गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा रद्द करण्याची रवी नाईक यांची मागणी

Dainik gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

जगभर कोरोनाचा प्रादूर्भाव असून आपल्या भारतात तसेच देशातील सर्वच राज्यात कोरोनामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले असताना या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन गोव्यात करणे धोकादायक ठरणार असल्याचे मत फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी व्यक्त केले आहे.

फोंडा

जगभर कोरोनाचा प्रादूर्भाव असून आपल्या भारतात तसेच देशातील सर्वच राज्यात कोरोनामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले असताना या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन गोव्यात करणे धोकादायक ठरणार असल्याचे मत फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी व्यक्त केले आहे. कोरोनामुळे ज्याप्रमाणे जपानमधील ऑलिंपिक स्पर्धा तसेच देशातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे, त्या पार्श्‍वभूमीवर सर्वच बाधित राज्यातील क्रीडापटूंना गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत भाग घेण्यासाठी बोलावणे म्हणजे धोक्‍याला निमंत्रण देण्यासारखे असून ही क्रीडा स्पर्धा यावेळी रद्दच करून त्यासाठी खर्च केला जाणारा सर्व पैसा ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी वापरा, असे रवी नाईक यांनी सांगितले. चेहऱ्यावर मास्क घालून तुम्ही खेळणार आहात काय, असा सवालही त्यांनी केला.
कोरोनाचा कहर अजून कमी झालेला नाही. विदेशात तर कोरोनाने धुमाकूळ घातला असून लोकांचे जीवनच धोक्‍यात आले आहे. देशातील सर्वच राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव आहे, त्यामुळे नजीक असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळवणे धोकादायक असून या क्रीडा स्पर्धांसाठी आवश्‍यक साहित्य खरेदी करण्यासाठी पैसा खर्च न करता तो कोरोनाच्या निर्मूलनासाठी वापरावा, सध्या राज्य सरकारकडे निधीची कमतरता असून अशावेळेला जास्त धोका पत्करणे खेळाडूंच्या जीवितालाही हानीकारक ठरता कामा नये, म्हणून सरकारने ही राष्ट्रीय स्पर्धाच रद्द करणे ईष्ट ठरेल. कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरल्यानंतर या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेणे शक्‍य होईल, त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घेऊन संभाव्य धोका टाळावा, असे आवाहन रवी नाईक यांनी केले आहे.

संबंधित बातम्या