यंदा लाल मिरची होणार अधिक ‘तिखट’

Dainik Gomantak
शनिवार, 25 एप्रिल 2020

दरम्यान, बाजारात स्थानिक लाल मिरची उपलब्ध होत नसली, तरी मिरची उत्पादन काही शेतकऱ्यांकडे गावठी मिरची विक्रीस उपलब्ध असून, सध्या ४०० ते ४५० रु. किलो असे गावठी मिरचीचे दर असल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली, 

मिरची उत्पादनावर झालेला परिणाम त्यातच टाळेबंदीमुळे अन्य भागातील मिरचीच्या आयातीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने यंदा डिचोलीत लाल मिरचीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे यंदा डिचोलीत स्थानिक गावठी मिरची अधिक ‘तिखट’ होण्याचे संकेत मिळत असून ग्राहकांना मिरचीचा ‘जळजळाट’ सहन करावा लागणार, अशीच चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.
डिचोलीतील मये, पिळगाव, नार्वे, साळ, मेणकुरे, धुमासे, लाडफे, कारापूर, बोर्डे आदी बहुतेक ठराविक गावात लाल मिरचीचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, असंतुलीत हवामानामुळे यंदा तालुक्‍यातील बहुतेक भागात लाल मिरची उत्पादनावर परिणाम झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली आहे. त्यातच ‘खेती’ आणि अन्य रानटी जनावरांच्या उपद्रवांमुळे मिरची उत्पादनात आघाडीवर असलेल्या साळ, मेणकुरे, धुमासे गावांसह काही भागात मिरची पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे यंदा स्थानिक मिरची उत्पादनात घट अपेक्षीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्‍त होत आहे.
दरम्यान, बाजारात स्थानिक लाल मिरची उपलब्ध होत नसली, तरी मिरची उत्पादन काही शेतकऱ्यांकडे गावठी मिरची विक्रीस उपलब्ध असून, सध्या ४०० ते ४५० रु. किलो असे गावठी मिरचीचे दर असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या आहे तशीच परिस्थिती राहिल्यास ऐन पावसाच्या तोंडावर लाल मिरचीचे दर भडकण्याची शक्‍यता तर आहेच, उलट मिरचीसाठी भटंकती करण्याची पाळी जनतेवर येणार आहे. गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत स्थानिक गावठी मिरचीचे दर ३०० रु. किलो असे होते, तर कर्नाटकातील जांबोटी आणि महाराष्ट्रातील बांदा भागातील मिरचीचे दर २२० ते २५० रु. किलो असे होते.

पुरुमेंतावर परिणाम
एरव्ही दरवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून स्थानिक गावठी मिरची बाजारात विक्रीस उपलब्ध होत असते. डिचोलीसह पेडणे, बार्देश तालुक्‍यातील काही ठराविक गावातील स्थानिक गावठी मिरचीसह महाराष्ट्रातील बांदा आणि कर्नाटकातील जांबोटी भागातील लाल मिरचीची डिचोली बाजारात आवक होत असते. मिरचीचा बाजार भरला की, खास करून गृहीणी वर्षभर आवश्‍यक असलेल्या मिरचीची खरेदी करीत असत. स्थानिक गावठी मिरचीसह जांबोटी आणि बांदा भागातील मिरचीलाही बाजारात मागणी असते. यंदा मात्र टाळेबंदीमुळे खास मिरचीचा बाजार भरण्यात अडचण निर्माण झाली असून पावसाळ्यापर्यंत बाजार भरणेही अशक्‍य असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा लाल मिरचीचा ‘पुरुमेंत’ करण्यात अडचण निर्माण होणार आहे. स्थानिक गावठी लाल मिरची बाजारात येईपर्यंत बाजारात किराणा माल दुकानदारांकडे बेडगी आणि अन्य जातीच्या राज्याबाहेरील मिरचीला भाव येण्याची शक्‍यता आहे.

संबंधित बातम्या