म्हापसा बसस्थानकाची अधिकाऱ्यांकडून पुन्हा पाहणी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

म्हापसा बसस्थानकाची पाहणी करताना विविध खात्यांचे अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ता रोलन्ड मार्टिन्स.

नियमबाह्य पार्किंग, खाद्यजिन्नस विक्रीवाले, दुकानदार गायब

काहींनी तर अधिकारी येताहेत पाहून अगोदरच दुकाने बंद करून पळ काढला.
यावेळी जिल्हा रस्ता सुरक्षा मंडळाचे पदाधिकारी रोलन्ड मार्टिन्स यांनी बसस्थानकावरील दुकानवाल्यांकडून होणारा अनागोंदी कारभार, अस्वच्छता, नियमबाह्य पार्किंग, खाद्यजिन्नसांची नियमबाह्य विक्री अशा विविध बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

म्हापसा : म्हापसा बसस्थानकावरील अनियमिततेबाबत पाठवपुरावा म्हणून विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आज सोमवारी सकाळी या स्थानकाची संयुक्‍तरीत्या पुन्हा पाहणी केली. अशा प्रकारच्या कारवाईमुळे बसस्थानकावरील दुकानमालक, बसमालक, पार्किंग करणारे वाहनचालक इत्यादींनी धास्ती घेतली आहे.

म्हापसा अग्निशामक दलाचे प्रमुख बॉस्को फेर्रांव, वीज खात्याचे नॉर्मन एथेड आणि रेषा पेडणेकर, पोलिस स्थानकातर्फे उपनिरीक्षक विराज कोरगावकर व महेश शेटगावकर, वाहतूक विभागातर्फे निरीक्षक तुषार वेर्णेंकर व उपनिरीक्षक आर. एस. मंगेशकर, कदंब वाहतूक महामंडळातर्फे महिंद्र पेडणेकर, विष्णू शेटगावकर व उल्हास गावस, म्हापसा आरोग्य केंद्रातर्फे श्रीपाद गावस, म्हापसा पालिकेतर्फे नदीम शेख इत्यादी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

म्हापसा बसस्थाकाची काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने पाहणी करून संबंधित दुकानदारांना ताकीद देण्यात आली होती. तरीसुद्धा त्यासंदर्भात सुधारणा न झाल्याने आज सोमवारी पुन्हा पाहणी करण्यात आली. काही दुकानचालकांना तिथल्या तिथे नोटिसाही बजावण्यात आल्या. स्टॉलचे नियमबाह्यरीत्या विस्तारीकरण केल्याने ते विस्तारित भाग हटवण्यात यावे असे संबंधित स्टॉलवाल्यांना सांगून अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा कदंब महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिला.

अशा स्वरूपाची नियमितपणे पाहणी करण्यात येईल. त्यामुळे यापुढे बसस्थानकाच्या आवारात अशा बेकायदा कृती घडू नये, याबाबत संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन रोलन्ड मार्टिन्स यांनी यावेळी प्रतिनिधींशी बोलताना केले.

 

गोव्याचे दुध आजपासून तापले

 

संबंधित बातम्या