गणरायाच्या स्वागतासाठी पावसाच्या सरींची शक्‍यता

YT
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे - शहरात गणरायाच्या स्वागतासाठी शुक्रवारी (ता.

पुणे - शहरात गणरायाच्या स्वागतासाठी शुक्रवारी (ता. 25) पावसाच्या हलक्‍या एक-दोन सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने गुरुवारी वर्तविली. येत्या बुधवारपर्यंत (ता. 30) शहरात पावसाच्या काही सरी पडतील, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

राज्यासह शहरात उद्या गणरायाचे स्वागत होत आहे. त्या निमित्ताने आतापर्यंत विश्रांती घेतलेला नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या (मॉन्सून) तुरळक सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढील पाच दिवस हवामान ढगाळ रहाणार असून, पावसाच्या तुरळक सरी पडतील, असेही तज्ज्ञांनी सांगितले. 

कोकण आणि विदर्भाच्या पश्‍चिम भागात हवेचे दाब कमी होत आहे. त्यामुळे कोकण, गोवा व विदर्भाच्या पश्‍चिम भागात शनिवारी (ता. 26) काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तसेच अंबोणे, भिरा, शिरगाव, डुंगरवाडी, दावडी या घाटमाथ्यावरही हलक्‍या सरी बरसल्या. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, महाबळेश्वर, अकोले आणि इगतपुरी तालुक्‍याच्या काही भागांत हलक्‍या सरी कोसळल्या. पुणे शहरात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. जळगावमध्येही पाऊस झाला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. 

कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र व पश्‍चिम विदर्भात येत्या रविवारी (ता. 27) तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोमवारपर्यंत (ता. 28) दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. त्यामुळे हवामानात आर्द्रता वाढून दमटपणा वाढला होता. विदर्भातही अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या.

संबंधित बातम्या