लोकांचे श्रद्धास्थान असलेला हा मंडप काढणार

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

मुरगावचा राजा मंडप हटविण्‍याच्‍या हालचाली

पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी

मुरगावचा राजा मंडप एका तपापूर्वी उभारण्यात आला. या मंडपात नऊ दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. गोवा मुक्‍तिदिनी मिनी मॅरेथॉनचे बक्षीस वितरण होते. हा मंडप म्हणजे लोकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंडपात बसेससाठी ताटकळत राहणारे प्रवासी आश्रय घेतात. कॅरम, बुद्धिबळ खेळही खेळले जात आहेत. लहान थोर लोकांसाठी मुरगावचा राजा मंडप एक आनंददायी छत्र बनले होते, तेच हटविण्याच्‍या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत.

मुरगाव : हेडलॅन्ड सडा येथील बस स्टॉपवर मंत्री मिलिंद नाईक यांच्या कृपाशीर्वादाने एका तपापूर्वी उभारण्यात आलेला मुरगाव राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडप पुन्हा एकदा हटविण्याच्‍या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी मुरगाव पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंडपात घूसून जात पाहणी केली.

मंत्री मिलिंद नाईक यांनी याच मंडपात बसून आपली राजकीय श्रीगणेशा गिरविली आहे. भाजपचे बडे नेते, दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या मंडपात बसून कार्यकर्त्यांशी चर्चाविनिमय केला आहे. माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते शेखर खडपकर हेही या मंडपातूनच आपला राजकीय कारभार हाताळीत होते. एकप्रकारे मुरगावचा राजा मंडप म्हणजे मंत्री मिलिंद नाईक आणि शेखर खडपकर यांचे कार्यालयच होते, असे मानले जायचे, पण याच मंडपाला हटविण्याची हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

यापूर्वी हा मंडप हटविण्याच्या प्रयत्न मुरगाव पालिकेने केला होता. त्याला नगरसेवक मुरारी बांदेकर आणि इतरांनी कडवा विरोध केल्याने पालिकेचा डाव फसला होता. मुरगावचा राजा संस्थेचे नेते बालन चोडणकर मंत्री मिलिंद नाईक यांचे हाडवैरी बनल्याने तो मंडप हटविण्याचे कारस्थान दोन वर्षांपूर्वी रचले होते. याखेपेसही तोच प्रकार चालला असून, पालिकेच्या जागेत बेकायदेशीरपणे मंडप थाटल्याचा साक्षात्कार पालिकेला झाला आहे. तो मंडप हटविण्यासाठीच आज पालिकेने पाहणी करून मोजमाप घेतले.

दरम्यान, नगरसेवक नीलेश नावेलकर यांनी मुरगावचा राजा मंडप पालिकेच्या जागेत नव्हे तर एमपीटीच्या जागेत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुरगाव पालिकेचे मुख्य अभियंते आरसेकर, कनिष्ठ अभियंते, पालिका निरीक्षक आणि अन्य कर्मचारी पोलिस फौजफाटा घेऊन मुरगावचा राजा मंडपात सकाळी दाखल होऊन त्यांनी मंडपाचे मोजमाप घेतले

संबंधित बातम्या