गोवा गाठणे झाले महाग

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

पेडणे तालुक्यातील पालये येथील एक कुटुंब लग्न समारंभासाठी गेल्या १८ मार्चला उत्तर प्रदेशातील सराहनपूर येथे गेले होते. ही मंडळी लग्न आटोपून गोव्यात परतणार इतक्यात टाळेबंदी जाहीर झाली.

पणजी

सरकारने आंतरराज्य प्रवासासाठी परवाने देणे सुरु केले असले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्याप कार्यरत झाली नसल्याने मुळ गावी परतताना अनेकाना मोठी पदरमोड करावी लागत आहे. काहींना तर ती परडणारी नसल्याने इतरांची मदत घेण्याची वेळ आली आहे. अशा मदतीसाठी व्हॉटसअॅपवर संदेश आता फिरू लागले आहेत. पूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी या पद्धतीने मदत मागितली जायची पण आता प्रवासासाठी मदत मागण्याची वेळ टाळेबंदीमुळे लोकांवर आली आहे.

पेडणे तालुक्यातील पालये येथील एक कुटुंब लग्न समारंभासाठी गेल्या १८ मार्चला उत्तर प्रदेशातील सराहनपूर येथे गेले होते. ही मंडळी लग्न आटोपून गोव्यात परतणार इतक्यात टाळेबंदी जाहीर झाली. वाहतुकीची सर्व साधने बंद झाली. त्यामुळे ही मंडळी तिथेच अडकून पडली. तेथे राहणेही दैनंदिन खर्चामुळे परवडत नाही आणि येण्याचा खर्चही परवडत नाही अशा पेचात ते  कुटुंब सापडले. अखेरीस गोव्याला जाण्याचा निर्णय घेत उत्तर प्रदेश सरकारकडून वाहतूक परवाना घेत या कुटुंबांनी भाड्याची गाडी करत गोवा गाठण्याचे ठरवले. या गाडीच्या भाड्यासाठी त्यांना ८० हजार रुपये व इतर खर्च मिळून एकूण ९० हजार रुपये खर्च येणार आहे. मध्यमवर्गीय कुंटुंबासाठी हा खर्च परवडणारा नसल्याने  अखेरीस मित्र मंडळींनी प्रत्येकी पाचशे रूपयांची मदत या कुटुंबाला देण्याचे ठरवले आहे. हे कुटुूंब काल पहाटे उत्तर प्रदेशातून निघाले आहे. २ हजार १०० किलोमीटरचा प्रवास करून ते उद्या गोव्यात पोचणार आहे.

असे अनेकजण अडकलेले आहेत. काहींना गोवा सरकारने जारी केलेला प्रवास परवाना स्थानिक प्रशासनाने मानण्यास नकार दिल्यामुळे आहे तिथेच राहण्याची वेळ आली आहे. देशाच्या काही भागात  केवळ टाळेबंदी नैाही तर संचारबंदीही आहे. त्यामुळे त्याचा फटका सहलीसाठी देशाच्या विविध भागात गेलेल्या गोमंतकीयांना बसला आहे. अशाच गोव्यात काम करणाऱ्या एकाच्या आईला बसला आहे. तिची मुलगी नवऱ्यासह मुंबईत राहते. ती मुलगी गावी आली होती. जाताना आठवडाभरासाठी म्हणून ती आईला घेऊन गेली. ती मुंबईत पोचल्याच्या तिसऱ्यााच दिवशी टाळेबंदी जाहीर झाली आणि ती ज्येष्ठ नागरीक महिला मुंबईतच अडकून पडली आहे. तिला आता प्रवास परवाना मिळाला तरी सार्वजनिक वाहतूक म्हणजे रेल्वे वैगैरे सुरु नसल्याने भाड्याच्या वाहनाने गोवा गाठणे शक्य होणार नाही. ती सरकार खास रेल्वे कधी सोडेल याच्या प्रतीक्षेत आहे. अशा अनेकांच्या कहाण्या आता हळूहळू ऐकायला मिळू लागल्या आहेत. टाळेबंदीत वाढ झाल्यानंतर हे सारे आणखीन धास्तावले आहेत.

संबंधित बातम्या