राष्ट्रीय स्पर्धा सुविधांचा सार्वजनिक वापर व्हावा

किशोर पेटकर
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पणजी: गोव्यात होणाऱ्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या साधनसुविधांचा नंतर सार्वजनिक वापर व्हावा, त्यामुळे उभारलेल्या सुविधा पांढरा हत्ती बनण्याचे टळेल, अशी सूचना भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना संबंधित यंत्रणेला दिली.

पणजी: गोव्यात होणाऱ्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या साधनसुविधांचा नंतर सार्वजनिक वापर व्हावा, त्यामुळे उभारलेल्या सुविधा पांढरा हत्ती बनण्याचे टळेल, अशी सूचना भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना संबंधित यंत्रणेला दिली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शुभंकर अनावरण कार्यक्रमानिमित्त बत्रा गोव्यात आले आहेत. शनिवारी त्यांच्याशी राष्ट्रीय स्पर्धा अनुषंगाने विविध बाबींवर संवाद साधला असता, त्यांनी गोव्यातील स्पर्धा यशस्वी ठरेल आणि ‘आयओए’च्या मनात स्पर्धेच्या आयोजनाबाबत कोणताच संशय नसल्याचेही स्पष्ट केले. ही स्पर्धा यावर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत अपेक्षित आहे.

‘भूतकाळात काय घडले ते विसरून आता स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न होत आहेत. हे आश्वासक आहे. राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे गोव्यातील स्पर्धा सफल ठरेल याचा मला पूर्ण विश्वास आहे,’ असे विविध कारणास्तव वारंवार लांबणीवर पडलेल्या गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी बत्रा यांनी नमूद केले.

बत्रा म्हणाले, की ‘क्रीडा सुविधा कालांतराने पांढरा हत्ती बनतात, त्यांचा वापर होत नसल्याचा सूर ऐकायला मिळतो. तो बदलायला हवा, त्यासाठी क्रीडा परंपरा जपायला हवी. उभारलेल्या सुविधांचा लाभ सारे नागरिक घेतील यासाठी प्रयत्न व्हायला हवे. प्रत्येकजण मैदानावर यायला लागला, तर सुविधा वापराविना राहणार नाहीत. त्यासाठी स्टेडियम साऱ्यांसाठी खुले हवे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी समन्वय साधणे आवश्यक आहे.’

बीच गेम्ससाठी गोवा उपयुक्त केंद्र
राष्ट्रीय स्पर्धेमुळे गोवा विविध खेळांसाठी माहेरघर बनेल, येथे विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन सोयीस्कर ठरेल, विशेषतः बीच गेम्ससाठी गोवा हे उपयुक्त केंद्र आहे. राष्ट्रीय स्पर्धेचा गोमंतकीयांना पुष्कळ फायदा होईल, असे मत नरेंद्र बत्रा यांनी व्यक्त केले.

गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी क्रीडानगरी नाही. ही चांगली बाब आहे. कारण त्यामुळे अनावश्यक खर्च टळला आहे. क्रीडानगरीतील इमारती कदाचित वापराविना राहिल्या असत्या. स्पर्धेच्या केंद्र परिसरात खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था होत आहे ही चांगली बाब आहे. भविष्यात जगभरात क्रीडा स्पर्धांसाठी अशाच प्रकारे नियोजन अपेक्षित आहे. क्रीडानगरीची संकल्पना मागे पडेल.
- नरेंद्र बत्रा (अध्यक्ष, भारतीय ऑलिंपिक संघटना)
 

संबंधित बातम्या