कालेतील उड्डाण पुलाला रेल्वेची मान्यता

Dainik Gomantak
बुधवार, 22 जानेवारी 2020

काले येथील उड्डाण पूल संमत झाला असून येत्या महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उड्डाण पुलाची पायाभरणी करण्यात येणार आहे.

धारबांदोडा

काले येथील रेल्वे उड्डाण पूल बांधण्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यवाही करण्यात येणार आहे. कुळे येथील उड्डाण पुलासंबंधीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यात आला असून, कुळेतील उड्डाण पूलही उभारण्यासाठी रेल्वे अधिकारिणीकडून सकारात्मकता दर्शवली असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दक्षिण पश्‍चिम रेल्वे हुबळीचे सरव्यवस्थापक अजय सिंग यांच्याशी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, सरपंच मनिष लांबोर, कालेचे सरपंच किशोर गावकर यांची नुकतीच एक बैठक होऊन कुळे व काले येथील रेल्वे उड्डाण पुलासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी अजय सिंग यांनी उड्डाण पुलासंबंधी सकारात्मकता दर्शवून हे उड्डाण पूल आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त केले. काले येथील उड्डाण पूल संमत झाला असून येत्या महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उड्डाण पुलाची पायाभरणी करण्यात येणार आहे. माईडवाडा - कुळे येथील उड्डाण पुलासंबंधीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यात आला असून त्यावर सकारात्मकता दर्शवण्यात आली असून हा पूलही संमत होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. विकासात्मक बाबींसाठी रेल्वे मंत्रालयाकडून आवश्‍यक सहकार्य दिले जाईल, असे आश्‍वासन अजय सिंग यांनी मंत्री तसेच इतर सर्व संबंधितांना दिले.
यावेळी सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, सावर्डे सरपंच संदीप पाऊसकर, साकोर्डा सरपंच जीतेंद्र नाईक, मोलेचे उपसरपंच सुशांत भगत, सावर्डे भाजप मंडळाचे उपाध्यक्ष आपा गावकर, पंच नंदीश देसाई, मच्छिंद्र देसाई, लक्‍सो डोईफोडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कुळे रेल्वे स्थानक हे कुळे बाजाराच्या विरुद्ध दिशेला असून याच ठिकाणी माईडवाडा व सौझामळ हे गाव आहेत. या ठिकाणी उड्डाणपूल नसल्याने येथील ग्रामस्थांची अतिशय अडचण होते. विद्यार्थी वर्गाची तर गोची होत असल्याने या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याची मागणी फार पूर्वीपासून केली जात आहे. दरम्यान, येथील ग्रामस्थांनी उड्डाण पुलासंबंधी कार्यवाही होत असल्याने रेल्वे तसेच राज्य सरकारच्या कृतीचे स्वागत केले आहे.

संबंधित बातम्या