बलात्कारित महिलांकडे सरकारचे दुर्लक्ष, सबिना यांचा आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजीः बलात्कारीत महिलेस आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने योजना अधिसूचित केली, पण निधीअभावी एकाही महिलेस मदत दिली नाही. या मदतीसाठी २० महिलांचे अर्ज सरकारकडे प्रलंबित आहेत, अशी धक्कादायक माहिती बायलांचो सादच्या सबिना मार्टिन्स यांनी दिली.

पणजीः बलात्कारीत महिलेस आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने योजना अधिसूचित केली, पण निधीअभावी एकाही महिलेस मदत दिली नाही. या मदतीसाठी २० महिलांचे अर्ज सरकारकडे प्रलंबित आहेत, अशी धक्कादायक माहिती बायलांचो सादच्या सबिना मार्टिन्स यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या येथे बोलत होत्या. नागरिकांचा अधिकार हा महिलांचा अधिकार या संकल्पनेवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनुभवकथन, अहवाल, चर्चा, कविता सादरीकरण, नृत्य, वृत्तचित्र प्रदर्शन या माध्यमातून हा कार्यक्रम साकारण्यात आला. यावेळी लैंगिक अत्याचार झालेल्या तिघींनी अनुभव कथन करताना पोलिस अशा महिलांवरच गुन्हा दाखल करतात याची माहिती कथन केली. याचदरम्यान बोलताना मार्टिन्स यांनी बलात्कार पिडितांना योजनेतून सरकारी भरपाई देण्याकडे काणाडोळा करत असल्याचा आरोप केला.

यावेळी मार्टिन्स यांनी महिलांना न्याय मिळवून देताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, पोलिस तक्रार प्राधिकरण आणि महिला आयोगाला अध्यक्षच नाही, आता चार वर्षांनी मानवाधिकार आयोगाला अध्यक्ष नेमण्यात आला आहे. यावरून सरकार पिडितांप्रती किती असंवेदनशील आहे हे दिसून येते. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत स्वतंत्र सुरक्षा अधिकारी सरकारने नेमलेले नाहीत, गट विकास अधिकाऱ्यांकडेच ही अतिरीक्त जबाबदारी सोपवून सरकार मोकळे झाले आहे. महिलांना मालमत्तेतून बेदखल केले जाते, पण त्यांनाही सरकार दरबारी लगेच न्याय मिळत नाही.

महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर म्हणाल्या, गेल्या तीस वर्षात राज्यातील महिलांच्या समस्यांत काही फरक पडला नाही. महिला संघटना नेटाने प्रतिकूल परिस्थितीत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करत आहेत ते कौतुकास्पद आहे. सरकारने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. महिलांना न्याय देणारी यंत्रणा उभारणे आणि ती सुरू राहिल याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. कौटुंबिक व सामाजिक पातळीवरही महिलांना भेदभावाला सामोरे जावे लागू नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.
यावेळी पुष्पा पेडणेकर आणि अफ्रोज शेख यांनी महिलांना मदतीसाठी ८६६८५६४३८२ हा क्रमांक जारी केला. वैशाली रेवोडकर यांनी एक पालक असल्यास घर दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी कथन केल्या.

अनामिका यांनी हातगाडा चालवण्यास लागणारी कागदपत्रे मिळवताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. ॲड. सोनिया परेरा यांनी महिलांसंदर्भात विविध कायद्यांत असलेल्या तरतुदींची माहिती दिली.

सोनम कायसुवकर यांनी सूत्रसंचालन केले. महिलांच्या अधिकारावरील ध्वनीचित्रफीत प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पूर्वी मार्जिना बाडीगर यानी कविता सादर केल्या तर सविता यांनी नृत्य सादर केले.  

संबंधित बातम्या