिनिट लागत आहे. ‘प्रवासी तिथे बस थांबा’ अशी मानसिकता असलेल्या बस चालकाविरुद्ध वाहतूक पोलिस आपल्यापरीने कारवाई करीत असूनही या चुकीची पुनरावृत्त होताना दिसून येत आहे. मडगाव शहरात पाजीफोंड, बॅंक ऑफ बरोडा, स्टेट बॅंक, विशांत व अन्य ठिकाणी बसथांबा मानून प्रवासी थांबतात. अशा ठिकाणी बसथांबा फलक लावणे महत्त्‍वाचे आहे.
मडगाव शहरात ज्या ठिकाणी प्रवासी बसथांबा समजून थांबतात त्या ठिकाणी बसथांबा फलक व अनुक्रमांक लावणे महत्त्‍वाचे आहे. मडगाव पालिकेत रस्ता सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापन समिती आहे.पण, ही समिती सक्रिय नसल्याने प्रवासी तिथे बसथांबा या प्रकारांना ऊत येत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी लोकांना जागरुक करून बसथांब्यांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शहरात कुठेही बस थांबण्याची तसेच कुठेही बस थांबविण्यास लावण्याची परंपरा बदलावी, यासाठी जागृती होणे महत्त्‍वाचे असून त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मडगाव पालिकेच्या नगरसेवकांनी लोकांना यासंबंधी जागरुत केले पाहिजे. जिथे बसथांब्याची गरज आहे, तिथे बसथांबा उभारण्यासाठी प्रयत्न करावा, असे गोवा कॅनचे अध्यक्ष रोलंड मार्टिन यांनी सांगितले.

बसथांब्‍याची नोंदणी आवश्‍‍यक
प्रवाशांनी कुठेही थांबून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना, अपघात घडल्यास कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. यामुळे प्रवाशांनी सतर्क राहणे महत्त्‍वाचे आहे. २०२० पर्यंत गोव्यातील सर्व बसथांब्याची नोंदणी करून फलक लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच, प्रवाशांनी कुठेही थांबू नये, यासाठी लोकांना जागृत करणे महत्त्‍वाचे आहे, असेही रोलांड मार्टिन यांनी सांगितले. गोवा कॅनने हल्लीच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत घेतलेल्या बैठकीत बसथांब्याच्या मुद्‍द्यावर चर्चा केली असून प्रशासनाने याची दखल घेऊन बसथांब्याची नोंदणी करून अनुक्रमांक द्यावा, असेही त्यांनी सांगितले. 

पश्चिम बगलमार्ग खांबांवरच:फ्रान्सिस सार्दिन

२०१५च्‍या अधिसूचनेनुसार अंमलबजावणी नाहीच
२०१५ साली बस स्थानकाची अधिसूचना जारी करण्यात आली होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप बसथांबा फलक लावलेले नसून हे बसथांबा फलक लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला आता पुन्हा पत्रही पाठविण्यात आलेले आहे. मडगाव शहरात दर पाच मिनिटाच्या अंतरावर बस थांबविणाऱ्या चालकाविरुद्ध वाहतूक पोलिसाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. पण, वाहतूक पोलिस खात्यात कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असून सर्व बसेसवर वचक ठेवण्यासाठी शहरात जागोजागी पोलिस तैनात करणे शक्य नाही. ज्याठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात येत नाही त्या ठिकाणी थांबून प्रवाशांना बसमध्ये चढविले किंवा उतरविले जात आहेत, असे मडगाव वाहतूक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांनी सांगितले. बस चालक ज्या ज्या ठिकाणी प्रवाशांना चढविण्यासाठी बेकायदेशीररीत्या बस थांबवितात, त्या ठिकाणी थांबून कारवाई करण्यासाठी आदी बस थांबची नोंदणी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित बातम्या