अभासी दुनियेतील वास्तव

प्राची नाईक
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

ऑगमेंटेड रिअॅलिटी हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळे आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअॅलिटी) आणि वास्तविक जग (रिअॅलिटी) यांच्यातली दरी कमी झाली आहे. पाहायला गेलो तर संवर्धित वास्तविकता अद्याप आपल्या सुरवातीच्या काळात असले तरी येणाऱ्या काळात हे तंत्रज्ञान लोकांच्या आयुष्यात खरोखरच बदल घडवून आणणार आहे. आंतरराष्ट्रीय डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) नुसार, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) वर जगभरातील खर्च २०२३ मध्ये १६० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे.

नवी दिशा : 'पोकेमॉन गो' या गेम ने काही काळापूर्वी संपूर्ण जगाला भुरळ घातली होती. जगाला याचं एवढं का वेड लागलं होत, याची अनेक कारणे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचे कारण होतं ते वर्धित वास्तविकता म्हणजे 'ऑगमेंटेड रिअॅलिटी'. 'पॉकेमॉन गो' हा गेम त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळेच सर्वत्र लोकप्रिय झाला. या गेमच्या माध्यमातून मोबाइलवर ऑगमेंटेड रिअॅलिटीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. या तंत्रज्ञानावर आधारित डायनो मेस, दि वॉकिंग डेड, टर्फ वॉर्स, गारफील्ड गो, टायकुन, झोंबी रन, दि वॉक सारख्या अनेक गेम्सही आहेत.

ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) हे एक असे तंत्रज्ञान आहे. जे वापरकर्त्याच्या वास्तविक जगावर आभासी वास्तवाच अध्यारोपण करते. हे वापरकर्त्याद्वारे पाहिलेले वास्तविक दृश्य आणि संगणकाद्वारे उत्पन्न केलेल्या आभासी देखावा यांचे संयोजन करते. यामध्ये आवाज, चित्रे आणि इतर गोष्टींचा वापर होतो. ज्यामुळे आपण आपल्या सभोवतालच्या परिसराशी जोडून जातो. या तंत्रज्ञानामुळे वास्तविकता आणि कल्पकता यामधील अंतर अत्यंत अस्पष्ट होते. याचा पहिला वापर १९९२ मध्ये अमेरिकेच्या हवाई दलाने केला.

या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्यांपैकी काही मोजक्या लोकांमध्ये प्रणव मिस्त्री हा एक भारतीय माणूसही आहे. त्याने २००९ एमआयटी मीडिया लॅबमध्ये 'सिक्स्थ सेन्स'; हा प्रकल्प तयार केला. ऑगमेंटेड रिअॅलिटी आता फक्त हेडसेट आणि गेमिंग मर्यादित राहिले नसून या तंत्रज्ञानाने असंख्य उद्योगांमध्ये प्रवेश घेतला आहे. मोटार, आरोग्य, दुरुस्ती, शिक्षण, प्रशिक्षण, रिटेल शोकेसिंग आणि डायग्नोस्टिक्स यासारख्या विविध वापरासाठी ऑगमेंटेड रिअॅलिटी वाढत्या प्रमाणात स्वीकारली जात आहे.

याचा वापर आता प्रत्यक्ष जीवनातही होऊ लागला आहे. नेदरलँडमध्ये लेयर या अॅपच्या साहाय्याने एखाद्या बिल्डिंगच्या दिशेने स्मार्टफोन धरून कॅमेरा सुरू केला की त्या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या सर्व कार्यालयांची नावे स्क्रीनवर येतात, एवढेच नाही तर तिथे नोकरीसाठी कुठले पद रिक्त आहे का हे देखील दाखवते. यासोबत स्नॅपचॅट आणि इंस्टाग्रामवर वापरले जाणारे विविध फिल्टर्स ऑगमेंटेड रिअॅलिटीची उदाहरणे आहेत.

आपल्या फोनचा कॅमेरा वापरून आपला क्यूआर कोड स्कॅन करून एरव्ही स्क्रीनवर न दिसणारी अतिरिक्त माहिती मिळवता येते हे देखील याचाच भाग आहे. हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असले तरी यामध्ये अनेक आव्हाने आहेत, ज्यामुळे आजही तंत्रज्ञान विकसित करताना झटावे लागत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सतत वाढत आहे आणि येणाऱ्या काळात हे तंत्रज्ञान प्रत्येक गोष्टीशी जोडले जाईल, असे नक्कीच म्हणता येते.
 

संबंधित बातम्या